'टेस्ला’ कंपनीचे सर्वेसर्वा असलेले एलॉन मस्क त्यांच्या स्पष्ट आणि निर्भीड वक्तव्यासाठी कायमच चर्चेत असतात. मात्र, त्यापेक्षाही त्यांची ओळख निर्भीड कृती करणारा व्यावसायिक अशीही आहे. 2020 साली अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाची भूमिका संशयास्पद ठरली होती. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या अनेक खात्यांवर या समाजमाध्यमात बंधने घालण्यात आली होती. ‘ट्विटर’च्या भूमिकेचे बळी तर तत्कालीन अध्यक्ष ट्रम्पदेखील ठरले होते. त्यावेळी अमेरिकेत मुक्त भाषण स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे मस्क यांनी वारंवार सांगितले होते. या भाषण स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ‘ट्विटर’ खरेदी करण्याचेदेखील त्यांनी जाहीर केले आणि तसे केलेदेखील. मस्क यांच्या निर्णयाचा 2024 मधील निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना फायदा झाला.
हेच मस्क सध्या भारतीय निवडणूक यंत्रणेच्या भलत्याच प्रेमात आहेत. भारतीय निवडणूक यंत्रणेची मुक्तकंठाने त्यांनी नुकतीच प्रशंसा केली. मस्क यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे की, “भारतात 640 दशलक्ष मते अवघ्या 24 तासांमध्ये मोजली जातात. अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत काही राज्ये अजूनही त्यांची मते मोजत आहेत.” या संदेशाच्या माध्यमातून भारतातील निवडणूक यंत्रणेत असलेले ईव्हीएमचे महत्त्वदेखील त्यांनी विशद केले आहे. कारण, अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरामध्ये गेले 19 दिवस राष्ट्राध्यक्ष पदाच्या इलेक्टोरल मतांची मोजणी सुरूच आहे. कॅलिफोर्नियातील मतमोजणीत आतापर्यंत 25 हजार मते मोजून झाल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियामधील अनेक मते ही बॅलेटवर असून, यामध्ये स्वाक्षरी प्रमाणीकरण करणे, त्यानंतर आलेल्या मतपत्रिकांचे वर्गीकरण, त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी अशी आदर्श पद्धत आहे. त्यामुळे तिथे लागणारा वेळ हा भारतापेक्षा अधिक आहे. यावरच बोट ठेवत मस्क यांनी अमेरिकेतील यंत्रणाच कोलमडली असल्याची टीकादेखील केली आहे.
भारतात मात्र अमेरिकेसारखी अवस्था नाही. ‘भारतीय निवडणूक आयोग’ नावाची स्वायत्त आणि केंद्रित संस्था भारतात निवडणुकीचे कामकाज पाहात असते. त्यात मदतीसाठी इतर सुरक्षा व प्रशासकीय संस्था असतातही, मात्र निर्णयाच्या बाबतीत निवडणूक आयोग हा पूर्ण स्वायत्त असतो. भारतात पूर्वी बॅलेट पेपरवर निवडणुका होत असत. मात्र, नंतर भारताने ईव्हीएम यंत्रणेचा स्वीकार केला. त्यामुळे निवडणुकांचे चित्र, तसेच निवडणुकांना लागणारा प्रत्यक्ष वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. मात्र, अमेरिकेला हे अजूनही जमलेले नाही. याचे कारण त्यांच्यातील सदोष मतदान पद्धतच आहे. अर्थात, ही सदोष पद्धतच त्यांना नित्याचीच झाल्याने, त्यातील दोष त्यांना उमजत नाहीत, एवढेच! भारतातील विरोधक कायमच स्वतःच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडताना दिसून येतात. अनेकजण तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, यासाठी मोहिमा चालवताना दिसतात. पण, या आरोप करणार्यांना आजवर ‘भारतीय निवडणूक आयोगा’ने अनेकदा आवाहन करूनदेखील ईव्हीएम हॅक करता आलेले नाही. या परिस्थितीमध्ये मस्क यांचे विधान भारतीय विरोधी पक्षांना विचार करण्यास भाग पाडणारे आहे. मात्र, ते विचार करतील याची शक्यता दुरापास्तच!
मात्र, एक गोष्ट मस्क यांच्या विधानाने पुन्हा अधोरेखित झाली आहे, ती म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती होय! सध्याच्या घडीला तंत्रज्ञान क्षेत्रात भारत पराकोटीची उड्डाणे घेत आहे. त्याची भुरळ संपूर्ण विश्वाला पडलेली आहे. जेव्हा संपूर्ण ‘कोविड’ काळात अनेक प्रगत देशांतील नागरिक लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष दाखवत होते, त्यावेळी भारतीय मात्र ‘कोविन’च्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र दाखवत जगभर प्रवास करत होते. भारतानेे विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरणदेखील वेळोवेळी केले आहे. ‘व्हीव्हीपॅट’ हे त्याचे उत्तम उदाहरण! यामुळेच जगातील अनेक देशांनी भारताच्या या ईव्हीएम यंत्रणेचा स्वीकार करण्यात रस दाखवला आहे. अमेरिकेतदेखील यंत्रणांना सक्षम करण्याचे खाते मस्क यांच्याकडेच आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत पुढील निवडणुका ईव्हीएमवर घेण्याचे शिवधनुष्य मस्क पेलणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कौस्तुभ वीरकर