"थोडक्यात वाचलास! मी सभा घेतली असती तर..."; अजितदादा-रोहित पवारांची अचानक भेट

25 Nov 2024 12:15:52
 
Ajit Pawar
 
सातारा : थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झालं असतं, असा मिश्कील टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार आणि रोहित पवार प्रीतीसंगमावर गेले होते. यावेळी अचानक त्यांची भेट झाली.
 
रोहित पवार अजितदादांच्या समोर येताच ते म्हणाले की, "बच गया. काकांचं दर्शन घे. शहाण्या थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?" दरम्यान, रोहित पवारांनी अजितदादांना वाकून नमस्कार केला.
 
त्यानंतर रोहित पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. आता थोडी विचारांमध्ये भिन्नता आहे. पण शेवटी ते वडीलधारे व्यक्ती आहेत. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी मला खूप मदत केली होती. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे ही आपली संस्कृती आहे. त्यांची सभा झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वरखाली झालं असतं. उलटही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीत इतके अडकून पडले होते की, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही," असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0