जुन्नरमधून सोनावणे, तर चंदगडमधून शिवाजी पाटील विजयी
24-Nov-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे ( Election ) निकाल जाहीर झाले असून, यंदा केवळ दोन अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अपक्षांचा बोलबाला असल्याचे यापूर्वीच्या निकालांतून दिसून आले आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही एकूण २ हजार, ८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात काही बंडखोरांचादेखील समावेश होता. मात्र, फक्त दोनच अपक्षांना यावेळी विजय मिळवता आला आहे.
निवडणुका म्हटले की, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, त्यातून निर्माण होणारी नाराजी, त्यातून झालेली बंडखोरी किंवा काही वेळा फक्त कामाच्या जोरावर संघटना पाठीशी नसताना जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष विधानसभेवर निवडून जातात. दर विधानसभेला किमान १ हजार, ५०० ते १ हजार, ८०० अपक्ष उमेदवार रिंगणात असतात. यावेळी सर्वच पक्षांत उमेदवारी देण्यावरून मोठ्या प्रमाणात निष्ठावंतांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याने अपक्ष उमेदवारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली. मविआमधील नाराज उमेदवारांचे मन बळवणे शक्य न झाल्याने, त्याचा काहीसा फटका मविआला बसलेला दिसून येतो. मात्र, महायुतीने बहुतांशी बंडखोरांचे मन वळवण्यासाठी केलेली शिष्टाई यशस्वी ठरल्याचे दिसते. जाहीर झालेल्या निकालानुसार, अवघे दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जुन्नर येथील शरद सोनावणे, तर चंदगड येथून शिवाजी पाटील निवडून आले. एकनाथ शिंदे शिवसेना समर्थक अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांनी ७३ हजार, ३५५ मते मिळवत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सत्यशील शेरकर यांचा ६ हजार, ६६४ मतांनी पराभव केला, तर चंदगड येथून भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी ८४ हजार, २५४ मते मिळवत तब्बल २४ हजार, १३४ मतांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला.
मुळातच अपक्ष म्हणून निवडून आलेेल्या आमदारांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने, त्यांचे राजकीय भविष्य बहुदा निश्चित आहेच. त्यातही, निवडणुकांचा निकाल पाहता, सध्या अपक्षांचे महत्त्व वाढवणार्यादेखील नाहीत.
साधारणत: काठावर उत्तीर्ण होणार्या किंवा बहुमतापासून किंचित दूर राहिलेल्या सरकारला बहुमतासाठी अपक्षांच्या मदतीची गरज भासते. मात्र, सध्याच्या निकालावरून महायुतीला मिळालेला विजय स्पष्ट असून, अपक्षांना त्यात फार स्थान नाही, हे स्पष्ट झाले आहे.