विधानसभा निवडणूकीच्या आधीपासूनच महाविकास आघाडीची सत्ता येणार, निकाल लागताच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आणि सत्तेत बसणार, अशी अनेक स्वप्ने मविआतील नेत्यांनी बघितली होती. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री सोडाच पण विरोधी पक्षनेतेपदी बसण्याचीही संधी त्यांना जनतेने दिली नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष. मात्र, जागावाटपापासून तर प्रत्यक्ष मतदानापर्यंत त्यांना कायमच मित्रपक्षांसमोर आपण मोठं असल्याचं वारंवार सिद्ध करावं लागलं. लोकसभेच्या निकालानंतर अगदी आकाशात असलेली काँग्रेस विधानसभेनंतर पार जमिनीवर कोसळली. मात्र, एवढा मोठा पक्ष आणि अनुभवी नेते असतानाही काँग्रेसचा दारूण पराभव का झाला? आणि काँग्रेसच्या पराभवाची मुख्य पाच कारणे कोणती? याबद्दल समजून घेऊया.
खरंतर विधानसभा निवडणूकीत जनतेने दिलेला कौल विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. नुकतंच काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी हा विजय भाजप आणि महायूतीचा नाही तर ईव्हीएमचा विजय आहे, असं वक्तव्य केलं. मात्र, असे बेताल वक्तव्य करून ते जाहीरपणे जनतेचा हा कौल नाकारत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. असो..
लोकसभा निवडणूकीत तब्बल १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र, विधानसभेच्या वेळी असं काय घडलं की, काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावं लागलं? हा सध्या मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे शून्य नेतृत्व. गेल्या काही वर्षात काँग्रेसची देशभरात वाताहत झालीये. हिंदुवुरोधी भूमिका, जातपात आणि भावनिक राजकारण यामुळे काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढतीये. मागच्या काही दिवसांत राज्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाच्या नावांच्या यादीत केवळ बोटावर मोजण्याइतके नेते शिलल्क आहेत. त्यांच्यातही कायम चढाओढ असल्याचं पाहायला मिळतं. शिवाय काँग्रेसचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली नियोजन शुन्यताही पराभवाचं एक मोठं कारण मानलं जातं. विधानसभेच्या प्रचारात लोकसभेच्या वेळी वापरलेला संविधानाचा तोच तो रटाळ मुद्दा, नवीन विषयांची कमतरता, सत्तेत आल्यास महायूतीच्या योजना बंद पाडण्याचे मनसुबे अशा अनेक कारणांमुळे जनतेने काँग्रेसला घरचा रस्ता दाखवलाय.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले नाना पटोलेंसारखे नेते हे त्यांच्या पराभवाचं दुसरं कारण. गेल्या काही काळात नाना पटोले आणि वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाला कंटाळून अशोक चव्हाण, मिलींद देवरा, संजय निरुपम आणि दिवंगत बाबा सिद्दीकी अशा अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस नेत्यांकडून वारंवार पक्ष नेतृत्वावर शंका उपस्थित करणं, त्यांची अकार्यक्षमता दाखवून देणं आणि त्यांच्या कामाला कंटाळून थेट त्यांच्या हकालपट्टीची मागणी करणं सुरुच असतं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शंका उपस्थित केलीये. प्रदेशाध्यक्ष पदावर असतानासुद्धा राज्यातील इतर मोठ्या नेत्यांसोबत असलेले त्यांचे पक्षांतर्गत वादही कमी नाहीत. शिवाय यंदाच्या निवडणूकीत तर नाना पटोलेंसारख्या बड्या नेत्याचा अवघ्या २०८ मतांनी झालेला विजयदेखील चर्चेचा विषय ठरलाय. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांसारख्या मोठ्या नेत्यांनाही यावेळी पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे एकूणच काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय. या पराभवानंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असाही एक सूर राजकीय वर्तुळात उमटला होता. मात्र, खुद्द पटोलेंनी या चर्चा फेटाळून लावल्या.
काँग्रेसच्या परभवाचं तिसरं कारण म्हणजे दिग्गज नेत्यांचा परस्परांमधील संवाद आणि संघटनांचा अभाव. पहिली गोष्ट अशी की, नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वपरिचित आहेत. त्यामुळे साहाजिकच त्यांच्यातील परस्पर संवादात अभाव जाणवतो. दुसरीकडे, काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष म्हटल्यावर त्यांच्याकडे संघटनेची कमतरता आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, लोकसभेतील विजयाने नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आता विधानसभा आपलीच अशा आवीर्भावात होते. विधानसभेला महायूतीच्या विरोधात लाट आहे आणि जनता महाविकास आघाडीला पाठिंबा देणार, असा निकाल त्यांनी निवडणूकपूर्वीच जाहीर करून टाकला. मात्र, हाच अती आत्मविश्वास त्यांना नडला आणि गाफील असलेल्या महाविकास आघाडीला फटका बसला. आपापसातील मतभेद, नियोजनाची कमतरता आणि संघटन कौशल्याच्या अभावामुळे काँग्रेसने लढवलेल्या १०३ जागांपैकी अर्ध्याही जागा त्यांना पदरात पाडून घेता आल्या नाहीत.
विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासूनच महाविकास आघाडीत सुरु असलेली मुख्यमंत्रीपदाची शर्यत हे काँग्रेसच्या पराभवाचे चौथे कारण. महाविकास आघाडीत गाजलेल्या आणि सर्वाधिक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीपद. एकीकडे उद्धव ठाकरे कायमच मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते. तर दुसरीकडे, मध्यंतरी मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोलेंचंही नाव चर्चेत आलं. त्यामुळे अनेक दावे प्रतिदावे सुरु झालेत. शिवाय संजय राऊतांकडूनही वारंवार मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा जप सुरु होता. तर नाना पटोले वारंवार काँग्रेस वरचढ आहे हे सांगण्याची एकही संधी सोडत नव्हते.
काँग्रेसच्या पराभवाचं पुढचं कारण म्हणजे सहयोगी पक्षांशी असलेला असहयोग. जागावाटपावेळी उबाठा गट आणि काँग्रेसमधील वाद प्रकर्षाने चव्हाट्यावर आला. विशेषत: विदर्भातील अनेक जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही. याचाच परिणाम म्हणजे अनेक अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले. रामटेकमध्ये उबाठा गटाने विशाल बरबटेंना उमेदवारी दिली असतानाही काँग्रेसच्या सुनील केदारांनी बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार केला. याशिवाय निवडणूकीच्या दिवशी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात उबाठा गटाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे उबाठा गटाचा संताप झाला. यावरून महाविकास आघाडीत असलेला समन्वयाचा अभाव प्रकर्षाने पुढे आला. शिवाय आघाडीत राहून मित्रपक्षांच्या उमेदवाराऐवजी स्वत:च्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसने मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेतली.