सिंधुदुर्ग - १२ फुटांच्या अजस्त्र 'किंग कोब्रा'चा बचाव

25 Nov 2024 21:56:07
king cobra


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधून सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी १२ फुटांच्या अजस्त्र अशा 'किंग कोब्रा' सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescued from sindhudurg). वन विभागाने स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकवस्तीत शिरलेल्या सापाचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. (king cobra rescued from sindhudurg)

'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण १९ फूटांपर्यंत वाढू शकतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग आणि चंदगड तालुका आहे. या तालुक्यांमधून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते. त्यामुळे सहजा दोडामार्गमध्ये त्याला जीवदान दिल्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, सोमवारी सकाळी शिरवळ गावातील बागवाडीमध्ये 'किंग कोब्रा'चे दर्शन घडले. लोकवस्तीनजीक हा साप आल्याने वन विभागाने स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्ते विठ्ठल गवस आणि अनिल गावडे यांच्या मदतीने या सापाचा बचाव केला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.



नुकतेच भारतातील सरीसृप शास्त्रज्ञांनी 'किंग कोब्र'ाच्या मूळ प्रजातीचे विभाजन करुन या सापाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या 'किंग कोब्रा' सापाला 'वेस्टर्न घाट किंग कोब्रा' असे सामान्य नाव देण्यात आले असून त्याचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा', असे करण्यात आले आहे. शिवशकंराच्या गळ्यातील साप हा काळा असतो आणि त्याला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. पश्चिम घाटात आढळणारा किंग कोब्रा हा काळसर रंगाचा असल्याने संशोधकांनी त्याचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा', असे केले आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या 'किंग कोब्रा'चे विभाजन नव्या प्रजातीमध्ये केल्याने महाराष्ट्रामध्ये आढळणारा 'किंग कोब्र'ा देखील आता 'आॅफिओफॅगस कलिंगा' या नावानेच ओळखला जातो.
.
Powered By Sangraha 9.0