संघ काय आहे, हे सांगणारे शेकडो विद्वान देशामध्ये आहेत. ते संघाविषयी बंदिस्त खोलीत बसून त्यांना जो संघ वाटतो, ते ते मांडीत असतात. अशा सर्वांच्या लेखनासाठी एकच शब्द वापरायचा तर ‘भन्नाट’ असा वापरावा लागेल. ‘समरसता’ विषयीचा असाच एक लेख वाचण्यासाठी माझ्या मित्राने मला पाठविला. लेख वाचून ‘विकृत लेखनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार लेखकाला दिला पाहिजे’ असे मला वाटले. माझ्या लेखाचा विषय ‘संघाविषयी भन्नाट लेखन करणारे’ असा नसून ‘संघ जगणारे बिमलजी केडिया’ हा आहे. असे हजार लेखक आणि त्यांची पुस्तके एकत्र केली आणि तराजूच्या एका पारड्यात टाकली आणि दुसर्या पारड्यात बिमलला बसवले, तर बिमलचे पारड वजनाने खाली जाईल. संघ जगायचा कसा असतो, हे ज्यांना समजून घ्यायचे आहे, त्यांनी बिमलच्या सहवासात काही दिवस राहणे आवश्यक आहे. संघ जगण्याच्या केवळ दोन पैलूंचा आपण इथे विचार करूया.
संघ जगण्याचा पहिला पैलू आहे ‘समरसता.’ बिमलजी समरसता कशी जगतात, याचा एक किस्सा सांगतो. साल बहुधा १९७२ किंवा १९७३ असावे. तेव्हा संघ शब्दावलीत ‘समरसता’ हा शब्द नव्हता. पार्ल्यातील रिद्धी-सिद्धी सोसायटीत तेव्हा ते राहत होते. एकत्र कुटुंब होते. माझे त्याच्या घरी वारंवार जाणे होत असे. एक दिवस दुपारी मी गेलो असता, तो मला म्हणाला, “तू जेवून जा” आणि मी जेवायला बसलो. मोठी मारवाडी थाळी समोर आली. बिमल म्हणाला, “सुरू कर.” मी म्हणालो, “तुझी थाळी कुठे आहे?” बिमल म्हणाला, “आपल्या दोघांची थाळी एकच आहे. आपण दोघे एकाच थाळीत जेवायचे आहे.” मराठी कुटुंबात एकत्र थाळीत जेवण्याची पद्धत नाही. त्यामुळे मला थोडे संकोचल्यासारखे झाले. पण, पुढे बिमल जे बोलला त्याचा अर्थ मला पुढे १९८५ साली जेव्हा मी ‘सामाजिक समरसता मंचा’चे काम करू लागलो, तेव्हा समजला.
बिमल म्हणाला, “एकाच परिवारातील आम्ही एकत्र एका थाळीत जेवतो. तू आमच्या परिवारातलाच आहेस. कुणी परका नाहीस.” तेव्हा बिमलची जात कोणती होती, हे मला माहीत नव्हते आणि आजही माहीत नाही. माझी जात कोणती हे बिमलला माहीत नव्हते आणि आजही माहीत नसावे. ‘बंधुभाव’ हा संघकामाचा आत्मा आहे. तो जगायचा असतो. त्यावर भाषणे द्यायची नसतात.
तेव्हा मी पार्ले नगरचा कार्यवाह होतो आणि बिमल सहकार्यवाह होता. आम्ही दोघेही दरवर्षी अकरावीच्या विद्यार्थ्यांची सहल काढत असू. अंकुश पवार नावाचा विद्यार्थी होता. त्याची जात कोणती हे आम्हा दोघांनाही माहीत नव्हते. कारण, संघात स्वयंसेवकाची जात विचारली जात नाही. दोन दिवसाच्या सहलीत एकत्र राहणे, एकत्र झोपणे, एकत्र खाणे, कुठलाही पंक्तीभेद नाही. न्याहारीच्या वेळेला प्रत्येकाला ब्रेडच्या स्लाईस दिल्यानंतर पाच-सहा ब्रेडच्या स्लाईस राहिल्या. वाटप करणार्या बिमलने जेवढी संख्या होती, तेवढे त्याचे तुकडे केले आणि प्रत्येकाला देऊन टाकले. लौकिक भाषेत याला ‘समतेचा व्यवहार’ म्हणतात. हे तेव्हा आम्हा दोघांनाही माहीत नव्हते. अकुंश बिमलच्या या प्रसंगाने प्रभावित झाला. सर्वांनी समानतेने जगायचे एवढेच आम्हा दोघांना माहीत होते.
बिमल तसा सुखवस्तू परिवारातील कार्यकर्ता. परंतु, आमच्या कार्यक्षेत्रात अंधेरी, जोगेश्वरी येथील प्रचंड झोपडपट्ट्या येत होत्या. त्या निम्न आर्थिक स्तरातील लोकांच्या घरी जाणे, त्यांच्या जातीपातीचा विचार न करता त्यांच्या सुख-दुःखाशी समरस होणे, या गोष्टी बिमलने अत्यंत सहजपणे केल्या. समरसता कशी जगायची असते, हे त्याने सहजपणे जगून दाखविले. नंतर गरज निर्माण झाल्यावर मी त्यावर लेखन केले, पुस्तके लिहिली आणि शेकडो भाषणेही दिली. पण, मनात नेहमी याची जाणीव ठेवली की, ‘समरसता’ हा भाषणाचा विषय नसून, बिमलप्रमाणे जगण्याचा विषय आहे.
“संघ जगण्याचा दुसरा पैलू म्हणजे संघाचे भूत डोक्यावर स्वार व्हावे लागते,” हे माझे वाक्य नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांचे वाक्य आहे. त्याचा अर्थ असा होतो की, संघकार्य झपाटून करावे लागते. संघकार्य हे मुख्यतः हिंदू संघटनेचे कार्य. हिंदू असंघटित आहेत. जाती, भाषा, पंथ यात विभागलेला आहे, त्याला संघटित करायचे आहे. म्हणून संघाचा संघटनेचा मंत्र समजून घ्यावा लागतो आणि पचवावा लागतो. जगातील सर्वात कठीण कार्य म्हणजे हिंदू संघटनेचे कार्य आहे. हे सर्वात कठीण कार्य कसे सोपे करायचे, हे ज्यांना समजून घ्यायचे आहे, त्यांनी बिमल आणि बिमलसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहवासात राहिले पाहिजे.
संघकार्य निरंतर करण्याचे कार्य आहे. निरंतर म्हणजे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत करण्याचे कार्य. त्याला स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम नाही, याला ‘सातत्य’ म्हणतात. अनेक संघ स्वयंसेवक वेगवेगळ्या कारणांमुळे थकतात आणि थांबतात. बिमलजींचे कार्य मात्र वयाच्या ७५ वर्षांतदेखील सूर्याचे उगवणे आणि अस्त होणे याप्रमाणे निरंतर चालू आहे. सातत्य राखण्यासाठी नियोजन करावे लागते. बिमल आणि योजना, बिमल आणि नियोजन, बिमल आणि काळाचे व्यवस्थापन हे सर्व समानार्थी शब्द आहेत. अशी एकरूपता ज्या संघकार्यकर्त्याने साधली, त्यांना बिमलजींचे नाव घ्यावे लागते.
लौकिक जीवन जगायचेच आहे. असे गृहस्थी जीवन जगत असताना समर्पण भावनेने संघकार्य करायचे असते. समर्पणात ईश्वराने आपल्याला दिलेले वेगळे व्यक्तिमत्त्व अबाधित राहते. त्या व्यक्तीच्या स्वार्थाच्या भावना लोप पावतात. अहंकाराची भावना समाप्त होते आणि संघकार्यामध्ये आपण तन्मय होऊन जातो. बिमल याचे फार चांगले उदाहरण आहे. करोडो रूपयांचा व्यवसाय करणार्यांशी त्याची मैत्री आहे, त्याचवेळी मोलमजुरी करणारा कार्यकर्ताही त्याला आत्मीय वाटतो. समाजातील सर्व स्तरातील लोकांत बिमलचा सहज वावर असतो. नाव ‘बिमल केडिया’ असते. ओळख ‘संघ स्वयंसेवक’ हीच असते. याला ‘अमानित्व’ असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या तेराव्या अध्यायातील सातव्या श्लोकात बिमलसारख्या कार्यकर्त्याचे यथार्थ वर्णन केलेले आहे, असे मला वाटते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः॥
या श्लोकाचा अर्थ - अभिमानाचा अभाव दंभाचरणाचा अभाव, अहिंसा, सरलता, श्रद्धा-भक्तिसहित गुरुजणांशी सेवा, अंतर्बाह्य शुद्धता, स्थिरबुद्धी आणि आत्मशोध असा आहे.
एका अर्थाने आत्मविलोपी कार्यकर्त्याचे हे वर्णन आहे आणि बिमल केडिया ही त्याची मूर्ती आहे.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१