बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मोर्चाचे पोस्टर्स लावायचे आहेत, तर गोंद हवा आहे. मिळेल का?” बिमल लगेच म्हणाले, “ठीक आहे. संध्याकाळी कार्यालयात पाठवून देतो.” तेव्हा पहिल्यांना मला आश्चर्याचा धक्का बसला. का तर, आपल्याला हवी असलेली गोष्ट त्वरीत कार्यालयात येत होती. त्या प्रसंगानंतर माझ्या आयुष्यात ‘बिमल’ नावाचं गारूढ सुरू झालं.
एकेदिवशी कामानिमित्त पार्ले येथे असताना तिथल्या भाग कार्यवाहंसोबत आमची भेट झाली. तेव्हा बिमल यांनी विचारलं, “विलास यांच्याशी परिचय आहे का?” मी म्हटलं, “नाही.” बिमल म्हणाले, “असं कसं? पुण्यात कामाला असून भाग कार्यवाहंसोबत तुझा परिचय नाही?” आमचं पण तरुण रक्त होतं. मी उत्तर दिलं,“ हे भाग कार्यवाह असून यांचा आमच्याशी परिचय नाही? भाग कार्यवाहंशी आमचा परिचय नाही, हे बिमल यांनी खिलाडू वृत्तीने घेतले आणि त्यांना पटलेही. असा तेव्हाचा गमतीशीर किस्सा होता. पुढे विद्यार्थी परिषदेचे काम थांबवल्यावर विचार केला, आता काय करायचं? तेव्हा बिमल यांनी एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, “जी नोकरी करशील, त्यात ‘सेटल’ होणं महत्त्वाचं आहे. तसं झालं, तर लवकर स्थिरता येईल आणि त्यासोबत संघाचं कामही सुरळीत चालू राहील.”
माझे सासरे दादा घैसास आणि बिमल हे चांगले मित्र होते. दोन वर्षांनंतर मी आमच्या सासर्यांच्या व्यवसायात काम सुरु केले. तेव्हा पहिली भेट आमचे सीए मुकुंदराव चितळे आणि बिमल यांचीच घेतली. ‘कॅल्क्युलेशन’ आणि ‘कॉस्टिंग’चे महत्त्व किती असतं, हे त्यांनी त्या भेटीत समजावलं. खरंच, बिमल म्हणजे एक ‘मेथॉडिकल’ माणूस आहेत. कामात अत्यंत नियोजनबद्धता, संघकामाची आणि व्यवसायाची डायरी वेगवेगळी. फॉलोअप घेण्याचे कौशल्य त्यांचे अतिशय जबरदस्त होते. म्हणजेच दिवसाला जर १२ जणांशी संपर्क साधायचा असेल, तर ते न चुकता त्या सर्वांशी संपर्क साधायचे. तीन स्वयंसेवकांच्या घरी भेट द्यायची आहे, म्हणजे तिघांच्याही घरी जाणारच. व्यवसायात समोरच्या क्लायंटला किती डिस्काऊंट द्यायचा, किती समोरच्याला सांभाळून घ्यायचं, हे बिमल यांकडून शिकण्यासारखं आहे.
मुंबईत २००१ मध्ये माझे संपर्क विभागाचे काम सुरु केले, तेही बिमल यांच्या सांगण्यावरूनच. त्यांनी बाळ देसाई यांना माझं नाव सुचवलं होतं. त्यानंतर मी मुंबईचा विशेष संपर्क सहप्रमुख म्हणून कार्यरत झालो आणि संघकामात पुन्हा नव्याने माझी सुरुवात झाली. त्यानंतर मी ‘केशवसृष्टी’मधील एका शाळेशी जोडलो गेलो. त्या शाळेत नियमित जाणं सुरू झालं. माझ्या मनात जे विषय असायचे, ते बिमल यांनी मला कायम करू दिले, त्याबाबतीत कधी अडवलं नाही. हे माझ्या दृष्टीने माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. वाडा येथील एक किस्सा लक्षात राहण्यासारखा होता. प्रमिला कोकड तिथे मतिमंद मुलांसाठी काम करतात. मुंबईत ज्या पद्धतीने आडव्या वस्त्या असतात, तशा चाळीमध्ये त्या मुलांची शाळा सुरू होती. प्रमिला यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठीच लावलं होतं. तिथले वातावरण पाहून अस्वस्थ झालो होतो. बिमल यांनी निघताना प्रमिला यांना विचारलं, “तुमच्या गरजा काय आहेत? कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे का?” त्यावर प्रमिला यांनी आर्थिक आवश्यकतेबाबत म्हणाल्या, “एका महिन्यात सर्व चिंता मुक्त होईल,” असा विश्वास बिमल यांनी तेव्हा दाखवला. त्याक्षणी मी अक्षरशः भारावून गेलो होतो. तिथली संपूर्ण जबाबदारी ‘केशवसृष्टी’ने घेतली होती. ‘सेवा इंटरनॅशनल’च्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते वाड्याला प्रमिला यांच्या मतिमंद मुलांसाठी उभारलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. आज तिथे मोठी टीम जोडली गेली आहे.
बिमल यांचं वाढतं वय असलं तरी, ते कधी कामाच्या बाबतीत स्वस्थ बसले नाहीत. ते एक योजक व्यक्तिमत्त्व आहे. असे अनेक प्रसंग होऊन गेले की बिमल यांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. त्या मी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याही. कधी त्यांच्यावर रागावलोही, तर ते मात्र मोकळेपणाने माझं म्हणणं स्वीकारायचे. २००९ साली बिमल यांचा आणि मुकुंदराव चितळेंचा ६०वा वाढदिवस करायचा डोक्यात होतं. आयोजित कार्यक्रमाची त्यांना आधी काहीच कल्पना नव्हती. त्यांना यासाठी मनवणं कठीण होतं, पण मी त्यांना गमतीत म्हणालो, “मी भागवत आहे म्हटल्यावर मी तुम्हाला आदेश देऊच शकतो.” तेव्हा ते तयार झाले आणि कार्यक्रम चांगल्यारित्या संपन्न झाला.
माझी मुलगी मृण्मयी हिच्या लग्नाचा विषय जेव्हा सुरू झाला, तेव्हा माझ्या सासर्यांप्रमाणे बिमल यांना तिच्या लग्नाची काळजी होती. दर १५ दिवसांनी ते लग्नाविषयी चौकशी करायचे. मुलीचं लग्न ठरलं हे सांगायला बिमल यांना जेव्हा फोन केला, तेव्हा कदाचित कामाच्या गडबडीत त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्याच फोन आला आणि त्यांनी काही न बोलता आधी थेट शुभेच्छाच दिल्या. मला काय सांगायचं होतं, हे त्यांना आधीच कळून चुकलं होतं. मृण्मयीच्या साखरपुड्यावेळी ते स्वतः आमच्या घरी उपस्थित होते. वेगवेगळ्या कामात हातभात लावत होते. अगदी लग्नातला किस्सा म्हणजे, स्टेजवरचा चाललेला गोंधळसुद्धा बिमल यांनीच सांभाळला होता. या सर्व गोष्टी त्या घरच्या व्यक्तीप्रमाणेच करीत होते. मृण्मयीची सासरी पाठवणी करेस्तोवर ते थांबले होते. घरातील वडीलधारं कोणी असतं, तसे ते आमच्यासोबत तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत लग्नात उभे होते.
बिमल वादविवादात फारसे पडत नाहीत. ते जितके शिस्तप्रिय आहेत, तितकेच ते भावूकसुद्धा व्हायचे. रंगाहरी, शेशाद्री, रज्जूभैय्या यांचा विषय काढला की त्यांच्या आठवणींनी बिमल यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी आलंच म्हणून समजा. असे हे बिमल आजही माझे मार्गदर्शक म्हणून माझ्या पाठीशी कायम उभे आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.
विलास भागवत