‘चक्र’ गतिमान राहावं!

26 Nov 2024 21:22:47
assembly election sangh shakti
 
विधानसभा निवडणुकीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांचे पाय चक्राप्रमाणे फिरले. विचारांची चक्रे गतिमान झाली होती. ‘मतदार जागृती’चे अभियान चक्रासम गतिमान होते. सारा महाराष्ट्र पिंजून निघाला. ‘संघे शक्ति: कलौ युगे’ असा जो उल्लेख केला जातो, ती समाजातील ‘संघशक्ती-अर्थात सांघिक शक्ती’ कार्यरत झाली आणि तिने सद्विचारी नेतृत्वाला ऐन युद्धात दिशा दिली, बळ दिले. जणू अर्जुनासाठी हाती ‘सुदर्शन’ घेणार्‍या श्रीकृष्णाचेच दर्शन समाजातील सज्जनशक्तीने पुन्हा एकदा घडविले.

एकदिलाची सिंहगर्जना
दिशादिशांतून घुमते रे
परचक्राची भीती कशाची
चक्र सुदर्शन फिरते रे॥धृ॥
परचक्र किंवा सुदर्शन यांची फारशी माहिती नसतानाच्या वयात हे गीत अनेकदा कानावर आले. म्हटले, पाठही केले गेले. याचे कारण मी शिशुकालापासून संघ स्वयंसेवक आहे. अभिमन्यूला जसा ‘चक्रव्यूह भेद’ समजला, तसाच काहीसा मला ’संघ विचार’ परिचित झाला. कारण, कुटुंबातच तो वारसा होता. मी भाग्यवान आहे की, माझ्या पालकांकडून न मागता, न भांडता मिळणारी ही ‘सद्विचारांची संपत्ती’ मला भरभरून मिळाली. आज हे सारे आठवायचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल.

तमाम भाजप विरोधकांना आश्चर्यात टाकणारा, भाजपच्या मित्रपक्षांनाही अचंबित करणारा, ‘एक्झिट पोल’ अंदाजांपेक्षा अधिक जागा मिळाल्याने भाजपला ही आनंदित करणारा असा हा निकाल. आग्रही हिंदुत्व, लाडकी बहीण, सवलतींचा वर्षाव, स्टार प्रचारकांचा प्रभाव, वाढत्या मतदान टक्केवारीचा लाभ, कुशल नेतृत्वाची योग्य व्यूहरचना, ही भाजपवाल्यांची भक्कम बाजू तर, योग्य नेतृत्वाचा अभाव, आघाडीतली विसंगती, मुस्लिमांबाबतचे लाचार धोरण, त्यासाठी त्यांचे मागणी पत्र मान्य करणे, हिंदुत्वावर टीका करणे, आरक्षणाचा आधार घेत समाजात भेदनीतीची भाषा या सार्‍या विरोधकांच्या उणिवा. ‘संघबंदीची केवळ मागणी केवळ विचारात घेणे ही किती घातक आहे. हेदेखील आता विरोधकांना समजले असेल. यामुळे हे निकाल सर्वांनाच अनपेक्षित धक्का देणारे वाटले तर गैर नाही. पण, प्रत्यक्ष वस्तुस्थिती याहून वेगळी आहे.

महाविकास आघाडीतल्या पक्षनेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, हे जितके खरे तितकेच महायुतीतील पक्षनेत्यांनी आत्मभान राखत स्वयंपरीक्षण करणे, ही आवश्यक आहे. भरघोस मिळालेला हा विजय शंभर टक्के महायुतीचाच आहे. पण, या यशात आपल्या नियोजनाचा-कार्यकर्त्यांचा सहभाग किती? आपण दिलेल्या सवलतींचा लाभांश किती? आपल्या विकास कामामुळे प्रभावित मतदारांचा सहभाग किती? याचा विचार घटक पक्षांच्या नेतृत्वाने स्वतंत्रपणे आपापल्या बैठकीत करणे आवश्यक आहेच. पण, त्याही पलीकडे मतदानाच्या वाढत्या टक्केवारीचा जो लाभ मिळाला त्यामागे कोण होते, याचाही विचार प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे.
’व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्।’ असे म्हणतात. म्हणजे विद्यमान जगातील सर्व गोष्टी या भगवान वेदव्यासांच्या उष्ट्या आहेत. म्हणजे महाभारतात महर्षी व्यासांनी जे जे लिहिले, तेच आज जगात सर्वत्र आहे. अर्जुनाला हनुमंतांचे साहाय्य मिळवून देण्यासाठी अर्जुनाने बांधलेल्या ‘शरसेतू’ खाली श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र ठेवले. जयद्रथ वध व्हावा म्हणून काही काळ सुदर्शनाआड सूर्य झाकून सूर्यास्ताचा भास निर्माण केला. अर्जुन मनापासून, योग्य पद्धतीने लढत नाही, हे लक्षात येताच ‘न धरी शस्त्र करी मी’ ही प्रतिज्ञा मोडत सुदर्शन धारण करीत पितामह भीष्मांवर चालून जाण्यास श्रीकृष्ण सज्ज झाले. या सार्‍या द्वापारयुगातल्या कथा. पण, त्या आज कलियुगात पुन्हा घडत आहेत. आताच्या विधानसभेचे रण हे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहे.
नीती-अनीती, न्याय-अन्याय, धर्म-अधर्म अशी लढाई ज्या ज्या वेळी असते, त्या त्या वेळी हे घडणारच!
आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी समाजातील साहित्यिक, विचारवंत, संतमहंत, मार्गदर्शक हे सारे आपसातील भेद विसरून इंदिराजींच्या पर्यायाने काँग्रेसच्या दमनशाही विरुद्ध लोकनायक जयप्रकाशजींच्या मार्गदर्शनाखाली एकवटले. सत्ताधारी हुकुमशाहीची गत अक्षरश: चक्रीवादळाचा पालापाचोळा उडावा, तशी झाली होती. या घटनेचा मी केवळ प्रत्यक्षदर्शीच नाही, तर सक्रिय स्वयंसेवक आहे.

या विधानसभा निवडणुकीत याच पद्धतीची रचना काही अंशी दिसून आली. समाजातील काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते ‘प्रबोधन मंच’ या बॅनरखाली एकत्रित आले. त्यांनी विचारवंत, साधुसंत, कीर्तन-प्रवचनकार, साहित्यिक यांच्या भेटी घेतल्या. ही निवडणूक ‘नीती विरुद्ध अनीती’ यांची आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात विरोधक उघडपणे मूर्तीभंजकांची मदत करीत आहेत. स्वार्थासाठी सारे एकत्र येताना देशहित विसरत आहेत. परिणामी, महाराष्ट्रात पूर्वांचल, केरळ, बंगाल, काश्मीर यासारखी स्थिती होईल. मंदिरेच नसतील, तर प्रवचनकारांचे काम काय? विचार म्हणजे काय हे माहीत नसणार्‍या समाजात विचारवंतांना कोण विचारेल? मूर्तीभंजकांचा प्रभाव असेल, तर गणेशोत्सवाची परंपरा कशी टिकणार?

प्रश्न सत्तेवर कोण असेल यापेक्षा संस्कृती, परंपरा, मानवता पर्यायाने धर्मरक्षणाचा आहे. त्यासाठी धर्म मानणारी मंडळी सत्तेत यायला हवीत. यासाठी समाजातील सज्जनशक्तीने समाज जागृत करणे आवश्यक आहे, नव्हे ती काळाची गरज आहे, हे सर्वांना पटवून दिले आणि मग ही सारी मंडळी कार्यरत झाली.

पू. गोविंद देव गिरी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवचैतन्य जागरण यात्रेचा महाराष्ट्रात प्रवास झाला. ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील व इतरही अनेक धुरीणांनी आपल्या कीर्तन-प्रवचनात वरील सार्‍या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करीत लोकशाहीत आपल्या मतास किती महत्त्व आहे, हे नागरिकांस पटवून देण्याचा प्रयत्न केला. या कार्यात सहभागी असंख्य स्वयंसेवकांनी घरोघर या विषयावरची पत्रके देत मतदान करण्याचे आवाहन केले. विचारवंतांनी विविध प्रसारमाध्यमांतून परिस्थितीचे गांभीर्य लोकांसमोर मांडत एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले.

या काळात असंख्य कार्यकर्त्यांचे पाय चक्राप्रमाणे फिरले. विचारांची चक्रे गतिमान झाली होती. ‘मतदार जागृती’चे अभियान चक्रासम गतिमान होते. सारा महाराष्ट्र पिंजून निघाला. ‘संघे शक्ति: कलौ युगे’ असा जो उल्लेख केला जातो, ती समाजातील ‘संघशक्ती-अर्थात सांघिक शक्ती’ कार्यरत झाली आणि तिने सद्विचारी नेतृत्वाला ऐन युद्धात दिशा दिली, बळ दिले. जणू अर्जुनासाठी हाती ’सुदर्शन’ घेणार्‍या श्रीकृष्णाचेच दर्शन समाजातील सज्जनशक्तीने पुन्हा एकदा घडविले. ‘यदा यदा हि धर्मस्य’ असे वचन देणार्‍या भगवंतांचा सामूहिक अवतार असेच वर्णन या सज्जनशक्तीचे करावे लागेल. हे ’सुदर्शन चक्र’ फिरत असल्यानेच समाजही भयमुक्त झाला. ‘सैनिक’ आणि ‘भक्त’ यातला नेमका फरकही लक्षात घ्यायला हवा. सैनिक राजासाठी लढतो, त्याची काही अपेक्षाही असते. पण, भक्त श्रद्धेने सेवा करतो. तिचे स्वरुप ‘न मे कर्मफले स्पृहा।’ म्हणजेच निरपेक्ष असते. जे या निवडणुकीच्या धामधुमीत देशभक्तांनी दाखवून दिले. कुणाचा आदेश, कुणाची आज्ञा, कुणाचे निमंत्रण या कशाचीही वाट न पाहता ज्याला जसे सुचेल तशी त्याने आपल्या क्षमतेनुसार या ‘धर्म यज्ञात’ आपल्या सेवेची ‘समिधा’ समर्पित केली आणि त्याचाच परिणाम म्हणून हे घवघवीत यश महायुतीच्या पदरी पडले. युधिष्ठिराच्या ‘राजसूय’ यज्ञात पाठीराख्या श्रीकृष्णास अग्रपूजेचा मान दिला गेला होता. विद्यमान सज्जन संघशक्तीस तो अपेक्षित नाही. पण, विजयोन्मादात सत्ताधार्‍यांना या शक्तीचा विसर पडू नये, एवढी अपेक्षा करणे निश्चितच गैर नसावे.

अर्थात निवडणूक संपली. राजकारणाशी संबंध नसलेली कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी आपापल्या नित्य उपासनेत व्यस्त होतील. पण, त्यांनी आपल्या भक्ती जागरण कार्यात राष्ट्रभक्ती व ईश्वरभक्ती या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे ठामपणे - उघडपणे सांगत संत तुकोबाराय व समर्थ रामदासांची परंपरा सांभाळत महाराष्ट्र हा राष्ट्राचा भक्कम आधार होईल असे पाहावे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतः काही करत नाही, पण स्वयंसेवक मात्र अनेक गोष्टी करतात, हेदेखील अनेकदा स्पष्ट झाले आहे. आताच्या निवडणुकीतही स्वयंसेवकांनी राष्ट्रकार्यातील आपल्या निरपेक्ष सहभागाचे दर्शन घडविले आहे.

कीर्तन-प्रवचनकारांप्रमाणेच त्यांनीही आता सत्तेच्या पटदर्शनापासून दूर होत नित्य कार्यास लागावे. केव्हा तरी स्वयंसेवक असलेल्यांनीही ‘संघबंदी’ची उलेमांची मागणी लक्षात घेऊन गांभीर्याने सक्रिय होण्याचा विचार केला. खरे तर अशी वेळच येणार नाही असा विचार करायला हवा. समाजातील सज्जनशक्तीचा प्रभाव वाढविणे, हाच खरा संघ विचार आहे, हे लक्षात घेऊन संघाच्या शताब्दी वर्षात त्या दिशेने सर्व स्वयंसेवक बंधूंनी सक्रिय होणे गरजेचे आहे.

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. मोरोपंत पिंगळे यांनी एका कार्यकर्ता अभ्यास वर्गात ‘प्रखंड, खंड, उपखंड’ रचनेचे महत्त्व सांगितले होते. दर दोन हजार लोकसंख्येत किमान पाच हिंदुत्ववादी सक्रिय कार्यकर्ते ज्यात मातृशक्तीचीही प्रतिनिधी असेल अशी रचना हवी, असा आग्रह धरला होता. साधारण 1984 सालचा काळ होता. हा आग्रह जर प्रत्यक्षात आला असता तर...

असो. नाही जमले. पण, आता काय हरकत आहे. संघ शताब्दी वर्षात मोरोपंतांच्या कल्पनेतील ही रचना पूर्ण करणे, पू. सरसंघचालकांच्या आवाहनानुसार दैनंदिन शाखांची संख्या, त्यांची योग्य उपस्थिती, उपक्रमशीलता या सर्वांचाही विचार व्हायला हरकत नाही. कोणत्याही सुविधा नसतानाचे संघकाम व अमर्याद सुविधांच्या काळातील कार्याचा, कार्यपद्धतीचा, कार्यकर्त्यांमधील कृतीशीलता व जिव्हाळा या सर्व गोष्टी़चा तौलनिक विचार होणे ही गरजेचे वाटते. या सर्व गोष्टींचा विचार करून मोठ्या संख्येने व एक दिलाने स्वयंसेवक गतिशील झाले, तर समाजातील सज्जनशक्ती निश्चितच प्रभावी होईल. या शक्तीचे ‘सुदर्शन चक्र’ सतत फिरते राहिले, तर परचक्राची भीती राहणारच नाही. साहजिकच मग प्रारंभी उल्लेख केलेल्या संघगीतातील शेवटच्या ओळींचे साक्षात प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही.

अजिंक्य हिंदू अजेय भारत
अशी घोषणा नभास भेदित
हिमालयाच्या शिखरावरती
ध्वजा आमुची डुलते रे॥6॥
हे दृष्य पाहण्याचे भाग्य लाभावे यासाठी शताब्दी वर्षात शतप्रतिशत क्षमतेने प्रतिक्षण संघविचारासाठी झटणे महत्त्वाचे आहे, असे म्हणायला हरकत नाही. चला तर मग ‘संघटित सज्जन शक्तीचे सुदर्शन चक्र सदैव फिरते ठेवूया, ज्याचा धाक सदैव राजसत्तेला असेल.’ शेवटी राजदंडावर धर्मदंडाचे संयमन असणे हीच भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा आहे.
प्रा. श्रीकांत काशीकर
(लेखकाने 500 हून अधिक व्याख्याने दिली असून, विविध विषयांवर त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.)
9423449341
Powered By Sangraha 9.0