थोडे तरी प्रामाणिक व्हा!

25 Nov 2024 21:44:23
editorial on maharashtra election result mva blames evm


लोकशाहीला वाचविण्याच्या बाता मारणारे विरोधी पक्षांचे नेते हेच मुळात लोकशाहीविरोधी मानसिकतेचे आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी मतदारांनी दिलेला कौल न मानण्याइतका उद्दामपणा दाखविणार्‍य विरोधी नेत्यांची लोकशाहीविरोधी वृत्ती उघड झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि आघाडीचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी या ईव्हीएमचे आणि मतमोजणी यंत्रणेचे खूप कौतुक केले आहे. अनेक देशांनीही भारताकडे या यंत्रांची मागणी केली आहे. पण, केवळ सत्तेची हाव लागलेल्या विरोधकांची निवडणुकीचे वास्तव स्वीकारण्याची तयारी दिसत नाही.

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ‘अनाकलनीय’ आहे,” असे म्हणणार्‍या विरोधी नेत्यांच्या त्यावरील प्रतिक्रियाच खरे तर अनाकलनीय आहेत. लोकशाहीत मतपेटीद्वारे जनता आपला निर्णय व्यक्त करते. जो काही निर्णय असेल, तो निमूटपणे मान्य करणे, हे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे कर्तव्य आहे. पण, मनात सरंजामशाही वृत्ती भिनलेल्या आणि आपल्या विरोधी मताबाबत अतिशय असहिष्णू असलेल्या महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनी आता विधानसभांचा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. आधीच्या निवडणुकीत दगाबाजी करून सत्ता प्राप्त केल्यानंतर यापुढेही अशाच प्रकारे सत्ता मिळविण्याची स्वप्ने रंगविणार्‍या उद्धव सेना, काँग्रेस आणि पवार काँग्रेस या पक्षांना राज्यातील जनतेने त्यांच्या या दगाबाजीची शिक्षा घडविली आहे. या नेत्यांच्या सत्ताप्राप्तीची स्वप्ने धुळीस मिळाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, ते सैरभैर झाले आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने आजवर कोणत्याच आघाडीला इतके दणदणीत बहुमत दिले नसल्याने प्रथमदर्शनी हा निर्णय आश्चर्यकारक वाटतो, हे खरे. तसेच केवळ सहाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना पराभवाचा तडाखा दिल्यामुळे त्याच्या अगदी विरुद्ध लागलेला विधानसभा निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक म्हणावा लागतो. या निकालाचे विश्लेषण केल्यावर तो इतका धक्कादायक नव्हता असेच दिसून येईल. पण, विरोधी नेत्यांना हे विश्लेषण करायचे नाही आणि वास्तवाला सामोरे जाण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांना सहा महिन्यांपूर्वीच्याच काळात वावरायचे असल्याने त्यांनी हा निकालच अमान्य करण्याची भूमिका घेतली आहे. खरे म्हणजे ही भूमिकाच ‘अनाकलनीय’ म्हणावी लागेल.

उद्धवसेनेला हा निकाल फारच झोंबला असल्यास नवल नव्हे. दगाबाजी करून मिळालेली सत्ता स्वपक्षीय आमदारांनी पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून त्यांच्या हातून हलकेच काढून घेतली, हा त्यांना बसलेला पहिला धक्का होता. याच आमदारांनी भाजपच्या मदतीने मंत्रिमंडळ बनवून उत्तम आणि विकासाभिमुख कारभार करून जनतेचे आशीर्वाद मिळविले, हा त्यांना बसलेला दुसरा धक्का होता. त्यानंतर जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा लक्षात घेऊन आणि गरजूंना आर्थिक आधार देणार्‍या योजना राबविल्यामुळे जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देत त्यांच्या अपेक्षांचा कडेलोटच केल्याने उद्धव सेना पूर्णपणे बावचळून गेली आहे. या पक्षाचे वाचाळ, बेताल आणि स्वयंभू नेते संजय राऊत यांनी आपला पक्ष हा निकाल मान्य करणार नाही, असे जाहीर करून टाकले. अर्थात त्यांच्या मानण्या-न मानण्याने कसलाच फरक पडत नाही.
 
सत्ता म्हणजे पैसे कमावण्याचे साधन इतकीच संकुचित आणि स्वार्थी समजूत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस या पक्षांनीही या निकालाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. जी निवडणूक हे पक्ष हरतात, तेथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे योग्य प्रकारे काम करीत नसतात, हा त्यांचा लाडका आरोप आहे. झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे त्या राज्यातील ईव्हीएमबाबत त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही, इतकीही दुटप्पी आणि ढोंगी वृत्ती आहे. उद्या कॅल्क्युलेटरमध्ये दोन अधिक दोन अशी बटणे दाबल्यावर उत्तर चारच कसे येते, यावरही हे नेते शंका उपस्थित करतील!

शरद पवार यांच्या उरल्यासुरल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, तर केवळ दहा आमदार निवडून आणता आले आहेत. दगाबाजी करण्याच्या आपल्या पेटंट सवयीनुसार पाच वर्षांपूर्वी त्यांनी जनतेने दिलेला कौल फिरविला होता. यावेळीही अशीच काही चलाखी करता येईल, या अपेक्षेत असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचाही हा भरभक्कम निकाल पाहून तोल सुटला आहे. पवार यांना चलाखी करण्यासाठी काही वावच जनतेने शिल्लक ठेवलेला नसल्याने पवार यांनीही ईव्हीएमवर संशयाचा राग आळविला आहे. त्यातून त्यांचे वैफल्य स्पष्ट होते.

देशात लोकसभा आणि काही विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातात. त्यात ओडिशा या राज्याचा समावेश होतो. आजवर अनेकदा ओडिशातील जनतेने राज्यात बिजू पटनाईक यांना बहुमत देतानाच लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या भाजपला अधिक जागी विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे ईव्हीएममधील घोटाळ्याचा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा सिद्ध होतो. हा आरोप सिद्ध करण्याचे आव्हान भारताच्या निवडणूक आयोगाने कोणालाही दिलेले आहे. पण आजवर एकाही राजकीय पक्षाला किंवा तंत्रज्ञाला ते सिद्ध करून दाखविता आलेले नाही.

अमेरिकेतील उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी एकाच दिवसात 60 कोटींपेक्षा अधिक मतांची मोजणी होत असल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. अमेरिकेने भारताकडून हा शहाणपणा शिकून घ्यावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. अनेक देशांनी भारताकडे भारतीय बनावटीच्या ईव्हीएमची मागणी नोंदविली असून या प्रकारच्या यंत्रांबद्दल उत्सुकता दर्शविली आहे. सारे जग ज्या गोष्टीचे कौतुक करीत आहे, त्यावर भारतातील कोत्या मनोवृत्तीचे विरोधी नेते संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे दुर्दैवी आहे.

1984च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवर विजय मिळाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती. ती लोकसभा निवडणूक ही अपवादात्मक होती. तरीही केवळ चार वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या भाजपची सुरुवात निराशाजनक होती. पण त्यामुळे ना या पक्षाचे नेते खचले, ना त्यांनी हा अभूतपूर्व निकाल नाकारला! त्यांनी शांतपणे नव्याने आपल्या कामाला प्रारंभ केला आणि राक्षसी बहुमत मिळविलेल्या राजीव गांधी यांच्या सरकारमधील भ्रष्टाचार उघड करून केवळ पाच वर्षांतच त्यांना सत्तेवरून खाली खेचले. हे असते खर्‍या विरोधी पक्षाचे काम. त्यासाठी आपल्या कामावर, तत्त्वांवर निष्ठा, संयम आणि जनतेवर विश्वास असावा लागतो. या विरोधकांनी थोडासा जरी प्रामाणिकपणा दाखविला, तर त्यांची उरलेली मूठभर विश्वासार्हता तरी शिल्लक राहील. पण, सत्ता हेच अंतिम आणि एकमेव ध्येय असलेल्या राज्यातील बाजारबुणग्या विरोधी पक्षांकडून तशी अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल.
 

Powered By Sangraha 9.0