"सगळ्यांनी सहजतेनं जवळ केलं त्यातून मी घडत गेलो" अमृतमहोत्सवी कार्यक्रमात निवेदक सुधीर गाडगीळ व्यक्त

26 Nov 2024 18:00:06
 
सुधीर गाडगीळ
 
पुणे : “पत्नीने पाठिंबा दिला आणि मला जे करायचं ते करू दिलं त्यामुळंच गेली 55 वर्षे मी निवेदनाच्या क्षेत्रात कार्यरत राहू शकलो. पंडित भीमसेन जोशींपासून ते लता मंगेशकरांपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून ते अब्दुल कलामापर्यंत सगळ्यांच्या मुलाखतीमध्ये मला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी वयानं, ज्ञानानं, अनुभवानं, कर्तृत्वानं लहान असतानासुद्धा या सगळ्यांनी मला इतक्या सहजतेनं जवळ केलं मी त्यातून घडत गेलो” अशा भावना सुप्रसिद्ध निवेदक आणि चपराक मासिकाचे सल्लागार सुधीर गाडगीळ चपराक प्रकाशनने आयोजित केलेल्या कार्य्रमात व्यक्त केल्या. सुधीर गाडगीळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त चपराक मासिकाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले संतवाणीच्या कार्यक्रमाला निवेदन नाही तर निरूपण म्हणतात हे भीमसेन जोशी यांनी मला समजावून सांगितलं. अशा अनेकांनी मला घडवल्यामुळेच मी या क्षेत्रात योगदान देऊ शकलो. त्यामुळे या सगळ्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
 
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, सरहदचे अध्यक्ष संजय नहार आणि चपराकचे प्रकाशक घनश्याम पाटील उपस्थित होते. “लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तिची दोन्ही रुपे सुधीर गाडगीळ यांच्यावर प्रसन्न आहेत. निवेदन या कलेचा इतिहास लिहिला गेला तर त्यात गाडगीळ यांच्यासाठी मानाचे पहिले पान असेल. निवेदन या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारे सुधीर गाडगीळ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे” असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. “देशात आणि देशाबाहेर असंख्य मित्र जोडणार्‍या सुधीर गाडगीळ यांनी विक्रमी मुलाखती घेतल्या. सूत्रसंचालन करत असताना मिष्कीलपणा आणि कितीही मोठी व्यक्ती असली तरी गाडगीळांच्या प्रतिक्रियेवर न रागावणे ही त्यांची ख्याती आहे. तितका अधिकार त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवला. ज्या माणसांची ओळख असावी असे अनेकांना वाटते अशा माणसांचे प्रेम सुधीर गाडगीळ यांनी मिळवले” अशा भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केल्या. राजीव खांडेकर आणि संजय नहार यांनी सुद्धा सुधीर गाडगीळ यांच्या निवेदनशैलीचे कौतुक केले. चपराकचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
Powered By Sangraha 9.0