राज कपूर यांचे चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित करणार

25 Nov 2024 17:29:33
Ranbir kapoor

गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर ( Raj Kapoor ) यांच्या शताब्दी समारंभाचा एक भाग म्हणून 55 व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त त्यांच्या चित्रपटांना आणि त्यांनी आजवर चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांचा नातू अभिनेता रणबीर कपूर उपस्थित होता. आपल्या आजोबांच्या कामाबद्दल बोलताना, “राज कपूर यांचे चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्हते, तर ते प्रेक्षकांना मनाला भिडणार्‍या कथा सांगणारे अधिक होते,” असे रणबीर म्हणाला. शिवाय लवकरच राज कपूर यांचे काही चित्रपट पुर्नसंचयित करुन देशभरात प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचेही रणबीर कपूर याने जाहीर केले.

राज कपूर यांच्या चित्रपटांच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकत, रणबीरने ‘आवारा’ चित्रपटाच्या कथेने जातीवादाला कसे संबोधित केले होते नमूद केले. तर ‘श्री ४२०’ हा लोभ आणि महत्त्वाकांक्षेमध्ये गुंतलेली चित्रपटाची कथा सांगणारा होता असेही तो म्हणाला. ‘प्रेम रोग’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ यांसारख्या नंतरच्या काळात आलेल्या चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या समस्या आणि सामाजिक आव्हानांवरही भाष्य करण्यात आल्याचेही तो म्हणाला. तसे, रणबीरने ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’, ‘नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया आणि फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने राज कपूर यांच्या चित्रपटांना पुर्नसंचयित करण्याची तयारी सुरू असल्याचेही म्हटले.

शिवाय आत्तापर्यंत “राज कपूर यांचे दहा चित्रपट आधीच पुर्नसंचयित केले असून लवकरच काही चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्याचा विचार असून त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची आठवण होईल,” असेही रणबीर म्हणाला.

Powered By Sangraha 9.0