कल्याणमध्ये होणार अखंड ‘वाचनयज्ञ’

25 Nov 2024 16:17:47
Books

डोंबिवली : ’वाचाल तर वाचाल’ ही उक्ती आजच्या डिजिटल माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे मागे पडली आहे. नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये ( Kalyan ) शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर ते रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सलग ५० तास अखंड वाचनयज्ञाचे बालक मंदिर कल्याण येथे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’, ‘रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण’, ‘इनर व्हील क्लब कल्याण’ यांच्या वतीने व ‘स्पेस पार्टनर बालक मंदिर संस्था’ यांच्या सहकार्याने या वाचनयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
नव्या पिढीत विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्तचे वाचन कमी होत चालले आहे. वाचणारी जुनी आणि मध्यम पिढीही विविध डिजिटल माध्यमांच्या आहारी जात असल्याने त्यांचे वाचन कमी झाले आहे. या सर्वांना पुन्हा वाचनाची गोडी लागावी, यासाठी या तीन संस्थांनी एकत्र येऊन या अखंड वाचनयज्ञाची तयारी सुरू केली असल्याची माहिती अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव व संयोजक हेमंत नेहते यांनी दिली.

कोणत्याही वयोगटातील वाचनप्रेमी यामध्ये सहभागी होऊ शकतात. अभिवाचन सत्र, कथा वाचन, ललित वाचन, काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन अशा विविध सत्रांच्या माध्यमातून हा उपक्रम साकारण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी कल्याण नागरिक, खर्डीकर क्लासेस, जोशी फायनान्शियल सर्व्हिसेस, रेगे-दीक्षित सायन्स अकॅडमी, हायमीडिया लॅबोरेटरी, शिंदे फाऊंडेशन, डॉ. सुश्रुत वैद्य, डॉ. अर्चना सोमाणी, बिजू उन्नीथन, भालचंद्र घाटे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. योगेश जोशी ९७५७०४४६१४, हेमंत नेहते ८७७९६४४९९२ येथे संपर्क साधावा.

Powered By Sangraha 9.0