'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना धक्का; गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात

    25-Nov-2024
Total Views |

gokul
 
कोल्हापूर : (Gokul) कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणून प्रचलित असणारा गोकुळ दूध उत्पादक संघ. राज्यात निवडणूक पार पडताच 'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गोकुळ दूध उत्पादक संघातर्फे गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
 
गोकुळकडून दूध उत्पादकाकडून गायीच्या दुधाची ३३ रुपयांनी खरेदी केली जात होती. आता मात्र त्यात ३ रुपयांची कपात केल्याने गोकुळचे गायीचे दूध ३० रुपये प्रतिलीटरनी खरेदी करता येणार आहे. याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
या जास्तीच्या दरामुळे लोणी, दूध पावडर यांची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. दूध पावडर व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नसल्याने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला आहे.
 
सरकारकडून २८ रुपये दर निश्चिती
 
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ पासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर २८ रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ ३३ रुपये दर देत आहेत तो सहा रुपये जास्त आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात
 
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर खासगी दूध संघांनी सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे.