मुंबई : विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्विकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायूतीने घवघवीत यश मिळवले असून महाविकास आघाडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणूकीत महायूतीला २३० तर महाविकास आघाडीला ४६ जागा मिळाल्या. विशेषत: काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले.
हे वाचलंत का? - मला त्रास देणारे सगळे साफ झालेत! अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर टीका
याशिवाय बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यासारखे काँग्रेसचे दिग्गज नेते निवडणूकीत पराभूत झालेत. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेदेखील केवळ २०८ मतांनी विजयी झालेत. त्यामुळे नाना पटोले या पराभवाची जबाबदारी स्विकारतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होते.
दरम्यान, आता नाना पटोले आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याचीही माहिती आहे. मात्र, यासंदर्भात पक्षाकडून अद्याप अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.