‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने केला लांगूलचालनाचा पराभव’
24-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने लांगूलचालनाचा पराभव केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सलग तिसर्यांदा भाजपच्या सुशासनास निवडले असून काँग्रेसच्या ‘अर्बन नक्षलवादी इकोसिस्टीम’चे षड्यंत्र उधळून लावले आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी करून १३२ जागांवर विजय मिळवला आहे. त्याचवेळी महायुतीने शिवसेनेच्या ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ जागांच्या साथीने २३० जागांचे दणदणीत बहुमत मिळवले आहे. त्यानंतर परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील पक्ष मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ‘जय भवानी... जय शिवाजी...’ या जयघोषाने आपल्या भाषणास प्रारंभ केला. ते म्हणाले की, “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले आहे की, लांगूलचालनाचा पराभव कसा करावा. महाराष्ट्राने लांगूलचालनास नाकारून संपूर्ण देशासमोर नवा आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्रामध्ये विकासवाद, सुशासन आणि सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे, तर खोटेपणा आणि फसवणुकीचा पराभव झाला आहे.
मराठी मतदारांनी विभाजनवादी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीसही सपशेल नाकारले आहे. या निकालांनी अनेक नवे विक्रम केले आहेत. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही निवडणूकपूर्व आघाडीस मिळालेले हे सर्वोच्च यश आहे. त्याचप्रमाणे, भाजपला सलग तिसर्यांदा जनादेश मिळून भाजप सलग तिसर्यांदा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे, भाजपला सलग तिसर्यांदा जनादेश देणारे महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“संविधान आणि आरक्षणाच्या नावे महाराष्ट्रातील दलित आणि वनवासी समुदायांची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र महाराष्ट्राने नाकारले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “देशात दोन संविधानांची भाषा बोलण्याचे काम काँग्रेस करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या साथीने पुन्हा ‘कलम ३७०’ लागू करण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. मात्र, देशात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून देशात केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच संविधान चालणार असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. देशातील ओबीसी, वनवासी आणि दलितासंह सर्व समाजघटकांमध्ये भेदभाव करून आपला स्वार्थ साधणार्यांना जनतेने नाकारले आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षामधील एकाच कुटुंबांच्या वर्चस्वास क्षमता असलेला सर्वसामान्य कार्यकर्ता कंटाळला आहे. काँग्रेसने कितीही लपविण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील काँग्रेसमध्ये पेटलेला अंतर्गत संघर्ष लपून राहणार नाही,” असाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधानांनी ‘माझे परममित्र’ असा केला.
भारतीय संविधानात ‘वक्फ’ला जागाच नाही
“घटनाकारांनी हिंदू संस्कार आणि परंपरेप्रमाणे भारतासाठी धर्मनिरपेक्षता निवडली होती. मात्र, काँग्रेसमधील कुटुंबाने आपली सत्तेची भूक भागवण्यासाठी ‘खोट्या सेक्युलरिझम’च्या नावाखाली लांगूलचालन सुरू केले. त्यासाठी मनमानी पद्धतीने कायदेही बनवले. ‘वक्फ बोर्ड कायदा’ हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र, भारतीय संविधानात ‘वक्फ’ला कोणतीही जागा नाही. मात्र, आपल्या कुटुंबाची मतपेढी चुचकारण्यासाठी काँग्रेसने असा कायदा करून सामाजिक न्यायास चूड लावली,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला.