जिल्ह्यात पशूगणनेला सुरुवात

    26-Nov-2024
Total Views |
Animal Census

नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात २१व्या पशूगणनेस सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजीपासून प्रारंभ झाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही पशूगणना ( Animal Census ) सुरू झाली आहे. जिल्ह्यात शहरासाठी १६५ व ग्रामीण भागात ३८४ प्रगणक मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण करणार आहेत. पशुपालक व नागरिक यांनी आपल्याकडे आलेल्या प्रगणकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी केले आहे. पशूगणनेचे काम करणार्‍या प्रगणकांवर पर्यवेक्षणासाठी शहरी भागात २५ व ग्रामीण भागात ८६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांपर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे. शहरी भागात चार हजार कुटुंबे व ग्रामीण भागात तीन हजार कुटुंबांमागे एक प्रगणक याप्रमाणे प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून होणार पशूगणना

प्रत्येक घरी जाऊन विकसित मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रगणक पशूगणना करणार आहेत. याबाबत प्रगणक व पर्यवेक्षक यांना अ‍ॅपची माहिती देण्यात आली आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये प्राण्यांच्या २१९ प्रकारच्या पशुधनाच्या जातींची गणना होणार असून भटक्या कुत्र्यांची गणनाही याद्वारे केली जाणार आहे. अ‍ॅपमध्ये प्राण्यांची वर्गवारी, जात संदर्भातील छायाचित्रांसह माहिती उपलब्ध आहे. दूध डेअरी, मटन व चिकन विक्रीच्या दुकानांसह सर्वेक्षण होणार आहे.

शहरात १६५, ग्रामीण भागात ३८४ प्रगणक

पुढील पाच ते सहा महिने चालणार सर्वेक्षण

पशुपालक व नागरिकांना सहकार्याचे आवाहन

२०१९च्या सर्वेक्षणानुसार...

२०१९ मध्ये झालेल्या २०व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये ११ लाखांवर गायी, म्हशी, ८ लाख, २३ हजार शेळी व मेंढ्या आणि १३ लाख, १५ हजार, ७८५ कोंबड्यांची नोंद करण्यात आली आहे.