आयकॉनिक चिनाब रेल्वे पुलावरून वंदे भारत धावणार

26 Nov 2024 12:28:19

vande bharat
नवी दिल्ली, दि.२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते जानेवारी २०२५मध्ये 'नवी दिल्ली ते काश्मीर'ला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी जाहीर नुकतीच जाहीर केली. इतकेच नाही तर ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकवर धावेल. यावेळी ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या प्रतिष्ठित चिनाब रेल्वे पुलावरूनही धावणार आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प २७२ किलोमीटरचा असून जवळजवळ पूर्ण झाला आहे. एकूण मार्गांपैकी २५५ किलोमीटरचा प्रकल्प आधीच कार्यान्वित झाला आहे. कटरा आणि रियासी दरम्यान फक्त १७ किलोमीटरचा पल्ला शिल्लक आहे आणि तो या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
"या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्यातील लोकांना मोठा फायदा होईल. तर हिवाळा ऋतूतील प्रवास सुलभ होईल. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यवसायाच्या संधी वाढतील. ही एनडीए सरकार आणि पंतप्रधानांनी काश्मीरच्या लोकांना दिलेली भेट आहे," असे सिंग यांनी त्यांच्या प्रकल्पाला दिलेल्या भेटीदरम्यान माध्यमांना सांगितले.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ११ एसी 3-टायर कोच, चार एसी २-टायर कोच आणि एक फर्स्ट एसी कोच असेल. सिंग यांनी नमूद केले की, तिकिटांची किंमत रु.१,५०० ते २,१०० दरम्यान असेल. ही ट्रेन जम्मू आणि माता वैष्णो देवी येथे थांबेल आणि या प्रदेशातील पर्यटनाला चालना देईल.
ट्रेन चिनाब रेल्वे ब्रिज सारख्या अभियांत्रिकी आविष्काराला पार करेल. हा पूल नदीपात्राच्या ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. भेटीदम्यान सिंग यांनी इरकोन इंटरनॅशनल लिमिटेड आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या बांधकाम आणि तांत्रिक कौशल्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी संदीप गुप्ता यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. या रेल्वे प्रकल्पामुळे ताजी फळे, फुले आणि भाजीपाला काश्मीर ते दिल्ली यासारख्या मालाची जलद वाहतूक सुलभ करून, स्थानिक व्यवसायांना चालना देऊन या भागातील वाहतुकीत क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0