आपण जे अन्नसेवन करतो, त्याचा थेट परिणाम हा साहजिकच शरीरावर होतो. त्यामुळे आहारसेवन करताना कोणता आहार करावा याबरोबरच कोणत्या वेळी तो सेवन करावा, नेमके काय खाणे टाळावे यांसारख्या सर्व पैलूंचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, आजच्या आहारीय संकल्पनेच्या दुसर्या भागात याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
मनुष्याच्या प्राथमिक तीन गरजांपैकी अन्न ही एक गरज आहे. मनुष्य प्राणी हा एकमेव असा प्राणी आहे की जो अन्न शिजवून खातो. विविध देशांमध्ये विविध पाककृती आहेत. त्यातील जिन्नस, पदार्थ भिन्न भिन्न आहेत. पण, बहुतांशी देशांमधून अन्नसामग्री वाफवून, तळून, भाजून किंवा शिजूवन व्यंजने तयार केली जातात. या पाककृती पचण्यास सोप्या व्हाव्यात, म्हणून अन्नसामग्रीवर विविध संस्कार केले जातात. भिन्न भिन्न देशांच्या भौगोलिक स्थितीनुरूप तेथील धान्य, फळे, पशु-पक्षी (मांस) यात बदल आहे. पण, ते अन्नपदार्थ त्या प्रदेशाला, त्या ऋतुला सात्म्य होणार असते.
काही अन्नपदार्थ वेगवेगळे खाल्ले की शरीराच्या पोषणामध्ये हितकर, फायदेशीर ठरतात आणि ते अन्नपदार्थ एकत्र करून खाल्ल्यास शरीरासाठी ते अपायकारक ठरू शकतात. उदा. दूध आणि मासे, बरेचदा मांसाहार (विशेषतः मासे खाताना दुधाचे पदार्थ टाळले जातात. पण, अनावधानाने किंवा नकळत (क्वचित ‘त्यात काय होते?’ या विचारानेही) दुग्धाहार किंवा दुग्धजन्य पदार्थ (खीर, बासुंदी, मिठाई इ.) खाल्ल्यास, त्वचेवर लाल चट्टे उमटणे खाज (तीव्र स्वरुपाची), खाजवल्यास आग होणे व अस्वस्थता इ. लक्षणे उत्पन्न होतात. शरीराला अपायकारक असे आहारीय संयोग यालाच ‘विरुद्धाहार’ असे म्हटले जाते. ‘विरुद्धाहारा’मुळे शरीरातील सुसंगत व्यवहारात बाधा येते. काही वेळेस ही बाधा शरीरातील पेशींच्या नवनिर्मिती कार्यात अडथळा आणतात. काही वेळेस मृत पेशींचा शरीरातून नीचरा नीट होत नाही व काही वेळेस त्यांच्या कार्यातही बाधा उत्पन्न होते. ‘विरुद्धान्न’ म्हणजे थोडक्यात 'INCOMPATIBLE DIET.'
‘विरुद्धाहार’ म्हणजे फक्त "WRONG COMBINATION OF FOOD ITEMS' इतकेच नव्हे, तर त्याचबरोबर, 'WRONG PROCESSING' (चुकीच्या पद्धतीने तयार करणे. उदा. दूध फाडून त्यापासून पदार्थ तयार करणे.) जसे छेना, पनीर इ. दुधात लिंबू पिळून दूध फाडले जाते व ते बांधून, त्यातील द्रव भाग काढून टाकला जातो. जो घन भाग उरतो, त्यापासून बंगाली मिठाया व पनीरचे पदार्थ बनविले जातात. असे बघण्यात येते की छेना व पनीरचे पदार्थ ज्यांच्या आहारातून अधिक प्रमाणात खाल्ले जातात, त्यांच्यात पुढे जाऊन पोटाच्या तक्रारी, शौचाच्या तक्रारी विविध त्वचाविकार इ.चे प्रमाण अधिक आढळते. 'Wrong Combinathions' (विरुद्ध संयोग) याबद्दल सविस्तर पुढील लेखात सांगीन.
काही वेळेस आहार उत्तम असतो. पण, तो अतिप्रमाणात खाल्ला जातो किंवा कमी प्रमाणात खाल्ला जातो. हल्ली बर्याच घरांमधून मोबाईलवर कार्टुन्स किंवा बडबड गीते किंवा तत्सम काही लावून दिले जाते आणि मग लहान मुलाला जेवायला बसविले जाते. घरातील मंडळी असे सांगतात की, हे लावून दिले नाही, तर ते बाळ एका जागी बसत नाही किंवा जेवतच नाही. पण, जेव्हा असे काही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप वर्तमानपत्र इ. बघत-वाचत जेवले जाते, तेव्हा बरेचदा ‘ओव्हरईटिंग’ होते (विशेषतः लहान मुलांमध्ये) घरच्यांनाही वाटते की, ते बाळ खात आहे, तर दोन घास जास्त खाऊ दे, पण काही वेळस या ‘ओव्हरईटिंग’ने पोटदुखी, उलटी, अजीर्ण इ. तक्रारी उद्भवतात आणि मग डॉक्टरांकडे जाऊन या लक्षणांची चिकित्सा केली जाते, ज्याची खरी गरज नसते. ‘ओव्हरईटिंग’ थांबविल्यास ही लक्षणे उद्भवणे ही थांबते. आयुर्वेदशास्त्रात जेवताना ‘तन्मनाभुञ्जीत’ असे सांगितले आहे. म्हणजे, जेवताना तन आणि मन संपूर्णपणे त्या आहार सेवनामध्ये असावे. मोठ्यांमध्ये ‘ओव्हरईटिंग’ सहसा होत नाही. पण, अन्नाची चव नीट कळत नाही. ती रजिस्टर होत नाही आणि तोंडातून लाळनिर्मिती कमी होते. अन्न नीट लाळेत मिसळत नाही. कोरडे कोरडे वाटते. मग पाण्याचे प्रमाण जेवणाच्या वेळेस अधिक घेतले जाते. यामुळे पाचक स्राव थोडे पातळ होतात. या सगळ्यामुळे पचनशक्ती बिघडते, क्वचित प्रसंगी मंदावते. मग, पोट फुगणे, भरल्यासारखे वाटणे, शौचास साफ न होणे, खडा होणे इ. तक्रारी निर्माण होऊ शकतात.
काही वेळेस ‘कॅ्रश डाएटिंग’च्या नावाखाली अन्नाची मात्रा एकदम कमी केली जाते. बरेचदा घरातील लग्न-समारंभापूर्वी, वजन कमी करण्याच्या अट्टहासापायी असे केले जाते. (विशेषत: महिलांमध्ये) संध्याकाळी फक्त कुरमुरे, लाह्या इ. काहीतरी खाऊन भरपूर पाणी प्यायले जाते किंवा फक्त थोडी फळे (त्यातही आंबट चवीची फळे अधिक) खाऊन राहिले जाते. असे केल्याने त्वचा कोरडी पडते, तेज कमी होते, पित्ताचे त्रास होतात व वातही होऊ शकतो. पुन्हा केवळ लक्षणांची चिकित्सा, औषधोपचार केले जातात. पण, ज्यामुळे ते निर्माण झाले आहे, त्या कारणावर (हेतूवर) लक्ष दिले जात नाही. आयुर्वेदामध्ये हेतू (निदान) परिवर्जन म्हणजे, ज्या कारणाने ती लक्षणे निर्माण झाली आहेत, त्या कारणांना थांबविणे ही चिकित्सेची पहिली पायरी सांगितली आहे.
काही वेळेस आहार मात्रा योग्य असते, पण वेळ चुकीची असते. आयुर्वेदशास्त्राने सतत चर्वण करणे चुकीचे सांगितले आहे. गायी-बकर्या या सतत फिरत असतात आणि थोडे थोडे गवत खात असतात. गायींना चार उदरे असतात. खाल्लेले अन्न पहिल्या उदरातून पुन्हा तोंडात आणतात, नीट चावतात आणि मग ते दुसर्या उदरात जाते. अशी सोय मनुष्यप्राण्यांत नाही. त्यामुळे सतत थोडे थोडे खाणे टाळावे. तसेच, पोटाला तडस लागेल इतके खाऊ नये. पोटाचे चार भाग योजावे. त्यांतील दोन भाग घन आहाराने, एक भाग द्रव आहाराने भरावा व उर्वरित एक भाग रिकामा ठेवावा. तेव्हाच खाल्लेले अन्न नीट पचू शकते. आहाराची मात्रा प्रत्येक व्यक्तीची भिन्न भिन्न असते. ऋतूनुसार ही आहाराची मात्रा बदलते. म्हणजे, उन्हाळ्यात तहान अधिक लागल्याने पाणी अधिक लागते, द्रवाहार थोडा जास्त केला जातो, तर थंडीत स्वाभाविकतः भूक जास्त लागते. अशा वेळेस चार घास जास्त खाल्ले जातात. हे स्वाभाविक आहे आणि ऋतुसापेक्ष बरोबरही आहे. एकदा खाल्ल्यावर साधारण चार तास काहीही खाऊ नये, पण सहा तासांच्या वर पोट रिकामे ठेवू नये, हा एक सामान्य नियम आहे.
बरेचदा रात्री उशिरा जेवले जाते. दिवसभरातून एकदाच घरातील मंडळी एकत्र भेटतात. म्हणून साग्रसंगीत (गोडधोड, मांसाहार इ. युक्त) जेवण जेवले जाते.पण, रात्रीच्या वेळेला पचायला हलके असे अन्नसेवन करावे. कारण, रात्रीची वेळ ही शरीराची झीज भरून (WEAR & TEAR) काढण्याची वेळ असते. पचनासाठी शारीरिक प्रक्रिया जर वापरली, तर ही झीज भरून काढण्याची प्रक्रिया बाधित होते. सकाळी उठल्यावर मलूल वाटणे, ताजेतवाने न वाटणे, अंग जड होणे इ. लक्षणे उत्पन्न होतील. दिवसा तयार केलेले अन्न दुसर्या दिवशी खावे लागू नये, म्हणून रात्रीच संपविण्याचा बर्याच घरांमधून अट्टहास असतो, तेही टाळावे. काहींना रात्रीचे जेवण झाल्यावर फलाहार करण्याची सवय असते किंवा बाहेर चालायला जातात आणि अजून काही खातात. या सवयी चुकीच्या आहेत. बरेचदा रुग्ण सांगतात की, रात्री लवकर जेवलो तर झोपताना भूक लागते. पण, ही आपणच सवय लावलेली असते आणि सवय सोडविणे हेदेखील आपल्याच हातात असते. अगदीच सवय सुटत नसल्यास जेवणाची विशेषतः रात्रीच्या जेवणाची वेळ लवकर करावी व झोपताना लाह्या (साळीच्या) व दूध घ्यावे. सकाळचा आहार राजासारखा, दुपारचा सामान्य जनासारखा आणि रात्रीचा भिकार्यासारखा असावा, असे म्हटले जाते, ते चुकीचे नाही. (क्रमश:)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
vaidyakirti.deo@gmail.com