बिमल केडिया एक स्वयंप्ररित स्वयंसेवक

    25-Nov-2024
Total Views |
Bimal Kediya

एक परिचित आवाज, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत, आवाजात आपलेपणा आणि त्याचवेळी एक नैतिक अधिकार! बिमल यांच्याबाबत माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव आला असेल. फोनवरील संभाषणादरम्यान कधीही अधिकारवाणीत ते बोलले नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही रागावले नाहीत. प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यात अनेकांचे योगदान असते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या मदतीला, आपल्याला मार्गदर्शन करायला जी जी व्यक्ती संपर्कात येते, तिचा त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. उलट अनेक गोष्टींमध्ये त्या व्यक्तीचे आपण अनुकरण करणे पसंत करतो. बिमल केडिया हेदेखील असेच एक व्यक्ती आहेत, ज्यांनी अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे.

बिमल कसे बोलतात, ते लोकांच्या मनाची काळजी कशी करतात, छोट्या छोट्या याद्या बनवून नंतर त्या एक एक करून पूर्ण करणे, अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण मी करायचो. सकाळी ८ वाजता बिमल यांच्या घरी भेटायला जाणे म्हणजे ‘कम्युनिकेशन’, ‘सिस्टिमॅटिक वर्किंगचा क्लास’ आणि त्यासोबत वहिनींनी केलेला स्वादिष्ट नाश्ता! कुणाच्या आजाराबाबत चौकशी केली, तरी बिमल यांच्या डायरीत लिहिलेलं असायचं, कुणाचे अभिनंदन करायचे असले, तरी तेही लिहिलेलं असायचं. काम आणि नातेसंबंधांचे महत्त्व समजून घेणे, ही एक गोष्ट आहे आणि त्याबद्दल विचार करणे आणि इतके नियोजन करणे, ही वेगळी गोष्ट. बिमल यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक आयामात व्यवस्थापकीय तत्त्वांचे पालन करून, या विषयांमध्ये प्रचंड परिणामकारकता प्राप्त केली आहे.

सैद्धांतिक आणि भावनिक विषयांमध्ये बुद्धिमत्ता आणि संघटन यांचा यशस्वीपणे वापर करून आणि त्या विषयाची उत्स्फूर्तता आणि शुद्धता अबाधित ठेवून केवळ तीच व्यक्ती परिणाम साध्य करू शकते, ज्याचा वैचारिक पाया भक्कम असतो, ती कला नसते. माझ्या आयुष्यात अनेक लोक आले, अनेकांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, पण माझ्या मनावर आणि स्वभावावर बिमल यांचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. माझ्यासारख्या तरुण स्वयंसेवकासाठी, ज्याची पार्श्वभूमी मराठी आहे, मराठवाड्यातून आलेला आहे, अशा तरुणाला मुंबईसारख्या महानगरात माणसे जोडण्याचे आणि निधी गोळा करण्याचे अवघड काम बिमल यांच्यासारख्यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले आहे. बिमल यांनी फक्त दिशा दाखवली नाही, मला फक्त मार्ग सांगितला नाही, उलट पाठीवर हात ठेवून त्या वाटेवर चालण्याची हिंमत माझ्यात वाढवली. कसे काम करावे, संपर्क कसा करावा, इतकंच नाही शिकवलं, तर त्यापेक्षा ते का केले पाहिजे, त्याचा संघाच्या कार्याला काय फायदा होईल, त्यामागची भावना आणि भूमिका काय असावी, याचे गांभीर्यही बिमल यांनी शिकवले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाखो स्वयंसेवक आजीवन संघाचे कार्य करत असतात. कुठली ना कुठली जबाबदारी पार पाडत असतात. अशा लाखो सामान्य स्वयंसेवकांमुळेच संघ गेली १०० वर्षे अखंड कार्यरत आहे. बिमल हेदेखील एक सामान्य स्वयंसेवक. मात्र, ते एक स्वयंप्रेरित स्वयंसेवकदेखील आहेत. मला बर्‍याचदा असं वाटतं की, बिमल यांच्या मनात ’संघाची विचारधारा’ कायम वावरत असते. संघाशी संबंधित विषयांमध्ये पुढाकार घेणे, त्यांचा पाठपुरावा करणे, विषय, कार्य सिद्धीस जाईस्तोवर त्याची पाठ न सोडणे, अशी महत्त्वाची शिकवण बिमल यांनी माझ्यासारख्यांना दिली. बिमल यांना समजून घ्यायचे असेल, तर मुंबईतील शेकडो उद्योगपतींना संघात येण्याची प्रेरणा काय आहे, हे समजून घेतले पाहिजे.

दि. २४ डिसेंबर रोजी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’, ‘केशवसृष्टी’ येथे ‘१४वा केशवसृष्टी पुरस्कार वितरण सोहळा’ पार पडला. त्यावेळी पुरस्कार देण्याकरिता मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं. तेव्हा समोर ज्यांना बिमल यांनी संघात आणलं, ते सुरेश भगेरिया आणि स्वतः बिमलसुद्धा बसले होते. मी स्टेजवर आणि बिमल खाली उपस्थितांमध्ये, असं साधारण ते चित्र होतं. त्याआधी ते खुर्च्यांची मांडणी करण्यात व्यस्त दिसले, येणार्‍यांची चौकशी करणे, त्यांना काय हवं, काय नको ते पाहणे अशा सर्व गोष्टी त्यांच्या चालू होत्या. थोड्यावेळासाठी तर ते हॉलच्या एका बाजूला उभे होते, नंतर त्यांना बसायला कोणीतरी खुर्ची दिली. हा जो त्यांचा स्वभाव आहे, तो खरेच वाखाणण्याजोगा आहे. आज त्यांनी घडवलेले स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे झाले असतील, पण तरीही बिमल आजही अगदी साधेपणानेच वावरतात. परंतु, जेव्हा बिमल यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवायची वेळ येते, तेव्हा ते बर्‍याचदा संकोच करताना दिसतात. टाळाटाळ करतात. दुसर्‍या कोणाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवा, असं सांगतात. खरेच, ते आजन्म स्वयंसेवक आहेत.

‘पितृछाया’ कार्यालयात त्यांच्या काही बैठका व्हायच्या. तेव्हा बिमल मुंबई महानगर कार्यवाह होते, तर बैठकीदरम्यान ते कधीच कार्यकर्त्यांसमोर एखाद्या अधिकार्‍यासारखे वागले नाहीत. डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय तयार होत आहे. संघ विचारांनी प्रेरित असलेले देशातील पहिले हे वैद्यकीय महाविद्यालय आहे. तो प्रोजेक्ट, त्याचे डिटेल्स मी सर्वप्रथम कोणाकडे शेअर केले असतील, तर ते बिमल आहेत. बिमल यांच्या ‘गुडबुक्स’मध्ये आपलं राहणं, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचं राहणं हे माझ्यासाठी भाग्यशाली आहे.

बिमल यांना समजून घ्यायचे असेल, तर आधी ते समजून घ्यावे लागेल की, हजारो स्वयंसेवक बिनदिक्कत बिमल यांच्याशी का बोलू शकतात आणि मदत मागू शकतात. ‘संघ काहीही करत नाही, परंतु संघाचे स्वयंसेवक सर्व काही करतात.’ ज्यांनी हे विधान आयुष्यभर वास्तवात आणले, अशा आदरणीय बिमलजींना आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

डॉ. अनंत पंढरे

(लेखक डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगरचे संचालक आणि सुकाफा हॉस्पिटल, शिवसागर आसामचे प्रमुख आहेत.)