नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नऊपैकी सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) पुन्हा तळपले असून मतदारांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला राज्यात पुन्हा बस्तान बसविण्याचे वेध लागले होते. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशात होणार्या नऊ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा धक्का देण्याची तयारी केली होती. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या जुन्यात ‘पीडीए’ अर्थात ‘पिछडा-दलित-आदिवासी’ या समीकरणास बळ देण्याची तयारी केली होती. काँग्रेसनेदेखील समाजवादी पक्षाच्या धोरणास पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यामुळे बळ आल्याचा गैरसमज झालेले अखिलेश यादव हेदेखील चांगलेच फॉर्मात आले होते. पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव करून उत्तर प्रदेशातून काँग्रेसला बाजूला सारणे आणि २०२७ साली होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला आव्हान देण्याचे मनसुबे त्यांनी रचले होते.
मात्र, उत्तर प्रदेशच्या मतदारांनी अखिलेश यादव आणि सपाच्या समीकरणांना मोठा धक्का दिला आहे. राज्यात मीरपूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, फुलपूर, कटहरी आणि मझवाँ या सात मतदारसंघांमध्ये भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे. त्याचवेळी, सपाला केवळ करहल आणि शीशमऊ या मतदारसंघांमध्ये विजय मिळता आला आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा रंग बदलला आहे. पोटनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या अजेंड्याने मतदारांना योग्य तो संदेश दिला आणि भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. विशेष म्हणजे, भाजपने कुंदरकी आणि कटहरी हे मतदारसंघ जवळपास तीन दशकांनी सपाकडून हिसकावून घेतले आहेत.
पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लोकसभेच्या निकालानंतर लगेचच कामाला लागले होते. त्यांनी ३० मंत्र्यांची टास्क फोर्स तयार केली होती. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी दोन ते तीन मंत्र्यांना दिली होती. ते स्वतः नियमित बैठका घेऊन आढावा घेत होते. उत्तर प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीचे सदस्य-मुख्यमंत्री योगी, उपमुख्यमंत्री केशव मौर्य, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि संघटनमंत्री धरमपाल सिंह अशा सर्व नेत्यांनी प्रत्येकी दोन विधानसभांच्या जागांची जबाबदारी घेतली. मुख्यमंत्री योगी स्वतः कटहरीचे प्रभारी बनले होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच, योगी आदित्यनाथ यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांचे दौरे केले होते. प्रत्येक मतदारसंघाच्या सामाजिक समीकरणानुसार आखणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री योगी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना बूथ स्तरापर्यंत निवडणूक व्यवस्थापन खंबीरपणे हाताळण्याच्या सूचना दिल्या. नेत्यांनी आपापल्या भागात लोकांमध्ये जाऊन चौपाल सभा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
पोटनिवडणुकीत ९ पैकी ७ जागांवर भाजपचा विजय
कुंदरकी मतदारसंघात घडवला इतिहास
उत्तर प्रदेशातील कुंदरकी मतदारसंघ हा तब्बल ३१ वर्षांनी जिंकण्यास भाजपला यश आले आहे. हा मतदारसंघ मुस्लीमबहुल असून येथे भाजपला १९९३ सालानंतर विजय मिळवता आला नव्हता. हा मतदारसंघ प्रथम बसपा आणि सपाच्या ताब्यात होता. पोटनिवडणुकीत मात्र भाजपच्या रामवीर सिंह यांनी तब्बल १ लाख, ७० हजार, ३७१ मते मिळवून सपाचे मोहम्मद रिझवान यांचा पराभव केला. हा पराभव साधासुधा नसून केवळ २५ हजार, ५८० मते मिळवणार्या रिझवान यांना तब्बल १ लाख, ४४ हजार, ७९१ मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे ११ उमेदवार होते आणि ते सर्वच्या सर्व मुस्लीम होते. मात्र, तरीदेखील येथे भाजपने मिळवलेला विजय हा ‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे-नेक रहेंगे-सुरक्षित रहेंगे’ या नार्यास सिद्ध करणारा ठरला आहे.