खोसकरांच्या विजयाने अनेकांचे राजकारण संपुष्टात

25 Nov 2024 18:36:48
Khoskar

नाशिक : अनेक वर्षांपासूनचा काँग्रेसचा गड भेदत हिरामण खोसकर ( Khoskar ) यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार म्हणून विधीमंडळात दिमाखात प्रवेश केला आहे. यासोबतच सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याचा बहुमानही खोसकर यांनी पटकावला आहे. २०१९ साली काँग्रेसच्या तर २०२४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विजय संपादन केला आहे. इगतपुरीच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ८६ हजार, ५८१ मतांनी त्यांनी विजय संपादन केला आहे. तर त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना सलग दुसर्‍यांदा पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. यावेळी त्या तिसर्‍या क्रमांकावर राहिल्या. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुंबई आणि दिल्ली येथे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचे उंबरठे झिजवले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावित यांना मतदारसंघात परतावे लागले.

दोनवेळची आमदारकी, उबाठा, उरलीसुरली काँग्रेस आणि नाराजांची मोट बांधत निवडणुकीला सामोर्‍या गेलेल्या निर्मला गावित यांना इगतपुरीच्या मतदारांनी सपशेल नाकारले. उबाठा गटाच्या उपनेत्या असलेल्या गावित यांना मतदार इतक्या मोठ्या प्रमाणावर नाकारतील असे कोणालाही वाटले नव्हते. काँग्रेसने लकी जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळेल या अपेक्षेवर असलेल्या निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारीचे हत्यार उपसले. उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि नाराजांनी आपली ताकद निर्मला गावित यांच्या पाठीमागे उभी केली. मतदारांपुढे योजनांचे आणि वचननाम्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. याजोडीला अर्थकारणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. पण, इगतपुरीच्या मतदारांना हिरामण खोसकर यांच्यासह महायुती जवळची वाटली. ठेकेदारी, टक्केवारी, विकास आणि आरोपांची राळ उठवूनही हिरामण खोसकर यांनी मतदारांना आपलेसे करत विजयी केले. महायुतीच्या पदाधिकार्‍यांचे नियोजन, कार्यकर्त्यांची फौज, ‘लाडकी बहीण योजना’ आणि जोडीला ३ हजार, ३०० कोटींची विकासकामे खोसकर यांना विजयी करुन गेले.

राजकीय आत्महत्या...

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत इंजिनवर स्वार होण्याचा निर्णय घेतला. यासाठी मेंगाळ यांनी शिवसेनेत असलेले मानाचे स्थान आणि महामंडळ पणाला लावले. हट्टाने उमेदवारी केलेले काशिनाथ मेंगाळ चौथ्या स्थानावर फेकले गेले. या मतदारसंघात नावालाच असलेल्या मनसेची उमेदवारी करत काशिनाथ मेंगाळ यांनी आपली राजकीय आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार निर्मला गावित आणि काशिनाथ मेंगाळ यांच्याबरोबर उबाठा आणि शरद पवार गटाचे जिल्हा, तालुका, ग्रामीण नेते, यांचेही राजकारण इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून संपल्याचे बोलले जात आहे.

Powered By Sangraha 9.0