क्रीडेला पाठबळ देण्यात राज्य सरकारांमध्ये वाढ

25 Nov 2024 11:43:47

hockey
 
देशात सध्या क्रीडा क्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहेत. खेळाकडे करिअर म्हणून बघणार्‍या युवकांची संख्या देशात वाढते आहे. यासाठी अनेक राज्य सरकारे पुढाकार घेत आहेत. खेळासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीपासून खेळाडूंना प्रत्येक पावलावर सहकार्य मिळत आहे. या सगळ्यात हॉकीचे स्थान विशेषच. या खेळाच्या वाढत्या प्रसाराचा घेतलेला हा आढावा...
 
हरियाणा, पंजाब यांच्या यादीत बघता बघता झारखंड, ओडिशा ही राज्येही भारतीय हॉकीचा चेहरामोहराच बदलून टाकण्यासाठी, पुढे येताना दिसत आहेत. दिवसेंदिवस विविध क्रीडाप्रकारात भारताचे क्रीडाक्षेत्र विस्तारताना दिसत आहे. बिहारसारखे राज्य आता, अचानक क्रीडाप्रेमींच्या मनात प्रवेश करताना दिसत आहे. हरियाणा, पंजाब यासारख्या हॉकीसहित क्रीडाविश्वात आपला दबदबा राखलेल्या राज्यांना, एकेक राज्य आजकाल टक्कर देत आहेत. ही राज्यांमधली सकारात्मक स्पर्धा देशाच्या दृष्टिकोनातून लाभदायकच असेल. एकट्या हॉकीचा जरी आपण विचार केला, तरी हे आपल्याला उमगेल.
 
रांची येथे २०२३ साली ‘महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धे’त भारतीय महिलांनी सुवर्णपदक पटकावून, सलग दुसर्‍यांदा विजेतेपद मिळवले होते. रांची येथील ‘मरंग गोमके जयपाल सिंग मूंडा अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम’वर त्या स्पर्धा झाल्या होत्या. नंतर आता बिहारने महिलांच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धांचे प्रथमच यशस्वी आयोजन करुन, बिहारमध्ये हॉकीचा श्रीगणेशा केला आहे. ‘आशियाई महिला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा’ यशस्वी करुन दाखवल्यानंतर, आता बिहारच्या राजगीर येथे पुरुषांसाठीदेखील ‘हॉकी आशिया चषक २०२५’चे आयोजन करण्यात येणार आहे. बिहारसारखे राज्य, आदिवासींमुळे आणि राज्य सरकारांच्या पाठिंब्यामुळे भारतीय हॉकीचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक उज्वल होताना आपल्याला दिसून येत आहे. एका पाठोपाठ एक राज्ये आपले योगदान देताना, आपल्याला आढळून येत आहे.
 
राज्य सरकारचे पाठबळ आणि पूर्वापार चालत आलेले आदिवासी हॉकीपटूंचे आणि जनतेचे क्रीडाप्रेम भारतीय हॉकीला समृद्ध करुन दाखवत आहे. ओरिसा हे राज्य फेब्रुवारी २०१८ साली भारतीय हॉकीच्या इतिहासात प्रथमच पाच वर्षांसाठी, हॉकीला दत्तक घेणारे राज्य ठरले होते. तेव्हापासून आजतागायत ते हॉकीला प्रोत्साहित करत आले आहे. ज्या काळात नवीन पटनाईक हे मुख्यमंत्रिपदावर होते, तेव्हापासून ओडिशा आणि हॉकी हे नाते उमलायला लागले. त्यांच्या शालेय जीवनापासून हॉकपटू असलेल्या नवीन पटनाईकांनंतरदेखील, विद्यमान ओडिशा राज्यसरकार हॉकीचा नावलौकिक वाढवत आहे.
 
भारताच्या पूर्वेकडील बंगाल उपसागराच्या समुद्रकिनार्‍यातील टापूत, भारतीय हॉकी मुख्यत्वेकरून विस्तारत आहे. २०२३ साली हॉकी विश्वचषक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांचे आयोजन ते अगदी महिला आणि पुरुषांच्या भारतीय हॉकी संघांना आर्थिक पाठबळ देत, संघाचे पालकत्व स्वीकारण्याचे कार्य, विविध ठिकाणी हॉकीची आधुनिक मैदाने उभारण्याची कामे त्या राज्यात गेल्या सहा-सात वर्षात होताना आढळत आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवलेले राऊरकेला येथील, ‘बिरसा मूंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम’देखील ओरिसातलेच आहे. २० हजार, ०११ प्रेक्षकव्यवस्था असलेल्या स्टेडियममध्ये, तेव्हाच्या विश्वचषकासाठी लागणार्‍या क्रीडागाराची तयारी अवघ्या १५ महिन्यात पूर्ण करण्यात आली होती. नुकत्याच १४ व्या ‘हॉकी इंडिया’ आयोजित चेन्नईच्या ‘महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम’वर , हॉकी इंडिया ‘वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा’ संपन्न झाल्या होत्या. त्यात हरियाणासारख्या संघाला ओरिसाने ५-१ असे पराभूत करत, विजेतेपद पटकावले होते. विजेतेपद भूषवणार्‍या त्या संघात, १८ पैकी तब्बल १७ खेळाडू हे एकट्या सुंदरगढचे होते. ते सर्वजण आदिवासीबहुल क्षेत्रात हॉकीचा श्रीगणेशा करणारे होते. तोच प्रदेश जेथे पूर्वी ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या आणि ब्रिटिश सैन्यदलात हॉकीचे धडे घेतलेल्या हॉकीवीराचा वारसा पुढे नेणारे आदिवासी होते. ब्रिटिश काळापासून चालत आलेला हॉकीचा वारसा आज, ओरिसातील सुंदरगढ दिमाखात पुढे नेत आहे. आदिवासींचे जन्मजात असलेले नैसर्गिक क्रीडागुण आज कामी येत आहे. हरियाणा, पंजाबसारख्या हॉकीचे सत्ताकेंद्र असलेल्या राज्यांना, ओरिसा आज टक्कर देताना आढळत आहे. भारतीय हॉकी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष असलेला ऑलिम्पियन दिलीप तिर्की त्याच ठिकाणांहून आलेला आहे.
 
खासी कप विजेतेपद मिळवण्यासाठी आयोजित होणार्‍या, आदिवासी टोळ्या-टोळ्यांत होणार्‍या स्पर्धा (इंट्राव्हिलेज) त्याकाळी प्रसिद्ध होत्या. विजेत्या संघांना जिवंत पशुधन प्रदान केले जात असे. सुंदरगढच्या घराघरांत हॉकी खेळली जाते. भारतीय राष्ट्रीय ज्युनिअर संघात निवड झालेले शिलानंद लाक्रा आणि निलम संजीप एक्सेस यांच्या जोडीने, अन्य सहा जण त्याच ठिकाणातून येऊन प्रशिक्षण शिबिरात निवडली गेली होती. या स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरवर उत्तम खेळ करत दाखवणारा संघ ओरिसाचाच होता. ओरिसात हॉकी इतकी रुळत आहे की, आदिवासी समुदाय भारताच्या ऑलिम्पिक हॉकीच्या स्वप्नांना कशाप्रकारे बळ देत आहेत, याचा तो पुरावा आहे.
 
भारतासाठी हॉकीच्या नवीन प्रतिभावंतांना ओरिसासारखी राज्ये जन्म देत आहे. हॉकीच्या पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या विकासामध्ये गुंतवणूक करत असल्याने, भारतीय हॉकीचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक उज्वल दिसते.
 
राजगीरच्या स्पर्धेनंतर पुरुषांच्या स्पर्धेची घोषणा झाल्यावर, आता ज्युनियर मुलांकडून काही अपेक्षा ठेवल्या जाणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी ज्युनियर मुलांची यादी तयार करण्यात आली असून, त्यापैकी काही युवकांना मस्कतला होणार्‍या, ज्युनियर आशियाई हॉकी चषकाच्या स्पर्धेत खेळवले जाणार आहे. मस्कतच्या त्या स्पर्धा दि. २६ नोव्हेंबर २०२४ ते दि. ४ डिसेंबर २०२४ या दरम्यान होत आहेत. याआधी या स्पर्धेत भारतीय युवकांनी चारवेळा विजेतेपद मिळवले आहे. यावेळच्या स्पर्धेत दहा आशियाई संघ सहभाग घेत असून, त्यात पाकिस्तानही असेल. यजमान असलेला भारतीय संघ ‘एफ आय एच हॉकी ज्यूनिअर विश्वचषक’ स्पर्धेत आपसूकच प्रवेश मिळवेल, हे जरी सत्य असले तरी ‘आशियाई चॅम्पियन्स करंडक’ घेऊन विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार्‍या भारतीय मुलांकडे बघायला वेगळाच आनंद असेल. सगळ्यांचा लाडका पीआर श्रीजेश घडवत असलेला भारतीय ज्यूनिअर संघाच्या कामगिरीवर, सगळ्यांच्याच नजरा लागणार आहेत. सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेमध्ये तिसरे स्थान पटकावल्यानंतर, ओमान येथे होणार्‍या ‘पुरुष ज्युनियर आशिया चषक स्पर्धे’त मुख्य प्रशिक्षक पीआर श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली, भारत आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न करेल.
 
चला तर मग हॉकीपटूंनो, आपली राज्यसरकारे हॉकी स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आपल्या पाकीटांची चेन उघडायला तयार झाले आहेत. बिहारच्या नितीश कुमारांनी राजगीरला गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंसाठी, प्रत्येकी दहा लाख रुपयांची घोषणा केली आहेच. तशी घोषणा पुन्हा होण्यासाठी, मुलींप्रमाणेच ज्यूनिअर आणि वरिष्ठ मुलामुलींनी आता तयार राहावे. आता हॉकीसाठीही देणार्‍यांचे अनेक हात नक्कीच आखडते नसतील, अशी पक्की खात्री हॉकी प्रेमींनी बाळगावी.
 
भारतात हॉकीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे भारताचे देशप्रेमी नरेंद्र बात्रा यांच्यानंतर हॉकीच्या आंतरराष्ट्रीय पदाधिकार्‍यांची अनेक पदे बदलली गेलेली आहेत आणि ते आपल्याला नक्कीच खटकणारे आहे. कारण, त्यात पाकिस्तानचा जास्तीत जास्त सहभाग दिसत आहे. आज क्रीडेच्या माध्यमातून हेरगिरी करणे सहज होऊन बसल्याचे दिसत आहे. एका बाजूने विचार करून बघितले, तर हॉकी त्याला बळी पडत आहे.
 
आपला कट्टर विरोधी शेजारी दहशतवादाचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय. एस. आयचा हस्तक असू शकेल, असा तय्यब इकराम सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा अध्यक्ष झाला आहे. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवत असतो. लाहोर ते बिहार हे अंतर तो काही अडचण न येता पार करतो आणि त्याचा काही विचार होत नाही, हे क्वचितच क्लेशदायक आहे. तो लाहोरचा माणूस जगभर फिरत फिरत मकाऊ देशाचा पासपोर्ट मिळवतो आणि वेगळ्या देशाचा असल्याने तो अधिकृतपणे भारतात येतो. हा प्रकार तो वारंवार करत आला आहे. ही स्पर्धा तशी म्हटली तर आशिया खंडाशी संबंधित असल्याने, त्यासाठी पाहुणे म्हणून आशियाई प्रमुखाला बोलावणे अपेक्षित होते.
 
‘आशियाई हॉकी फेडरेशन’ ही आशियातील फील्ड हॉकी खेळाची प्रशासकीय संस्था आहे. त्यात आता ३३ सदस्य संघटना आहेत. आशियाई हॉकी संघटना जरी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी संलग्न असली, तरी सध्याचे आशियाचे अध्यक्ष फुमियो ओगुरा आहेत आणि सचिव अल-सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह हे आहेत. तसे म्हटले, तर त्यांचा तो हक्क आहे, पण तसे होत नाही. या मनुष्याला आपण सर्रास भारतात वाटेल तेथे फिरवून आणत आहोत. तसेच अनेक राज्यातील अनेक राजकारणी व्यक्तींच्या अधिकृत भेटी घडवून आणत आहोत. तसेच सरकारी बाबूंशीदेखील तो जवळीक साधताना दिसत आहे.
‘हॉकी इंडिया’ ही आता अशी एकटीच आशियाई हॉकीची संघटना असेल कदाचित की, जी आशियाई हॉकी महासंघटनेस मुक्त हस्ताने वित्तपुरवठा करत आहे. यामध्ये तब्बल आठ पदाधिकारी असे आहेत की, जे पाकिस्तानी आहेत.
 
पाकिस्तानला कदाचित पुन्हा आयएसआयने कामावर ठेवले आहे. ज्यांचे वेतन हॉकी इंडियाकडून वसूल केले जाईल. माझ्या माहितीनुसार जवळपास २५ ते ३० पाकिस्तानी नागरिकांना आयएसआयने फसवणुकीद्वारे नियुक्त केले आहे. तय्यब इकराम हा इसमडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीचा अध्यक्ष आहे आणि त्याचे नेटवर्क जवळपास ७० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेले आहे. तय्यब इकराम आयएसआयच्या कामासाठी ऑलिम्पिक सॉलिडॅरिटी फंडचा खुलेआम वापर करतो. यामाध्यमातून इतर देशात तो त्याची माणसे पेरतो. त्यांना फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीचे ५० हजार डॉलर्सचे अर्थासाहाय्य करते. जर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीचा हा पाकिस्तानी अध्यक्ष इतका प्रामाणिक असेल, तर त्याला एकांतात भेटायला पाकिस्तानी दूतावासातील लोक का येत असतील? याचा मी साक्षीदार असल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे. मला आशा आहे की, हॉकी इंडियामध्ये आमच्याकडे जयचंद किंवा मीर जाफर नाही असेही बत्रा म्हणाले.
 
बत्रा यांचा परिचय
 
डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा
 
२०१९-२०२२ - सदस्य आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
२०१६-२०२२ - अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन
२०१७-२०२२- अध्यक्ष भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन
२०१७-२०२२.भारतीय राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे
२०१४-२०१६- अध्यक्ष हॉकी इंडिया
 
आशियाई हॉकीत पाकचा वाढता प्रभाव दाखवणारी उदाहरणे पाहताना नरेंद्र बात्रा म्हणतात तसे खरेच लक्ष घालणे महत्त्वाचे असेल, तर बात्रांच्या म्हणण्यावर संबंधितांनी लक्ष घालणे महत्त्वाचे आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे केवळ आपण कोणते सामने खेळत क्रीडा क्षेत्रात किती प्रगती करत आपला राष्ट्रीय खेळ मोठा करत आहोत, ते बघताना देशाला प्राधान्य देत राष्ट्राची देखील अस्मिता सांभाळत आहोत की, नाही हेदेखील पाहिले पाहिजे. यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, सरकारे, साई यांनीही विचार केला पाहिजे. यासाठी बात्रांसारख्याचे विचारमंथन व्हायला हवे.
श्रीपाद पेंडसे
 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत.)
९४२२०३१७०४
Powered By Sangraha 9.0