राजेश वानखडे - भाजप, तिवसा मतदारसंघ
सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवल्यानंतर २०२४ सालची ही चौथी निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. २०१९ सालच्या निवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार राजेश वानखडे यांना यावेळी ( Mahayuti Won) भाजपने उमेदवारी दिली. परिणामी, यशोमती ठाकूर यांची विजयी घोडदौड रोखण्यात राजेश वानखडे यांना यश आले आहे. राजेश वानखडे यांनी ७ हजार, ६१७ मतांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला आहे. एप्रिल २०२४ मधील लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला होता. मात्र विधानसभेत यशोमती ठाकूर यांना पराभूत करून राजेश वानखडे तिवसा मतदारसंघात जायंट किलर ठरले आहेत.
स्नेहा दुबे - भाजप, वसई मतदारसंघ
वसई मतदारसंघातून तीनवेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा वसईच्या जनतेने नाकारले आहे. भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा ३ हजार, १५३ मतांनी पराभव केला आहे. ठाकूर कुटुंबाची ही पराभवाची पहिलीच वेळ आहे. वसई-विरारच्या जनतेने दिलेला हा निकाल संपूर्ण वसई-विरारसाठी धक्कादायक ठरला आहे. या पराभवाने बहुजन विकास आघाडीची वसई-विरारमधील मक्तेदारी संपली असून, भाजप आणि शिंदे गटाने येथे आपली पकड मजबूत केल्याचे दिसत आहे. वसई, विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
प्रवीण तायडे - भाजप, अचलपूर मतदारसंघ
परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पराभवाचा जबर धक्का बसला आहे. अचलपूर मतदारसंघात भाजपचे प्रवीण तायडे यांनी विजय मिळवत बच्चू कडू यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आहे. प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा १२ हजार, १३१ मतांनी पराभव केला. तायडे यांना ७८ हजार, २०१ तर बच्चू कडू यांना ६६ हजार, ०७० मते मिळाली आहेत.
हिकमत उढाण - शिवसेना, घनसावंगी मतदारसंघ
शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांना घनसावंगीत धक्का बसला असून, शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी बाजी मारली आहे. टोपे आणि उढाण यांना भाजपचे बंडखोर अपक्ष सतीश घाटगे यांनी आव्हान दिले होते. मात्र, मतविभागणी न झाल्याने राजेश टोपे यांना मोठा फटका बसल्याचे निकालाअंती दिसून आले आहे. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून यंदाही त्यांना विजयाचा षटकार मारू असा विश्वास होता. मात्र त्यांचे राजकीय विरोधक असलेले हिकमत उढाण यांनी पाच हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत राजेश टोपेंच्या षटकार करण्याच्या स्वप्नांना धुळीस मिळवले आहे.
अमोल खताळ - शिवसेना, संगमनेर मतदारसंघ
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी शिवसेनेचे अमोल खताळ यांना कौल देत त्यांचा आमदार बदलला आहे. अमोल खताळ यांनी थोरातांचा १० हजार, ५६० मतांनी पराभव केला आहे. यामुळे काँग्रेसचा अभेद्य गढ ढासळला आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले - भाजप, कराड मतदारसंघ
कराड दक्षिण हा काँग्रेसचा गड राहिला आहे. इथून काँग्रेसने कधी पराभव पाहिला नाही. मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यावेळी पहिल्यांदाच या गडालाही तडा गेला. भाजपचे डॉ. अतुल भोसले यांना १ लाख, ३९ हजार, ५०५ मते मिळाली. तर विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १ लाख, १५० मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुल भोसले यांचा ३९ हजार, ३५५ मतांनी विजयी झाला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा असलेला पारंपरिक गड नेस्तनाबूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने हा निकाल राज्याच्या राजकारणात अधोरेखित झाला आहे.
अमल महाडिक - भाजप, कोल्हापूर दक्षिण
कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना सर्वात मोठा तगडा झटका बसला असून, पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. भाजपचे अमल महाडिक यांनी १७ हजार, ६३० मतांनी काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचा पराभव केला आहे. खा. धनंजय महाडिक यांना महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा फटका अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, कोल्हापूर दक्षिणमध्ये त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे. प्रियांका गांधी यांची सभा होऊनही फारसा परिणाम झालेला नाही.