सिंधुदुर्ग : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यंदा उबाठा गट पार हद्दपार झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा गटाला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातून उबाठा गटाचे नामोनिशान संपल्यात जमा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात गेले दोन टर्म भाजपचे वर्चस्व आहे. यंदा इथे भाजपचे नितेश राणे आणि उबाठा गटाच्या संदेश पारकर यांच्यात लढत होती. या लढतीत नितेश राणेंनी ५८ हजार मतांनी विजय मिळवत हॅट्रिक केली, तर संदेश पारकरांना पराभव स्विकारावा लागला.
हे वाचलंत का? - नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार? पक्षाचं म्हणणं काय?
कणकवली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. इथे दोन टर्म वैभव नाईक विजयी झालेत. शिवसेनेतील फुटीमुळे वैभव नाईकांनी उबाठा गटाला पाठिंबा दिल्याने ही जागा उबाठाकडे गेली. दुसरीकडे, विधानसभा निवडणूकीच्या आधी भाजपच्या निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना वैभव नाईक यांच्या विरोधात शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले. दरम्यान, शिवसेना आणि उबाठा या लढतीत निलेश राणेंनी बाजी मारली आणि वैभव नाईक यांची हॅट्रिक हुकली. राणेंनी ८ हजार १७६ मतांनी नाईक यांचा पराभव केला. मात्र, त्यांच्या पराभवाने कुडाळमधील उबाठा गटाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभेत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांचे प्रभुत्व आहे. यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात उबाठा गटाचे राजन तेली मैदानात होते. मात्र, दीपक केसरकरांनी ३९ हजार ८९९ मतांची आघाडी घेत राजन तेलींना पराभवाची धुळ चारली.
नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही बंधूंना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. मात्र, राणे कुटुंबियांनी कोकणात केलेली विकासकामे आणि तगडा जनसंपर्क यामुळे विरोधकांनी उपस्थित केलेल्या घराणेशाहीच्या मुद्याला मतदारांनी फारशी दाद दिली नाही. शिवाय नितेश राणेंची हिंदुत्ववादी भूमिकाही त्यांच्या विजयात मोलाचा वाटा मिळवून देणारी ठरली. रिफायनरीचा मुद्दा, स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न, पर्यटन विकास या सगळ्या आश्वासनांमुळे मतदारांनी पुन्हा एकदा महायूतीला आपली पसंती दर्शवली. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात उबाठा गट शिल्लक राहिला नसल्याचे चित्र आहे.