साडेतीन हजार मालमत्ता कर थकबाकीदार रडारवर

26 Nov 2024 20:30:48

bmc


मुंबई, दि.२६ : प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्यमान आर्थिक वर्षात म्‍हणजेच १ एप्रिल २०२४ पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी - व्‍यावसायिक इमारती, व्‍यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्‍ट निश्चित केले आहे. त्‍या दृष्‍टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्‍तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक १ एप्रिल ते दि.२५ नोव्‍हेंबरअखेरपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागामधील कर थकविणा-या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे.


जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या ९० मालमत्‍तांची लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली आहे.यामध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्‍हणजे १ हजार ७६७, शहर विभागात १ हजार २३२ तर पूर्व उपनगरातील ६०६ मालमत्‍तांवर जप्‍ती आणि अटकावणीची कारवाई करण्‍यात आली आहे. या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांकडे एकूण १ हजार ६७२ कोटी ४१ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. त्‍यापैकी २१८ कोटी ९६ लाख रूपयांचा कर भरणा या मालमत्‍ताधारकांनी केला आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) मेसर्स सेजल शक्‍ती रिअॅल्‍टर्स (एफ उत्‍तर विभाग)
२) लक्ष्‍मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्‍तर विभाग)
३) मेसर्स एशियन हॉटेल्‍स् लिमिटेड (के पूर्व विभाग)
४) सहारा हॉटेल्‍स् (के पूर्व विभाग)
५) मेसर्स न्यूमॅक अॅण्‍ड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग)
६) मेसर्स फोरमोस्‍ट रिअॅल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग)
७) श्री साई पवन को - ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग)
८) कमला मिल्‍स लिमिटेड (जी दक्षिण विभाग)
९) श्री एल. एन. गडोदिया अॅण्‍ड सन्‍स लिमिटेड (एच पश्चिम विभाग)
१०) मोहित कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी (के पश्चिम विभाग)
Powered By Sangraha 9.0