ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) संस्थेतर्फे दिला जाणारा ‘कलागंध’ पुरस्कार यंदा कलादिग्दर्शक आणि नेपथ्यकार सुमित पाटील यांना जाहीर झाला आहे. शनिवारी ७ डिसेंबर रोजी ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या १२ व्या वर्धापनदिनी डॉ. काशीनाथ घाणेकर मिनिथिएटर येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘कलागंध पुरस्कार सन्मान सोहळ्यात’ त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
ठाणे आर्ट गिल्ड ही संस्था गेली १२ वर्षे विविध क्षेत्रातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असते. कलेसाठी अविरत झटणाऱ्या एका कलावंताला दरवर्षी या संस्थेच्या वतीने कलागंध पुरस्काराने सन्मानित केले जाते.