मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल अखेर जाहिर झाला आणि महायुती सरकारला महाराष्ट्रतील जनतेने कौल दिला. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या तीन्ही पक्षांच्या गळ्यात लोकांनी विजयाची माळ घातली. अशातच आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहीलेलं पत्र व्हायरल झाले आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महायुतीला मिळालेला विजय हा फक्त भाजप महायुतीचा नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा विजय असल्याचे या पत्रात नमूद केले गेले आहे. मेहनत एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशिर्वाद आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वार महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखवलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. याच सोबत महायुतीच्या सर्व घटक पक्षांतील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या विजयाला एक नवीन दिशा मिळाली असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हा विजय भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रेरणा देत राहील असे म्हणत फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहे.