साल २०१५ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १९४९ साली आजच्याच तारखेला आपण घटनेचा भारताचे संविधान म्हणून स्वीकार केला व २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणले.
भारतीय संविधान हे केवळ कलमांची यादी नसून ते भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात
⦁ भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून यात ४४८ कलमे , २५ भाग, १२ अनुसूची आहेत. तसेच संविधान अंमलात आल्यापासून २०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
⦁ १९५० साली लिहिलेल्या संविधानाची मूळ प्रत ही नवी दिल्लीतील संसद भवनात हेलियमने भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये जतन करण्यात आलेली आहे.
⦁ संविधानाच्या हिंदी व इंग्रजीमध्ये अश्या दोन हस्तलिखित प्रती व एक इंग्रजीमधील छापील प्रत आहे. यापैकी इंग्रजीतील हस्तलिखित प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा तर हिंदी हस्तलिखित प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी आपल्या सुवाच्च्य हस्ताक्षरात लिहिल्या आहेत.
⦁ संविधानाचे मूळ हस्तलिखित हे १६ X २२ इंच आकाराच्या कागदावर लिहीले असून यात एकूण २५१ पाने असून त्याचे वजन ३.७५ किग्रॅ आहे.
⦁ या हस्तलिखिताच्या प्रस्तावनेचे पान व इतर सर्व पानांच्या चित्ररुप सजावटीचे कार्य शांतिनिकेतन मधील नंदलाल बोस व त्यांचे शिष्य प्रसिद्ध चित्रकार व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी केले आहे.
⦁ घटनासमितीचे अंतिम कामकाज पूर्ण करण्यासाठी एकूण २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. तसेच घटनानिर्मितीसाठी एकूण ६४ लाख रुपये इतका खर्च झाला होता.
⦁ २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेची शेवटची एकदिवसीय बैठक पार पडली होती. त्याच दिवशी संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या. यादिवशी पाऊस पडल्याने तो शुभसंकेत मानला गेला. तसेच याच दिवशी 'जन-गण-मन' या गीताला राष्ट्रगीत तर 'वंदे मातरम्' गीताला राष्ट्रगाण म्हणून स्वीकृती मिळाली.
⦁ घटनाकर्त्यांनी एकूण ६० देशांच्या घटनेचा सखोल अभ्यास करुन भारतीय संविधान तयार केले आहे.
⦁ घटनासमितीचे चिन्ह हे हत्ती होते. तसेच संविधानाच्या मुखपृष्ठावर असणारी राजमुद्रा ही दिनानाथ भार्गव यांनी अशोक स्तंभावरुन प्रेरित होऊन तयार केलेली आहे.
⦁ राज्यघटना डेहराडून येथे प्रकाशित करण्यात आली होती. संविधानाच्या पहिल्या हजार प्रती या डेहराडून येथील सर्व्हे ऑफ इंडिया च्या प्रेसमध्ये छापल्या होत्या. याचीच आठवण म्हणून संविधानाची एक प्रत आजही डेहराडून येथील सर्व्हे ऑफ इंडिया च्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.