मुंबई : घाटकोपरमधील भीमनगर परिसरात ‘लव्ह जिहाद’चा ( Love Jihad ) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिसांकडे आरोपीसह त्यांच्या परिवारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असताना मुंबईतही प्रकार उघड होऊ लागले आहेत. घाटकोपर येथील भीमनगरमध्येही राजस्थानी हिंदू मुलीच्याबाबतीत असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चिरागनगर-घाटकोपर येथील मुस्लीम तरुणाने अल्पवयीन मुलीची छेडछाड, शारीरिक संबंध, अश्लील व्हिडिओ केल्याचे उघड झाले. याबाबत तिच्या आईला माहिती मिळाली. मात्र, पुढील प्रकार टाळण्यासाठी आईकडून ५० हजार रुपये घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही सदर तरुण त्रास देत राहिला. दि. १५ नोव्हेंबर रोजी मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर काही दिवसांनी त्या मुलाने तिला धमकावून घर सोडून जाण्यास भाग पाडले. तसेच, या हिंदू परिवारातील मुलीला पळवून नेले. मात्र, मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या परिवाराने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सदर तरुणासह त्याचा परिवारावर ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याचप्रमाणे, सदर मुलीला पुन्हा पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.