राखू झाडांचा आदर

25 Nov 2024 13:16:07
tree




काही सणांपुरतेच झाडांचे महत्त्व आपल्यासाठी मर्यादित नसावे. देशी झाड तुटले तर त्याविषयी तळमळ निर्माण होण्याची वेळ आता आली आहे. पण ही तळमळ समाजातील काही घटाकांपुरतीच सीमित राहिलेली आहे. ही तळमळ कशी निर्माण करता येईल आणि झाडांचा आदर राखण्याची नेमकी काय गरज आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख.
 
 
 
नवाटा खूप सुंदर असतात. रानवाटांवरची सगळीच मंडळी त्यांच्या आयुष्यात रमलेली असतात. किडे, किटकांपासून ते झाडं-वृक्षं, नाजूक वेली, महावेली, गवताचे प्रकार, झाडांवर वाढणार्‍या अमरी यांचे एक रंगलेले आयुष्य असते. आपल्याला लांबून जरी हे सगळे थांबल्यासारखे वाटत असले तरी, हे सर्व आपल्या जीवनचक्राचा रहाट हाकत राहतात. पक्षी हा जगातला सगळ्यात बुद्धिमान असलेला वर्ग. सुपरसॉनिक विमानाच्या इंजिनावर हवेचा दाब पडू नये म्हणून ‘नोज डायाफ्राम’ची (छेीश वळरहिीरसा) रचना ही गरुडाकडून घेण्यात आली. अशी बरीच उदाहरणे आहेत. आज ज्यांच्या जीवावर आपण माणसे ‘आधुनिक’ नावाचे बिरुद मिरवतो, त्या सगळ्याचे ऋण या निसर्गातल्या घटकांकडून घेतलेले आहे.
 
 
वनस्पतींचे जग हे तर त्याहून कूट आहे. त्या आपल्या पालनकर्त्या आहेत. समजा, वनस्पती आणि झाडे जर हद्दपार केली तर काय होईल? शाळेत आपण निबंध लिहायचो की, ‘सूर्य नसता तर...’ किंवा ‘हवा नसती तर...’ पण ‘वनस्पती नसत्या तर...’ हा निबंधाचा विषय आपल्या वाट्याला कधीच आला नाही. वनस्पतींचे जग हे सजीव प्राणीजगताची जीवनवाहिनी आहे. पृथ्वीवर ज्ञातपणे सगळ्यात आधी अवतरलेल्या घटकांमध्ये वनस्पतींचा क्रमांक पहिला आहे. नील-हरित शेवाळाचे रूप असेल किंवा तपकिरी शेवाळाचे रूप इथून त्यांची सुरुवात झाली. समुद्रातील सूक्ष्म ‘तरणशैवाला’ची रुपे आजही पृथ्वीवर ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्राणवायू तयार करत आहेत. या पृथ्वीवर ही सूक्ष्म तरणशैवाले तयार झाली आणि त्या आदिरुपातून पुन्हा बहुपेशीय आवाढव्य झाडांची निर्मिती झाली. आयुर्वेदासारखी वेगळी शाखा निर्माण करावी लागेल, असा ग्रंथ पसारा केवळ वृक्षसंपदेमुळे आपल्याला मिळालेला आहे.
 
 
जंगलातील खास सफारीला पर्यटक आवर्जून जातात. वन्यप्राणी बघण्यास ते उत्सुक असतात. बिबट्या, गवा शहरात किंवा गावात घुसले की, त्याच्या ठळक बातम्या होतात. पण आपण नुसती झाडे बघायला म्हणून सफारी करू शकतो का? अफ्रिकेत एखादा भव्य बाओबाब वृक्ष दिमाखात उभा असतो. त्याच्याभोवती पर्यटन गुंफलेले दिसते. असे कधी झाले आहे का, की एखादे दुर्मीळ झाड शहरात सापडले आणि त्याला पाहण्यासाठी माणसांची पळापळ झाली आहे? फार क्वचित अशा घटना घडताना दिसतात. झाडे किंवा वनस्पतीसृष्टी ही प्राणीसृष्टीचा ओनामा होण्याआधी तयार झाली. आधी आदिशैवाले, शैवाले, नेचेवर्गीय झाडे, कवक, अपुष्प वनस्पती आणि मग सपुष्प वनस्पती अशी जंत्री एका मागोमागोमाग विकसित होत गेली. यात सपुष्प वनस्पती आता अलीकडे म्हणजेच साडे बारा कोटी वर्षांमध्ये तयार झाल्या, तर पहिले शैवाल साधारण १९० कोटी वर्षांपूर्वी तयार झाले. आता आधुनिक झाड म्हटले, तर त्यामध्ये गवतवर्गाचा समावेश होतो. ते खूपच अलीकडे म्हणजे नऊ कोटी वर्षांपूर्वी विकासाला आले. आता या कोट्यावधींच्या उलाढालीत माणसाची वर्षे ही काही लाखांत, तर आधुनिक माणसाची वर्षे हजारातच आहेत.
 
 
माणसाचा विकास हाच मूळात तृणांसोबत झाला. जंगली गहू, ज्वारी, नाचणी हे माणसाला सापडले नसते, तर अजूनही आपण कुठेतरी कंदमुळांवर न्याहारी आटोपत बसलो असतो. विकासाच्या टप्प्यांमध्ये आपण खाता येतील अशी जंगली तृणे वेगळी करून जमीन सपाट करून लागवड करायला शिकलो. चांगले धान्य बाजूला करून त्यातून अधिक चांगला वाण तयार होतो, हे आपल्याला उमगले. द्राक्षासारखी फळे आपण शोधली आणि त्यांचा आहारात समावेश केला. पानांची वस्त्रे केली, लिखाणासाठी कागद तयार केला. वनस्पतीवर अवलंबून माणूस आजचा शहाणा शहरी नागरी माणूस बनला. परंतु, यातून वनस्पतींचा किती सहज अपमान आपण करत आहोत, याची जाणीव प्रबोधित माणसाला असली, तरी सामान्य माणसांना अजूनही ती झालेली नाही.
चाफा वर्गातली झाडे ही सगळ्यात जुनी सपुष्प झाडे मानली जातात. आता गंमत पाहू. सायकस हे अपुष्प वर्गातले झाड. तुमच्याकडे जर सायकसचे झाड असेल किंवा सार्वजनिक बागेत त्याला बघितले असेल, तर त्याचे मेल-फिमेल कोन बघा. तसेच, चाफावर्गातली फुले नीट पाहिली, तर सायकसचे स्त्री व नर कोन म्हणजेच प्रजनन करणारे अवयव आणि चाफ्याचे स्त्री व पुंकेसराचे गुच्छ अगदी सारखेच दिसतात व त्यात बरेच साम्य आहे. म्हणूनच अपुष्प वनस्पतीतून सपुष्प होताना जो बदल झाला असेल, तो चाफ्यात बघता येतो. असेच एक वेलवर्गीय झाड आहे. उंबळी हा वेलसुद्धा अपुष्प व सपुष्प वनस्पतींमधला दुवा आहे. काही गुणधर्म हे सपुष्पांचे तर काही अपुष्पांचे दाखवणारा हा वेल आंबोलीपासून ते हरिश्चंद्रगडापर्यंत बघायला मिळतो. अर्थातच तो दुर्मीळ आणि अस्तित्व धोक्यात आलेल्या श्रेणीत समजला जातो. अशा असंख्य रहस्यांनी वनस्पतींचे जग तयार झाले आहे. समुद्र वनस्पती ही तर वेगळी शाखा आहे. त्यातील वनस्पतींची जडणघडण कशी झाली आहे, हादेखील कुतूहलाचा आणि स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. झाडांची रचना ही प्राण्यांपेक्षा जटिल आहे. कारण, झाडांचा प्रत्येक अवयव आरोग्य पोषणासाठी तयार झालेला आहे. अगदी विषयुक्त झाड असेल तरीही, झाडाचा डिंक वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण असते व झाडागणिक त्याचे गुणधर्म बदलत असतात. बाभळीच्या सर्वसाधारण डिंकापासून ते हिंगापर्यंत हा प्रवास अचाट आहे.



झाडांकडे बघताना जाणवते की, सगळी मंडळी कशी तयार झाली असावी. पाना-फुलांच्या रचनांचे आणि रंगांचे गणित निसर्गाला कसे ज्ञात झाले असावे? झाडांना कसे कळले असेल की, आपल्या निर्मितीनंतर प्राणीमात्र तयार होतील आणि त्यांना आपली गरज लागेल? पण इथेच एका गोष्टीकडे लक्ष वेधले जाते, जेव्हा आपण झाडांना आपल्या दैनंदिनीचा दुय्यम-तिय्यम भाग समजतो. आपण कामात इतके व्यस्त आहोत की झाडे आपल्या रचनेला कारक आहेत, हेच आपण विसरून जात आहोत. आपण सपशेल झाडांचा अनादर करतो. सरकारने कितीही मोठे व तारांकित रस्ते बनवले तरी, त्या दुतर्फा आपल्या देशी वृक्षवैविध्याची मांदियाळी कधीच दिसत नाही. तिथे लावलेल्या कुंपणात वेड्या बाभळी मात्र सुखाने झुलत असतात. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात हजार झाडे लावली, असे सांगतात. मात्र, पुढील वर्षी त्याच खड्ड्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होतो. पावसात किंवा उन्हात आपल्याला झाडाचा आडोसा गरजेचा असतो. परंतु, आपल्यापैकी कित्येकांना एखादे झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी, असे का वाटत नाही?
 
 
कोकणातील जंगलांचे दृश्यवास्तव विदारक आहे. वणव्यांनी या दृश्यवास्तव्यात बिभत्स रसाची भर घातली आहे. किमान आपण वनस्पतींचा आदर जपायला हवा. मुलांना त्यांचे फायदे तोटे समजावून सांगायला हवेत. आपण खूप करू शकत नसलो, तरी एखादे-दुसरे भारतीय झाड लावून ते जपायला हवे. झाडांची अस्ताव्यस्त तोड करणारे अशिक्षित लोक पोटासाठी ते करत असतील, तर त्यांना शक्य होईल तसे समजावून सांगणे गरजेचे आहे. कदाचित त्यांच्या पुढच्या पिढीलातरी ते या कामापासून बाजूला करतील. गवती कुरणे जाळू नका, असे प्रबोधन आपण सामान्य माणसे सहज करू शकतो. सरकारवर जास्तीत जास्त चांगली देशी झाडे लावण्यासाठी दबाव आणू शकतो. हे विषय सतत चर्चेत ठेवू शकतो. सुंदर व भावनाशील वनस्पतीजगतासाठी आपण काहीतरी जाणीवपूर्वक करूया आणि देशी सुंदर, कणखर झाडे जपूया.
- रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
7387641201
Powered By Sangraha 9.0