महाराष्ट्रात १ कोटी, ५१ लाख सदस्य जोडणार

25 Nov 2024 14:30:01
Bawankule

मुंबई : “विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात ‘पक्ष सदस्यता ( Member ) नोंदणी अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात १ कोटी, ५१ लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे,” अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. जयकुमार रावल, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. “रविवारपासून या अभियानाला प्रारंभ झाला असून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील हे या अभियानाचे प्रदेश संयोजक आहेत. सुनील राणे हे मुंबई विभाग संयोजक असून माधवी नाईक, अतुल काळसेकर यांच्याकडे कोकण विभाग, प्रा. अनिल सोले, नितीन भुतडा यांच्याकडे विदर्भाची, राजेश पांडे, विक्रम पावसकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र विभागाची, विजय चौधरी यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची, तर संजय केनेकर, किरण पाटील यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली,” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सदस्यता मोहिमेला सुरुवात झाली आहे. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या, त्या राज्यांत सदस्य नोंदणीचा कार्यक्रम निवडणुकीनंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता राज्यव्यापी ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणे हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केलेल्या चुकीचा परिणाम आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत खोटी विधाने करून मतदारांची फसवणूक केली. विधानसभा निवडणुकीत जेव्हा लोकांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी विरोधकांना बाहेर काढले.”

भाजपचा मतदानाचा टक्का वाढला

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जाते. योगी आदित्यनाथ यांच्या सभांना राज्यात प्रचंड गर्दी जमायची. अनेक उमेदवार त्यांच्या सभेची मागणी करायचे. विशेष म्हणजे, त्यांच्या ’बटेंगे तो कटेंगे’ यासारख्या वक्तव्यांनी हिंदू मतदार एकवटला आणि भाजपचा मतदानाचा टक्का वाढला,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सज्जाद नोमानी यांच्या फतव्यावर बावनकुळे म्हणाले की, “निवडणुकीत अशा प्रकारे धार्मिक घोषणा करणे, कोणत्याही धर्मासाठी योग्य नाही. अशा लोकांना जाणीवपूर्वक भाजपला लक्ष्य करायचे असते. अशा विधानांनी आम्हाला त्रास होत नाही,” असेही त्यांनी सांगितले.

मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपचे सदस्य

तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून ८८००००२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल. मिस्ड कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल.

Powered By Sangraha 9.0