नवी दिल्ली : “जेव्हा आपण ‘एनसीसी’चे ( NCC ) नाव ऐकतो, तेव्हा आपल्याला आपले शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवतात. मी स्वतः ‘एनसीसी’ कॅडेट आहे. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यातून मिळालेले अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी सांगितले. “एनसीसी’ तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना विकसित करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी ‘मन की बात’च्या ११६व्या भागात स्वामी विवेकानंदांची १६२वी जयंती, ‘एनसीसी’ दिवस, गयाना यात्रा, वाचनालय यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.
‘एनसीसी’ दिनानिमित्त पंतप्रधान म्हणाले की, “जेव्हा आपण ‘एनसीसी’चे नाव ऐकतो, तेव्हा आपल्याला आपले शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवतात. मी स्वतः ‘एनसीसी’ कॅडेट आहे, त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यातून मिळालेले अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहेत.
‘डिजिटल अरेस्ट’ अडकवण्याचे षड्यंत्र
मागच्या वेळेप्रमाणे पंतप्रधान मोदी म्हणाले, “सरकारमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ची कोणतीही तरतूद नाही, हे आम्हाला पुन्हा पुन्हा लोकांना समजावून सांगावे लागेल. हे उघड खोटे आणि लोकांना अडकवण्याचे षड्यंत्र आहे. तसेच, त्यांनी डिजिटल अटक यासारख्या फसवणुकी टाळण्यासाठी तीन चरणांचा अवलंब करण्याबद्दल सांगितले होते. यामध्ये प्रतीक्षा करा, विचार करा आणि कृती करा यांचा समावेश आहे.”
एक लाख तरुणांना राजकारणाशी जोडणार
“२०२५ मध्ये स्वामी विवेकानंदांची १६२वी जयंती म्हणून साजरी केली जाईल आणि ती विशेष पद्धतीने साजरी करण्याची तयारी सुरू आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दि. ११ जानेवारी आणि दि. १२ जानेवारी रोजी भारत मंडपम-दिल्ली येथे तरुण विचारांचा महाकुंभ आयोजित केला जाईल. त्याला ‘डेव्हलप्ड इंडिया यंग लीडर्स डायलॉग’ असे नाव देण्यात आले आहे. अशा एक लाख नवीन तरुणांना देशातील राजकारणाशी जोडण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
वाचनालयांचे कौतुक
“चेन्नईमध्ये ‘प्रकृती अरिवगम’ नावाने मुलांसाठी एक वाचनालय तयार करण्यात आले आहे, जे सर्जनशीलता आणि शिक्षणाचे केंद्र बनले आहे. ‘फूड फॉर थॉट फाऊंडेशन’ने हैदराबादमध्ये अनेक ग्रंथालये बांधली आहेत. बिहारमधील गोपालगंजमध्ये प्रयोग वाचनालयाचीही चर्चा आहे. यासाठी १२ गावांतील तरुणांची मदत होत आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
गयानामध्ये एक ‘मिनी इंडिया’
“भारतापासून हजारो किमी दूर, गयानामध्ये एक ‘मिनी इंडिया’ राहतो. सुमारे १८० वर्षांपूर्वी भारतातील लोकांना शेती आणि इतर कामासाठी गयाना येथे स्थलांतरित करण्यात आले. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक राजकारण, व्यवसाय, शिक्षण, संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहेत,” अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
जैवविविधतेत चिमण्यांची भूमिका महत्त्वाची
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, आज शहरांमध्ये चिमण्या क्वचितच दिसतात. या पिढीतील अनेक मुलांनी चिमण्या केवळ चित्रांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेत मुलांना सहभागी केल्याबद्दल त्यांनी चेन्नईच्या ‘कुडुगल ट्रस्ट’चे कौतुक केले. ट्रस्ट मुलांना चिमण्यांचे महत्त्व शिकवते आणि त्यांना लहान लाकडी घरे बांधण्याचे प्रशिक्षण देते, ज्यात पक्ष्यांच्या जगण्याची आणि खाण्याची व्यवस्था असते. या उपक्रमांचा उद्देश चिमण्यांना शहरी समुदायांच्या जीवनात परत आणणे, तरुण पिढ्यांमध्ये जैवविविधतेबद्दल प्रशंसा वाढवणे हा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मुलींच्या संख्येत ४० टक्क्यांपर्यंत वाढ
“२०२४ सालापर्यंत २० लाखांहून अधिक तरुण ‘एनसीसी’मध्ये सहभागी झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत पाच हजार नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘एनसीसी’ची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी एनसीसीमध्ये मुलींची संख्या फक्त २५ टक्के होती.
आता ती सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जो एक मोठा बदल आहे. ‘एनसीसी’ तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना विकसित करते. पूर, भूकंप किंवा इतर कोणतीही आपत्ती असो, ‘एनसीसी’ कॅडेट्स मदतीसाठी सदैव तत्पर असतात,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.