मुंबई : “यशस्वी राजनीती हिंदूंना शिव्याशाप देऊन यशस्वी होत नाही, याचा प्रत्यय आपल्याला आला आहे. हिंदू मंदिरांबाबत सरकारने पक्षपात केला. याबद्दल हिंदूंनी विचार करणे गरजेचे आहे. चर्च, मशिदींच्या बाबतीत सरकारी धोरण वेगळे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या बाबतीत वेगळे, हा पक्षपात हिंदूंवर अन्याय करतो. सरकारी नियंत्रणातून मंदिरांची मुक्ती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राज्यांमध्ये समाज प्रबोधन करणे ही संघटनांची जबाबदारी आहे. हिंदुत्व समजण्यासाठी मौलिक ग्रंथरुपी संग्रहाचा ठेवा अमूल्य आहे. यामध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गाचा सहभाग आवश्यक आहे,” असे आवाहन ‘विश्व हिंदू परिषदे’चे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे ( Milind Parande ) यांनी केले. ते दादर येथील स्वामीनारायण योगी मंडप येथे संपन्न झालेल्या ‘हिंदी विवेक’ मासिक पत्रिकेत प्रकाशित ‘मंदिर : राष्ट्र के ऊर्जा केंद्र’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
“हिंदू मंदिरांच्या मूर्तीमागील तत्त्वाला मानतो म्हणून मंदिर नष्ट केले तरी विदेशी त्यातील देवत्व नष्ट करू शकले नाहीत, यातच हिंदू धर्माचे महात्म्य पाहायला मिळते. मंदिर समाजव्यवस्थेतील एक भव्य शक्ती आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मंदिरांचे मोठे योगदान आहे. मंदिरे उभारली म्हणजे ऊर्जाकेंद्रे बनतात असे नाही, तर उपासना, साधना, जागृती झाली पाहिजे. मंदिर व्यवस्थेचा विकास होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
“मंदिर व्यवस्थेवर बोलताना परांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माता अहिल्याबाई तसेच प्रभू श्रीराम व सीता मातेच्या आठवणींना उजाळा दिला. हिंदुत्वाचे महत्त्व सांगताना मुलांच्या प्रश्नांना पालकांकडे उत्तरे नाहीत. त्यामुळे याचे महत्त्व आजच्या भाषेत मुलांना समजावणे गरजेचे आहे. तशी समाजव्यवस्था हवी. हिंदू रक्षणामध्ये मंदिरांची भूमिका नेहमीच राहिली आहे. अध्यात्मिक शक्ती आराधना आपल्याला मंदिराशी जोडते. संघर्षाच्या कालखंडात विकृती आली, परंतु आपल्या मंदिर व्यवस्थेने समाजव्यवस्था मजबूत राहिली. विश्वात कमजोरी, गरिबीची पूजा होत नाही. त्यामुळे मंदिर जागरणमध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई दादर येथील श्री स्वामीनारायण योगी मंडप सभागृहात ‘हिंदी विवेक’ मासिक पत्रिकेत प्रकाशित ‘मंदिर : राष्ट्र के ऊर्जा केंद्र’ ग्रंथ प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मूर्ती विशेषज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, ‘झा कंस्ट्रक्शन प्रा. लि.’च्या डायरेक्टर मनोरमा झा, ‘विश्व हिंदू परिषदे’चे कोकण प्रांतमंत्री मोहन सालेकर, ‘गोवर्धन इको व्हिलेज’चे केशव चंद्र प्रभू, ‘हिंदुस्तान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, ‘हिंदी विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, ‘विश्व हिंदू परिषद’ प्रकाशित वर्ष २०२५च्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
‘हिंदी विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी प्रस्तावनेत ‘हिंदी विवेक’च्या १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. “हिंदी विवेक’ने प्रस्तुतिकरणात नेहमीच समाजाचे हित, सकारात्मकता अग्रगणी ठेवली. अनेक आक्रमणांनंतर ही सनातन परंपरा, संस्कृती, सांस्कृतिकता टिकून आहे. यात मंदिरातून समाजमनावर झालेल्या संस्काराचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच ‘मंदिर : राष्ट्र के ऊर्जा केंद्र’ या ग्रंथाचे निर्मिती झाली आहे,” असे सांगितले.
रमेश पतंगे यांनी ‘अध्यात्मिक शक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. “इच्छाशक्ती प्रबळ असल्यास मंदिर निर्माण अशक्य नाही. मंदिरे केवळ पैशांनी उभी राहत नाहीत तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व व्यवस्थेची आवश्यकता असते. त्यामुळे समाज उभा राहिला तर मंदिर उभे राहतात; समाज भग्न झाला तर मंदिरे भग्न झाली, म्हणून समजा. मंदिरांची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी समाज जागरण आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी मंदिर व्यवस्था समजावून सांगितली. “मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. गवंडीपासून अनेक घटक मंदिर उभारणीत समाविष्ट असतात. हे घटक एकत्र येऊन मंदिराची निर्मिती होते. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना प्रथम मंदिराची प्रदक्षिणा घ्यावी. त्याबाबत शिक्षण घ्यावे. बहिरदेव पूजा झाली की, त्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा, म्हणजे आपल्याला आपण मंदिराची संपूर्ण माहिती आत्मसात करून प्रवेश मिळवतो,” असे सांगितले.