संघरचनेत काम करताना सगळ्यांनाच अनुभव येतो की, आपल्या कल्पनेतले आदर्श हे संघ साहित्यातच सापडतात असे नाही, तर ते अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने सतत आपल्यासमवेत वावरत असतात.
वर्तमान सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून कामात योग्य व्यावसायिक दृष्टी (Professional Aproach) विकसित केल्यास, सर्व गोष्टींना न्याय देता येतो. वेळेचे योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन आणि त्याच्या योग्य नोंदीसह समीक्षा, याआधारे प्रभावी कार्य करणे कोणालाही शक्य आहे, याचे मी अनुभवलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक प्रमुख उदाहरण म्हणजे बिमलजी केडिया. लौकिकदृष्ट्या अभियंता, स्वतंत्र यशस्वी उद्योजक, नवउद्योजकांचे मार्गदर्शक आणि उत्तम संघ कार्यकर्ता अशी बिमलजींची ओळख. गृहस्थी कार्यकर्त्याच्या वर्तमान कौटुंबिक रचनेत घरच्या जबाबदार्या वाढतातच. पण, व्यावसायिक शर्यतीत टिकून राहण्यासाठीही त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यातही आपल्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी काही छंद जोपासायचे असतील, तर त्यासाठी वेळ शोधणे आणि हे सगळे संतुलन साधणे हे जीवनकौशल्यच! असे हे बिमलजी म्हणजे सामाजिक भान आणि संघटनेतील दायित्ववहन, असे विशेष कौशल्य सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व.
रा. स्व. संघ ही हिंदू समाजाचे संघटन करणारी संघटना. या ध्येयाचे स्मरण ठेवून या समाजाचे बदलते मानस, कालप्रवाहात घडत असलेली स्थित्यंतरे, याचे भान ठेवत आपल्या जबाबदारीला न्याय देणे, हे कार्यकर्त्यांसमोर कायमच एक आव्हान राहिले आहे आणि म्हणूनच सुरुवातीपासून मुख्य शिक्षक, कार्यवाह या पदांना आजही तसेच संबोधले जात असले, तरी त्याच्याकडून अपेक्षित गोष्टी अथवा त्यांची क्षमता याच्या बदलत्या निकषांचे भान न ठेवता, जबाबदारीला प्रभावीपणे न्याय देणे कठीण आहे. अशावेळी बिमलजींसारख्या आदर्शांचा अभ्यास आणि सहवास उपयुक्त ठरणाराच आहे.
१९९१ साली मुलुंड भागाचा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख आणि त्यानंतर १९९७ साली नव्याने रचना झालेल्या विक्रोळी भागाचा कार्यवाह असे दायित्व माझ्याकडे आले, जे पुढे २००४ सालापर्यंत राहिले. या कालखंडादरम्यान बिमलजींकडे मुंबई महानगरात विविध जबाबदार्या असल्यामुळे त्यांच्याशी सातत्याने संपर्क होत होता. बैठकांचे नियोजन, योग्य वेळेत त्या संपणे, (अर्थात सर्व विषयांना योग्य न्याय देत) याचे प्रशिक्षण आपोआप होत गेले. ते आजही उपयोगी ठरते आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ठरवून दिलेला प्रवास न विसरता, न बदलता केल्याचा परिणाम सहयोगी कार्यकर्त्यांवर निश्चित पडतो, हे प्रशिक्षणही याच कालखंडातले. काळानुरूप येणारे नवीन विषय, त्याचे अध्ययन आणि त्याआधारे कार्यकर्त्यांसमोर त्याची योग्य मांडणी, त्यासाठी वेळ देण्याची मानसिकता यांसारख्या अनेक गुणविशेषांचे सहज प्रशिक्षण या सहवासाने झाले.
एखाद्या ठरवून दिलेल्या प्रवासासाठी, बैठकींसाठी किंवा विशेष कार्यक्रमासाठी बिमलजी आले की, सामूहिक संवादाव्यतिरिक्त तिथे उपस्थित असणार्या प्रत्येक स्वयंसेवकाबरोबर व्यक्तिगत संवादाच्या विषयाचे अचूक होमवर्क ते करून यायचेच. पण, आधी कधी संवादादरम्यान काही करणीय गोष्टी ठरल्या असतील, तर त्याचा योग्य तो पाठपुरावाही ते न विसरता करायचे, ज्यामुळे प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य मनावर ठसत जायचे. हे सर्व त्यांना कसे शक्य होते? असा प्रश्न सुरुवातीला पडायचा आणि मग लक्षात आले की, त्यांचे योग्य डायरी लेखन आणि कठोर क्रियान्वयन हेच कारण असायचे.
एखाद्या प्रवासी अधिकार्यांनी बैठकीत नवीन विषय मांडला आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या, तर आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांसमोर संभाव्य अडचणीच उभ्या राहायच्या. पण, बिमलजी बैठकीत असतील, तर त्या सर्व गोष्टी ऐकल्यावर बरेचदा त्यांचे एक वाक्य असायचे, “कोई बात नहीं, कर लेंगे।” हे म्हणताना त्यांच्यासमोर पूर्वसंपर्कातले, विविध प्रकारे उपयोगी पडणारे सर्व कार्यकर्ते उभे राहत असत. कधी आम्ही आमच्या काही अडचणी सांगून आपली असमर्थता त्यांच्यासमोर व्यक्त केली, तर ते आणखी एक वाक्य नेहमी उच्चारायचे, “ठीक हैं, चिंता मत करों, पर्याय ढूंढ लेंगे।” म्हणजे विषयमांडणी करताना त्याच्या क्रियान्वयनासाठी ’प्लॅन-ए’, ’प्लॅन-बी’, ’प्लॅन-सी’ तयार करूनच मांडणी करणे, ही त्यांची कुशलता!
मला वाटते ही दोन वाक्य त्यांच्या सकारात्मक मानसिकतेला प्रकट करणारी आहेत, ज्यामुळे त्यांचे कार्य परिणामकारक ठरले आहे आणि अनेक नवीन स्वयंसेवकांसाठी दिशादर्शक आहे. एखादा नवीन विषय त्यांनी स्वीकारला की, तो तडीस जाईल याची खात्री सर्वांनाच पटली होती. मुंबई महानगरातील मोठे संचलन, मुंबईत झालेला पहिला ‘स्वदेशी मेळावा’, ‘विश्व संघ शिबीर’, ‘केशवसृष्टी’ची निर्मिती, ‘ग्रामविकासा’ची संकल्पना अशा अनेक गोष्टींचे यानिमित्ताने स्मरण होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या समवेत काम करताना कोणतेही आव्हान सकारात्मक विचाराने आणि योग्य नियोजनाच्या आधाराने आपण सहज पेलू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. आजही संघरचनेत अनेक प्रकारच्या जबाबदार्या पार पाडताना आणि अनपेक्षित येणारे नवीन विषय हाताळताना दडपण न येण्याचे कारण म्हणजे बिमलजींसारख्या अनेक अनुभवी अधिकार्यांचा सहवास आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे अवलोकन. “रविवार शाम को मैं कहीं नहीं आऊंगा। क्योंकि वो समय परिवार का हैं।” असे म्हणणारे बिमलजी इतर दिवशी मात्र संघासाठी तितकेच गंभीर होते. या सर्व गुणविशेषांचा उपयोग संघरचनेत तर झालाच. पण, व्यावसायिक क्षेत्रातही याआधारे मी बरेच काही साध्य करू शकलो, हे निर्विवाद. भविष्यात नवीन सामाजिक आव्हाने स्वीकारताना, अष्टपैलू कार्यकर्ता निर्मितीसाठी पुढच्या पिढीकडे यांसारखे अनेक गुण संक्रमित करण्याचा योग्य प्रयत्न होत राहणे, हीच यासारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा होय. अमृत महोत्सवानिमित्त बिमलजींना अनेक शुभेच्छा!
विवेक भागवत