सर्वसमावेशक चेहर्‍याला पुन्हा दिली संधी

24 Nov 2024 17:57:27
Ravindra Chavan

डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) आणि मविआचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्यात लढत झाली. पण, यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बाजी मारली.
एखाद्या मतदारसंघात एकदा उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा निवडून येतात. तेव्हा तो मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला बनून जातो. मंत्री रविंद्र हे सलग तिसर्‍यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि आता चौथ्यांदा त्यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नागरिकांसह प्रत्येक पक्षातील राजकीय मंडळींशी त्यांचे चांगले संबंध आहे. याशिवाय त्यांनी शहरासाठी भरघोस निधी आणून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले.

शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांनाही त्यांनी नेहमीच चालना दिली आहे. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. येथे विविध कार्यक्रम चव्हाण यांच्या पुढाकाराने होत असतात. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातही ते लोकप्रिय आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाने चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली होती. त्यामुळे त्यांना स्वत:च्या प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. पण, कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करण्यात आला. या निवडणुकीत आगरी कार्ड चालेल, हा धोका चव्हाण यांना होता. मात्र ते फारसे चालले नाही.

डोंबिवली पश्चिमेत त्यांना मताधिक्य कमी होईल, अशी चव्हाण यांना धास्ती होती. पण, चव्हाण यांना 40 हजारांचे मताधिक्य शहराच्या पश्चिमेतून मिळाले आहे. चव्हाण यांचा सर्वाधिक प्रचार हा डोंबिवली पश्चिमेतच झाला. रेल्वे स्थानकांचा केलेले कायापालट आणि अनधिकृत टपर्‍या हटविल्याने रेल्वे प्रवाशांसह नागरिकांच्या ते अधिक पसंतीस उतरले आहेत.
नरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया...

मी कल्याण पश्चिम येथून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो आणि अपक्ष म्हणून नामनिर्देशन अर्ज भरला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला महायुतीचा धर्म पाळायची सूचना केली होती. त्यानुसार मी या निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम केले. आज आनंद होतो आहे की, भोईर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. माझ्यावर पक्षाने उल्हासनगर विधानसभा प्रभारी ही जबाबदारी सोपविली होती. येथेदेखील आमचे कुमार आयलानी प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. राज्यात भाजप प्रणित महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर विकासकामे करेल, याची खात्री वाटते.

चौकात बॅनर्स झळकले

रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांना खात्री होती. निकाल जाहीर होताच एका तासात डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील चौकाचौकात त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकले. ‘विचारधारेचा विजय, एकनिष्ठतेचा विजय, डोंबिवलीत चौथ्यांद्या विजयी’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले.

रविंद्र चव्हाण यांना प्रचारात केली यांनी मदत

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचा झंझावात उभारला होता. भाजपमध्ये चाणक्य नीतीचे नेते म्हणून रविंद्र चव्हाण यांची ओळख असल्याने त्यांच्या खांद्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी डोंबिवलीत केलेल्या विकासकामांना डोंबिवलीकर जनतेने पुन्हा एकदा पसंती देऊन सलग चौथ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. चव्हाण यांच्या विजयाची खात्री असल्याने सावळाराम क्रीडा संकुल परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसा विजय जाहीर झाला, तर लगेच ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून मोठा जल्लोष करण्यात आला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे युवा नेते आणि माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी उबाठा गटात प्रवेश करून डोंबिवली विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळविले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात जाहीर सभा घेतली होती. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील कार्यकर्ता मेळाव्यात युतीचा धर्म पाळण्याचे आदेश शिवसेना कार्यकर्त्यांना दिले. अखेरच्या तीन दिवसांत शिवसेना नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी पश्चिमेकडील रामचंद्र कॉम्प्लेक्स येथे रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य सभा घेतली.

शिवसेना शाखा प्रमुख प्रताप पाटील हेदेखील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह या सभेत उपस्थित होते. तसेच बाळा म्हात्रे यांनीदेखील हजारो भव्य रॅली काढून चव्हाण यांना पाठिंबा दर्शविला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविंद्र चव्हाण यांनी शहरात भव्य रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. याशिवाय पक्षातील सर्वच पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचा प्रचार करून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

Powered By Sangraha 9.0