एक विलक्षण व्यक्तिमत्त्व

    25-Nov-2024
Total Views |
Bimal Kediya

माझे बंधू कै. बाळ पडळकर आणि नंदिनी वहिनी... दोघे पार्ले टिळक मराठी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजीचे शिक्षक होते आणि संघाशी जोडलेले होते. अमेरिकेहून तीन छोट्या मुलांसह कायमचे परत आल्यावर त्यांच्या प्रेरणेने आम्ही पार्ल्यात स्थायिक होण्याचे ठरवले. अर्थात, मुले शाळेत आणि आम्ही पार्ल्यात रमलो आणि पुरे पार्लेकर झालो, हे सांगणे नकोच. संघाशी जोडलेल्या मोहिदेकर यांच्या घरी आम्हाला कोजागिरीच्या रात्री मसाला दूध कार्यक्रमाला बोलावले आणि खूप ओळखी झाल्या. माझे पती डॉ. नितू मांडके पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’शी लहानपणापासून जोडलेले होते. त्यामुळे पार्ल्यातील बर्‍याच जणांच्या ओळखी झाल्या. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असा छाप आमच्या घरावरही लागला होता. रमेशभाई मेहतांनी डॉ. नितू मांडकेंमधील संघी ओळखला आणि त्यांना जोडून घेतले. नंतर अशोकजी सिंघल यांनी डॉक्टरांना हेरले आणि मुंबई विभागाचे ‘विश्व हिंदू परिषदे’चे अध्यक्ष केले. १९९४ साली अटलजी, प्रमोद महाजन वगैरे महानुभाव ‘वंदे मातरम् शताब्दी’ निमित्ताने घरी आले. पुढे डॉक्टर रामजन्मभूमी लढ्यामध्येही उतरले. रस्त्यावर महाआरती होत असे. पण, मी या सगळ्यात अडकले नव्हते. दुरून पाहत होते. डॉक्टर गेल्यानंतर काही वर्षांनी संजय हेगडे यांनी एका कार्यक्रमाला बोलावले. त्यामध्ये दाखवलेल्या ‘केशवसृष्टी’ फिल्मने मी भारावून गेले, हे सांगून संजयजींनी तिथेच बिमलजींची ओळख करून दिली. बिमलजींना मी पूर्वी नक्कीच भेटले असेन. पण, थेट ओळख प्रथमच झाली. मला ‘केशवसृष्टी’साठी काही मदत करायला आवडेल, असे त्यांना सांगितले. तत्पूर्वी ‘भटके विमुक्त संस्थे’चे काम बघायला आम्ही 50 जण संजयजी हेगडे यांच्याबरोबर यमगरवाडीला गेलो होतो आणि संजयजी आणि किशोर मोघे यांनी सुरु केलेल्या ‘सेवा सहयोग’शी मी जोडला गेला होते. संघप्रणित सामाजिक संस्थांचे काम पाहून त्यात काही करावे, अशी मनीषा दृढ होऊ पाहत होती. बरोबर दोन दिवसांनी बिमलजींचा फोन आला. “बिमल केडिया बोल रहा हूँ. मिलने के लिये कब आऊं?” संघाचे माणसांना हेरणे, जोडणे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. म्हणाले, “ना कहेने का आपका कोई वैयक्तिक कारण होगा तो बताईये, हमारे तरफ से माननीय मोहनजी से होकार आया हैं. बापरे मोहनजी से सीधा संपर्क?” इतके बोलल्यानंतर मी या कामाला ‘नाही’ म्हणायचे कारणच नव्हते. पहिला तर मी घाबरले होते, पण ‘केशवसृष्टी’ला जोडले गेले ते कायमचे. “इतना कहनेपर ना बोलनेका सवालही नही था. पूरी डर गयी थी.... और मै केशवसृष्टी से जुड गयी कभी जुदा न होने के लिये.”

बिमलजींना ओळखत नाही, अशी अख्या मुंबईत कोणी व्यक्ती नसेल आणि तेही स्वतः मुंबईत जन्मलेले नसून. पार्ल्यातील त्यांनी घडवलेले कितीतरी तरुण संघाच्या मोठमोठ्या संस्था सांभाळत आहेत. पण, तरी बिमलजी स्वतः कसलेही अध्यक्ष नाहीत. ते पक्के स्वयंसेवक आहेत. प्रत्येक शाखेत काही बदल घडवून काही नवी कामे अंगावर घेतील, त्यासाठी माणसे हेरून जुळवतील, मोठ्या लोकांच्या गोष्टी रंगवून सांगतील, एखाद्या गाण्याचा अर्थ सांगतील. त्यांची खूप गाणी, भजने तोंडपाठ असतात. एकदा ‘केशवसृष्टी’ची मीटिंग ‘गोवर्धन इकोव्हिलेज’मध्ये ठेवली होती. संध्याकाळी तेथील मंदिरात बिमलजींनी अनेक भजने म्हंटली. आम्ही रंगून गेलो. आपण एखादी नवीन कल्पना मांडली. ती त्यांना पटली तर खूप उचलून धरतील, चार जणांना सांगतील आणि सर्वप्रकारचे साहाय्य करतील. नाही पटली तर “इसमे कुछ भी नही हो सकता, कारण बताता हूँ” म्हणून पटवून सांगतील. ते ऐकण्यासारखे आणि निश्चित शिकण्यासारखे असेल. व्यक्तीची आणि कामाची त्यांची पारख अचूक असते. कारण, त्यांनी तळापासून काम करून वेगवेगळ्या कल्पना लढवल्या आहेत. यशस्वी केल्या आहेत आणि स्वतः त्याचे श्रेय कधीच घेतले नाही. एखाद्या कार्यकर्त्यांकडून ती कशी यशस्वी झाली, हेच रंगवून सांगतील. शेवटी ’समझमे आया की नहीं’ असे म्हणतील.
व्यक्ती समजून घेणे, पारख करणे, योग्य कामासाठी नेमणूक करणे आणि काय काम करतो, त्याची त्याच्या स्वतःकडून व इतरांकडून सहज माहिती करून घेणे. त्यावरून निर्णय घेऊन कौतुक करणे अथवा कामात खुबीने बदल करणे, ज्यायोगे व्यक्तीला स्वतःची चूक लक्षात यावी. शक्यतो कुणाला दुखवू नये. कार्यक्षेत्रात बदल करावा. हे तंत्र संस्थेत वापरावे असे त्यांचे निर्णय असतात. व्यक्तीची काम करण्याची क्षमता जाणण्याची त्यांची अटकळ कधी चुकत नाही. कारण, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि संवादकला विलक्षण आहे. कधी कोणी खट्टू होते, कधी गैरसमज होतो. पण, हाती घेतलेला प्रकल्प यशस्वी होतो आणि जोडलेल्या व्यक्ती अचंबित होतात. अधिक क्षमतेने काम करू लागतात. एखाद्याचे काम विशेष आवडले तर, ‘इसने क्या किया बताता हूँ’ करत रंगवून सांगतील. चेहर्‍यावरचे हावभाव बघण्यासारखे असतील. कामाचा परिणाम सांगतील. लहान मुलाची एखादी अचंबित करणारी गोष्ट आजोबांनी सांगावी अगदी तद्वत! इतरांना त्यातून आपणही असे एखादे काम करून बिमलजींना खुश करावे, अशी उमेद ऐकणार्‍याच्या हृदयात जिवंत न होईल तरच नवल! असे त्यांच्या हाकेला तत्पर राहणारे हजारो कार्यकर्ते त्यांनी आजपर्यंत तयार केले आहेत. बिमलजींची नवी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. बिमलजी महिलांना कधीही कमी लेखत नाहीत, उलट त्यांना योग्य सन्मान देतात. महिला स्वतःच्या, घरच्या कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून काम करतात, कामाला पक्क्या असतात, बुद्धीने कमी नाहीच आणि कार्यक्षमतेने उजव्या असतात, अशा मताने त्यांचे महिलांशी बोलणे असते. त्यांनी केलेल्या कामाचे सर्वांसमक्ष कौतुक करण्याची दक्षता पाळतात, जेणेकरून इतर कार्यकर्त्यांनीही महिलांना सन्मान द्यावा. स्वतःचा किती वेळ व्यवसायाला, किती कुटुंबाला द्यायचा हे त्यांनी ठरवले आणि त्यात कधीही बदल केला नाही, मग बाकीचा सर्व वेळ संघाच्या कार्याला दिला, तरी कुणाला तक्रार करायला जागा उरली नसावी. त्यामुळे आयुष्यभर झोकून संघाचे काम केले आणि नवनवीन कल्पना राबविल्या आणि यशस्वी करून दाखवल्या. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे ‘केशवसृष्टी’चे ग्रामविकासाचे काम अचंबित करणारे आहे. त्याला मिळालेले यश अविश्वसनीय आहे. ‘कोविड’मधील त्यांनी सुरु केलेले काम विलक्षण होते. ‘कोविड’मुळे वाताहत झालेल्या अगणित कुटुंबांना त्याचा लाभ झाला. एक कार्यकर्ता, एक कुटुंब आणि एका देणगीदाराने दिलेली देणगी या त्रिसूत्रीने अनेक कुटुंबे सावरली. त्याचे नियोजन करत प्रत्यक्ष राबवणे यामध्ये परिपूर्णता आणि योजनबद्धता होती. त्यातून खूप शिकायलाही मिळाले. दुवे मिळाले, कार्यकर्ते नवीन ध्येयाने एकत्र आले. बिमलजींबरोबर काम करताना एक थोडासा धाक पण, खर्‍या कार्यकर्त्याला खूप काही शिकवून जातो. समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळते आणि बहुमोल अशी शाब्दिक शाबासकी तर नक्कीच मिळते. त्यांच्या 75व्या जन्मदिनादिवशी त्यांना भरपूर आयुरारोग्य, समाधान, आनंद मिळत राहो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मनीषेतील नवनव्या योजना हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने पूर्णत्वाला येवोत, हीच मनोमन प्रार्थना करते.

डॉ. अलका मांडके

(लेखिका ‘केशवसृष्टी’च्या माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत.)