मुंबई : मतदानानंतरही ‘ईव्हीएम पॉवर पॅक’स्थिती ( EVM ) ९९ टक्के दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे १७२-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी १७२-अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही ‘काऊंटिंग युनिट’ (सीयू)मध्ये ‘ईव्हीएम पॉवर पॅक’स्थिती ९९ टक्के दर्शविली गेली. याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला होता.
भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करताना १७२-अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की, ‘ईव्हीएम पॉवर पॅक’ २ हजार मतांसह एक ‘सीयू’सह चार ‘बॅलेट युनिट’ (बीयू)ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेव्हा क्षमता जास्त असते, तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते. परंतु, जेव्हा बॅटरीची क्षमता ‘थ्रेशोल्ड’च्या खाली कमी होते, तेव्हा ते वेगाने घसरते.
एकच ‘बीयू’ आणि एक हजारापेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आऊटपुट व्होल्टेज ७.४ व्हीच्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ९९ टक्के क्षमता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य असून अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.