बिमलजी संघसमर्पित स्वयंसेवक

25 Nov 2024 13:26:19
Bimal Kediya

बिमल केडिया यांनी आपल्या सार्थक आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण केलीत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना आभाळभर शुभेच्छा...

नेमकेपणाने सांगता येत नाही, पण माझा आणि बिमलजींचा परिचय २००३ सालच्या सुमारास झाला असावा. मला ‘विश्व हिंदू परिषदे’च्या जबाबदारीतून नुकतेच मोकळे करण्यात आले होते. त्यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाचे काम सुरू केले होते. काही तात्विक मतभेदांमुळे परिषदेच्या अधिकार्‍यांचा त्याला विरोध होता. अशा स्थितीत हे काम कसे उभे राहणार? परिवारातील एका संस्थेचा विरोध असताना, अन्य कोण याला सहकार्य करणार? स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करायचा, तर त्याचे ट्रस्टी कोणाला करायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली. अशा मनस्थितीत बिमलजींची भेट झाली, बोलणे झाले. त्यांना कामाचे महत्त्व समजल्यावर त्यांनी धीर दिला. स्वतः विश्वस्त होण्याची तयारी तर दर्शवली, पण त्याबरोबरच अन्य चार जणांना विश्वस्त म्हणून जोडले. त्याही पुढे जाऊन या कार्यासाठी बेडेकर सदन, माहीम पश्चिम येथे कार्यालयसुद्धा मिळण्याची व्यवस्था केली. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे’ या त्यांच्या त्यावेळेच्या आश्वासक वाक्याने मुंबईच्या एका छोट्या अंगणात लावलेला नैतिक शिक्षणाचा वेलू गगनावरी गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज २१ राज्यांत या कामाचा विस्तार झाला आहे. दोन लाख विद्यार्थी दरवर्षी या उपक्रमात सहभागी होत आहेत. अशावेळी मागे वळून पाहताना, बिमलजींचा कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा स्वभाव महत्त्वाचा वाटतो.

बिमलजी ७५ वर्षांचे झाले असे वाटतच नाही. आजही त्याच उत्साहाने, नव्या उमेदीने, नवनवीन कल्पना मांडतात आणि त्या यशस्वी करताना दिसतात. एकदा त्यांच्या कार्यालयात बसलो होतो आणि त्यांनी सुचवले की, आपल्या कार्यात पारदर्शकता हवी. सर्व दानदात्यांना, हितचिंतकांना आपण वर्षभर काय केले, याची माहिती आपण दिली पाहिजे. त्यासाठी आपण ‘वार्षिक अहवाल’ (स्मरणिका) काढायला हवा. त्या एका सूचनेतून आम्ही सर्व विश्वस्त कामाला लागलो. आता बिमलजी प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदावर नाहीत. पण, गेली २० वर्षे न चुकता अगदी वेळेवर स्मरणिका प्रकाशित होत आहे.

आपल्या अभ्यास वर्गांमध्ये ‘कार्यकर्ता’ विषय मांडताना आपण ‘आत्मियतापूर्ण संबंध’, ‘स्नेहपूर्ण व्यवहार’ आदी शब्द वापरत असतो. पण, बर्‍याचदा त्याचा अर्थ ध्यानात येत नाही. कधी-कधी ते केवळ शब्दांचे बुडबुडे वाटतात. मला नेमका दिवस आठवत नाही. पण, सकाळची वेळ असेल. बिमलजी 9 वाजता घरी आले. चहा घेता-घेता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि बोलता-बोलता माझ्या हातात एक पिशवी ठेवली आणि म्हणाले, “ये आम हमारे वाडा फॅक्टरी के पास लगे पेड के हैं, बहुत मिठे हैं, कल गाडी में डालकर लेकर आया था.” मी कोण होतो! माझ्याकडे संघाची कोणतीही जबाबदारी नव्हती. माझ्याकडून त्यांचे कुठलेही काम होणार नव्हते. पण, तरीही नि:स्वार्थ स्नेहाचा अनुभव मी घेत होतो.

‘अप्प दीपो भव’ हे भगवान गौतम बुद्धांचे महत्त्वपूर्ण वचन. बिमलजी या मंत्राचे अनुसरण स्वतः करायचे आणि मलाही नेहमी सांगायचे, “किसी की रेखा मिटाने के बजाय, अपनी रेखा लंबी खिचो, तुमको कोसनेवाले, विरोध करनेवाले, तुम्हारे प्रशंसक बनेंगे.” प्रत्येक काम करतानाचे त्यांचे नियोजन, वेळेचे भान, नेमकेपणाने विषय मांडण्याची हातोटी, संपर्कात आलेल्या व्यक्तींची डायरीत नोंद करण्याची पद्धत आणि त्या व्यक्तीचा पाठपुरावा करून त्याला कार्यात जोडण्याची कुशलता आदी गोष्टींनी मला खूपच प्रभावित केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा मला खूप हेवा वाटायचा. बिमलजी फोन करतात आणि ती व्यक्ती ‘बिमल शरणमं गच्छामि’ म्हणते, याचे मला नेहमीच कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटायचे. मला वाटायचे अशी कार्यकुशलता, माणसे जोडण्याची आणि त्यांना कार्यरत ठेवण्याची योजकता, मोठी स्वप्न बघून ती साकार करण्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी माझ्यामध्ये यायला हवी. मी त्यांच्या गत काही वर्षांच्या सहवासातून अशा अनेक गोष्टी टिपत आलो. त्याचा व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात उपयोग केला. मला वाटते, गेल्या काही वर्षांत ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’चा विस्तार अनेक राज्यांत होण्यामागे आणि संघ परिघाबाहेरील शेकडो माणसे जोडण्यात मी जो यशस्वी झालो, त्याचे श्रेय माझे गुरु बिमल केडिया यांचे आहे. आज त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मी ते त्यांच्या चरणी विनम्रपणे अर्पण करतो.

त्यांच्याकडे किती प्रकारच्या वह्या होत्या माहीत नाही, प्रत्येक विषयासाठी वेगळी डायरी. त्याशिवाय शर्टच्या खिशात एक छोटी डायरी. एखादी गोष्ट ठरली की, ते लगेच त्यांच्या खिशातील छोट्या डायरीत नोंद करायचे. बर्‍याचदा मी बैठकांच्या तारखा आणि वेळा विसरून जायचो. पण, बैठकीच्या ठरलेल्या दिवशी ते सकाळीच फोन करणार आणि म्हणत असे “आज हम मिल रहे हैं ना..” संघकार्यात जसे काटेकोरपणे वेळेचे पालन करत तसेच नियोजन ते आपल्या व्यवसायातही करीत असत. संध्याकाळी 5 नंतर व्यवसाय नाही. त्यानंतरचा वेळ केवळ आणि केवळ संघकार्यासाठी. कधी-कधी वेळ ठरविलेला कार्यकर्ता ठरलेल्या ठिकाणी वेळेवर हजर नसायचा, फोन करून स्मरणही करत नसे, तरीही बिमलजी त्या नगरात-भागात शाखेवर निष्ठेने प्रवास करत. ‘प्रपंच करून परमार्थ साधता येतो’ या संतांच्या शिकवणीला स्वतःच्या जीवनात चरितार्थ करणार्‍या अमृतपुत्राचे नाव आहे बिमल केडिया!

बिमलजींबद्दल अनेक जण लिहिणार आहेत, कितीही बोललो, लिहिले तरी संपूर्ण बिमलजी समजणार नाहीत. संघाच्या अनेक जबाबदार्‍या त्यांनी स्वीकारल्या, समर्पण भावनेने त्या निभावल्या, जबाबदारीतून मुक्त केल्यानंतरही कोणतीही कटूता न ठेवता तेवढ्यात स्थितप्रज्ञतेने ते कार्यरत राहिले. त्यांच्या ‘अभीष्टचिंतन’ कार्यक्रमानिमित्त लिहिताना एका प्रसंगाची आठवण होते.

पंजाबमधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’नंतर लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेकजण त्यांच्या अनेक गुणांचे रसभरित वर्णन करत होते. परंतु, कुणाच्याही भाषणात एक महत्त्वाची गोष्ट आली नव्हती, शेवटी एक वक्ता उभा राहिला आणि म्हणाला, “त्यांचे एका वाक्यात मोठेपण सांगायचे झाले, तर असे म्हणता येईल की, ’He is a true Soldier’. हाच त्यांचा खरा बहुमान आहे.”

आज या ‘अभीष्टचिंतन’ कार्यक्रमात बिमल केडिया यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा परिचय करायचा झाल्यास असे म्हणता येईल, ’He is a true Swayamsevak.’

आदरणीय बिमल केडिया यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ आणि ‘विश्व हिंदू परिषदे’च्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा...

मोहन सालेकर

(लेखक संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि विश्व हिंदू परिषदचे कोकण प्रांत मंत्री आहेत.)
Powered By Sangraha 9.0