मुंबई : “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला ( Mahayuti ) घवघवीत यश मिळाले आहे. भाजपने १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवला असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार जनतेचे पत्रातून आभार मानले आहेत. महायुतीचा महाविजय महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या विश्वासामुळे शक्य झाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
“महाराष्ट्र विधानसभा २०२४ सालच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो. मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जीवाचे रान करून वेळ-काळ न पाहता, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन,” अशा शब्दांत त्यांनी आभार मानले. तसेच, “आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतिशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील,” असे म्हणून “आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे त्यांनी म्हटले आहे.