मुंबई : भाजपचा ( BJP ) बालेकिल्ला असलेला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड या सहापैकी पाच मतदारसंघांत शिवसेना-भाजप महायुतीने विजय मिळविला आहे. केवळ मालाड पश्चिम या मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख चौथ्यांदा विजयी झाले असून, भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याशिवाय उर्वरित पाच जागांमध्ये महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे दहिसर, मागाठाणे आणि कांदिवली पूर्व या तीन मतदारसंघामध्ये उमेदवारांना हॅट्ट्रिक मिळवण्यात यश आले आहे.
दहिसर मतदारसंघात उबाठाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी विद्यमान आ. मनिषा चौधरी यांना प्रचारात कडवी झुंज दिली होती. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. या मतदारसंघात एकूण १ लाख, ६० हजार मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ९८ हजार, ५८७ मते मनिषा चौधरी यांना, तर ५४ हजार, २५८ मते घोसाळकर यांना मिळाली.
तर मागाठाणे मतदारसंघात यावेळी शिवसेनेच्या दोन गटात लढत होती. शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आणि उबाठा उदेश पाटेकर यांच्यात लढत झाली. त्यात प्रकाश सुर्वे यांनी मोठा विजय मिळवला. सुर्वे यांना तब्बल एक लाखहून अधिक मते मिळाली. तर उदेश पाटेकर यांना ४७ हजार मते मिळाली. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी तिसर्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल सव्वा लाख मते मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसच्या कालू बुधेलिया यांना पराजित केले.
बोरिवलीकरांनी भाजपचे नवखे उमेदवार संजय उपाध्याय यांना १ लाख, ३९ हजाराहून अधिक मतांनी विजयी केले. तर उबाठाचे संजय भोसले यांचा तब्बल १ लाख, २५७ मतांनी पराभव झाला आहे. तर चारकोप विधानसभा मतदारसंघात भाजपचे योगेश सागर यांनाही १ लाख, २७ हजाराहून अधिक मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या यशवंत सिंह यांचा तब्बल ९१ हजार मतांनी पराभव केला. मात्र, मालाडमध्ये काँग्रेसचे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघावर मात्र भाजपला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांचा पराभव केला.