महाराष्ट्राने देशविघातक ‘नॅरेटिव्ह’ नाकारले!

24 Nov 2024 16:42:41
rahul gandhi

नवी दिल्ली : ‘भाजप संविधान बदलणार’ आणि ‘भाजप आरक्षण रद्द करणार’ असे खोटे ‘नॅरेटिव्ह’ घेऊन महाराष्ट्र ( Maharashtra ) जिंकण्याच्या वल्गना करणार्‍या काँग्रेसने यंदा नीचांकी कामगिरी केली आहे. या कामगिरीचे शिल्पकार ठरले आहेत, अर्थातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंतची ऐतिहासिक कामगिरी करून तब्बल १३२ जागा प्राप्त करून महायुतीच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचवेळी, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजवरची नीचांकी कामगिरी नोंदवत अवघ्या १६ जागांवर विजय प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे अनेक दिग्गज आणि बालेकिल्लेदेखील या निवडणुकीमध्ये पडले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ‘भाजप संविधान बदलणार’ आणि ‘भाजप आरक्षण रद्द करणार’ या ‘नॅरेटिव्ह’द्वारे ९९ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर हाच देशविघातक ‘नॅरेटिव्ह’ घेऊन राहुल गांधी हे हरियाणाच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र, हरियाणाच्या जनतेने राहुल गांधी यांचा हा ‘नॅरेटिव्ह’ साफ धुडकावला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात हाच ‘नॅरेटिव्ह’ राहुल गांधी यांनी हाती घेतला होता. त्यासाठी भारतीय संविधानाच्या नावे कोरे नोटपॅड वाटण्याचाही उद्दामपणा काँग्रेसने केला होता. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने राहुल गांधी, काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमचा हा ‘नॅरेटिव्ह’ शब्दशः नाकारला आहे. महाराष्ट्रात १०२ जागा लढवणार्‍या काँग्रेसला केवळ १६ जागांवर यश मिळाले आहे. लोकसभेतील अपघाती विजयाचा अतिआत्मविश्वास आलेल्या काँग्रेसने झारखंडमध्येही ‘झारखंड मुक्ती मोर्चा’सोबत आघाडीधर्म पाळला नव्हता. झारखंडमध्ये ‘इंडी’ आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणूक प्रचारात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे आदी काँग्रेस नेत्यांनी ‘इंडी’ आघाडीच्या इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी एकही सभा घेतली नव्हती. झारखंडमध्ये ३० जागा लढवणार्‍या काँग्रेसला १६ जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे येथेही ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ची कामगिरी काँग्रेसपेक्षा उजवी ठरली आहे.

पराभव हेच राहुल गांधींचे वैशिष्ट्य

राहुल गांधी यांनी राजकारणात २० वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला प्रामुख्याने पराभवच पत्करावे लागले आहेत. राहुल गांधी २००४ मध्ये सक्रिय राजकारणात आले. त्यानंतर २०१४ पर्यंत काँग्रेस सत्तेत राहिली. मात्र, त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्या आई सोनिया गांधी करत होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांना वारंवार लॉन्च करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून झाले. मात्र, काँग्रेसची कामगिरी घसरत राहिली. एक-दोन राज्यांतील निवडणुका वगळता, काँग्रेसला राहुल यांच्या नेतृत्वाखाली बरे यश मिळालेले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निकालावरून पराभव हेच राहुल गांधी यांचे वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Powered By Sangraha 9.0