पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस

26 Nov 2024 13:36:26
 
Fadanvis
 
मुंबई : यापुढे पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही, असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी ते बोलत होते.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२६/११ हा दिवस दोन गोष्टींसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी आपल्याला आपले संविधान मिळाले. दुसरीकडे, याच दिवशी २००८ मध्ये आमच्या संविधानावर, सार्वभौमित्वावर, स्वातंत्र्यावर मुठभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश हलवून टाकला होता. यात शेकडो निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले. मात्र, या परिस्थितीत आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवले. २६/११ च्या हल्ल्यातील सर्व शहीदांना आज नमन करण्याचा दिवस आहे. यासोबतच पुन्हा कधीही मुंबईत आणि आमच्या देशात अशा प्रकारची घटना होऊ देणार नाही, हा निर्धार करण्याचाही हा दिवस आहे."
 
हे वाचलंत का? -  राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची पुन्हा नियूक्ती!
 
"हा हल्ला केवळ मुंबईवर नव्हता तर देशाची आर्थिक राजधानी उध्वस्त करून आम्ही भारताला कसे वाकवू शकतो असा जगाला संदेश देण्याचा हल्ला होता. परंतू, आमच्या पोलिसांनी तो हल्ला परतवला आणि भारत हा एक मजबूत आणि सक्षम देश आहे, हे आपण बघितले. २०१४ नंतर या भारतात कुणीही बॉम्बस्फोट करण्याची हिंमतही करू शकले नाही, अशी ताकद आज भारताने उभी केली आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
ते पुढे म्हणाले की, "जोपर्यंत आपल्या मनात राष्ट्र प्रथम ही भावना तयार होणार नाही, आपण देशासाठी जगण्याचा विचार करणार नाही आणि परीवार आणि समाजापेक्षा देश महत्वाचा आहे, ही भावना तयार होणार नाही तोपर्यंत जगातील सर्वात मजबूत राष्ट्र म्हणून आपली संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही. आजच्या दिवशी या सर्व शहीदांचे नमन करत असताना आपल्यालासुद्धा एक प्रेरणा मिळते. आपल्या देशासाठीचे आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा विचार आपल्या मनात येतो. पोलिसांच्या मागण्या, घर, आरोग्य, शिक्षण, मुले, पत्नी, रोजगार या सगळ्या मागण्या मागच्या काळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहू," असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0