आपण लेखांक-20 मध्ये प्राणायामाबाबतीत प्राथमिक माहिती घेतली. प्राणायामाचे तंत्र आणि ते करताना हातांच्या बोटांची विशेष रचना, ज्यांना मुद्रा म्हणतात, ज्यामुळे प्राणायाम करताना मिळणारे आयाम मुद्रेनुसार शरीराच्या विशिष्ट भागांत मिळून त्या भागाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.प्राणायाम करताना मिळणार्या आयामांनुसार प्राणायामाचे लाभ व नाव ठरते. मुद्रांचे अनेक प्रकार आहेत. या लेखात त्यांपैकी काही प्राणायामाकरिताच्या मुद्रा व त्यांचे परिणाम आपण प्राणायामाचे विधी व तंत्र बघण्याआधी अभ्यासणार आहोत.
1) ज्ञान मुद्रा : अनुलोम-विलोम करताना डाव्या हातामध्ये लावण्याची मुद्रा. मनाची एकाग्रता वाढून श्वासाची तीव्रता स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे आयाम कुठे मिळतात, त्याची जाणीव होते.
2) प्रणव मुद्रा : अनुलोम-विलोम करताना उजव्या हातामध्ये लावण्याची मुद्रा. विशिष्ट प्रकारे नाकपुडी बंद व उघडी करण्यास मदत होते, प्राण अपान सम राहतात.
3) चीन मुद्रा : भस्त्रीका करताना लावण्याची मुद्रा. नाभीपासून पायांच्या बोटापर्यंतच्या पेशींना आयाम मिळून त्या स्वस्थ व आनंदी होऊन शरीराला सहकार्य करतात. शीत व उष्ण यांचे द्वंद्व कमी होऊन या भागातील तापमान सम राहण्यास मदत होते.
4) चिन्मयी मुद्रा : कपालभाती-1 करताना लावण्याची मुद्रा. छातीसाठी. छातीतील सर्व अवयव यांना आयाम प्राप्त होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहते. छाती दुखणे, बरगड्या दुखणे, खांदे दुखणे इत्यादी त्रास कमी होऊन मन आनंदी होते.
5) अनघ मुद्रा : कपालभारती-उन्नत करताना लावण्याची मुद्रा. खूप महत्त्वाची. घसा, कान, नाक, डोळे, मेंदू इथपर्यंत आयाम देऊन तेथील आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. डोकेदुखी कानदुखी, डोळ्यांची आग इत्यादी विकारांत उत्तम. अध्यात्मिकदृष्ट्या अनघ म्हणजे पाप नाही. आपल्या हातून अनवधानाने काही चुका झाल्या असल्यास त्यांचे परिमार्जन होते. हिलाच शिव मुद्रा म्हणतात. ही मुद्रा लावून डोक्यावर शिवलिंग मानसिकरित्या धारण करून शिव उपासना करतात.
पुढील लेखात वरील सर्व प्राणायामांच्या विधी व तंत्र उपयोगांचा अभ्यास होईल.
डॉ. गजानन जोग