नाशिकच्या खैर तस्करीचे धागेदोरे चिपळूणात; फॅक्टरीला लावले सील, मालक फरार

    26-Nov-2024
Total Views |
खैर



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नाशिकच्या खैर तस्करीची पाळेमुळे चिपळूणपर्यंत पसरली असल्याचे समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी चिपळूणमधील कात तयार करणाऱ्या फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा साठवल्याचे निदर्शनास आल्याने फॅक्टरी सील करण्यात आली असून फॅक्टरीचा मालक फरार आहे.
 
 
नाशिकच्या खैर तस्करी प्रकरणांमध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यातील दोन आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी असून उर्वरित दोन आरोपी हे गुजरातचे रहिवासी आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आरोपींनी नाशिकमध्ये बेकायदा पद्धतीने तोडलेले खैर हे चिपळूणमधील सावर्डे येथील फॅक्टरीमध्ये पाठवत असल्याचे सांगितले. त्यामुळे नाशिकचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनानुसार १६ वनकर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सावर्डे येथील सिंडिकेट फुड्स कुंभारवाडा फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वन विभागाने चौकशी केली असता या फॅक्टरीचे मालक विक्रांत टिटंबे हे फरार असल्याचे आढळून आले. म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्स जारी केला असून फॅक्टरीमधील कागदपत्रे, पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट इत्यादी बाबी पुढील चौकशीकरिता जप्त केल्या आहेत. तसेच या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कात ज्यूस आणि रेडिमेड कात आढळून आला आहे. हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडाची अवैध तोड करून अवैध वाहतूक करून बनवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकले आहे.


खैर
 
 
त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी सचिन कात फॅक्टरी आणि दहिवली खुर्द येथील तिरुपती कात फॅक्टरी येथे धाड टाकली. याठिकाणी देखील काही प्रमाणात अवैध खैर साठा केल्याचे वनपथकाच्या निदर्शनास आले. परंतु या दोन्ही फॅक्टरीचे मालक सचिन उर्फ पिंट्या पाकळे हे अनुपस्थित असल्याने पुढील चौकशी करता आली नाही. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी नाशिक वन विभागाला चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. काही दिवसापूर्वीच खैर तस्करीचे धागेदोरे दहशतवादाशी जोडले गेले असल्यामुळे अँटी टेररिस्ट स्कोड यांनी गुन्हा दाखल करुन सहा आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी संगमनेर आणि इतर दोन आरोपी नाशिक येथील असल्यामुळे नाशिक वन पथकाने आपला मोर्चा चिपळूणमध्ये वळवल्याचे समजते. ही कारवाई नाशिकचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन आणि कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक मणिकंदन रामानुजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपाल दुसाने, सूर्यवंशी, गायकवाड आणि इतर वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी केली. साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी त्यांना स्थानिक मदत केली.