मुंबई : मुंबईत विधानसभा निवडणुकीत महायुतीने २२ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप १५, शिवसेना सहा आणि राष्ट्रवादी एक जागांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीने केवळ १४ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत ७० हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना ‘नोटा’ला ( NOTA ) मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटांची मते ही अणुशक्ती नगरमध्ये असून त्याची संख्या ३ हजार, ८८४ आहेत. तर सर्वाधिक कमी ‘नोटा’ हे मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त १३० आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून, या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचा ‘सुपडा साफ’ झाला आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक २३२ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी १३ लाख, ३९ हजार, २९९ नागरिकांनी मतदान केले, तर मुंबई उपनगरात ४३ लाख, ३४ हजार, ५१३ नागरिकांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदारांपैकी जवळपास १.२४ टक्के लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. या टक्केवारीनुसार सर्वाधिक १.७४ टक्के ‘नोटा’ मते मुंबई दक्षिण या मतदारसंघात पडली आहेत.