पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत महायुतीने येथे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत महायुतीने येथे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते.
महाराष्ट्राच्या इतिहासात पश्चिम महाराष्ट्र नेहमीच निर्णायक भूमिकेत राहिला आहे. हा भाग कायम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून येतो. या विभागात महाविकास आघाडी, मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव स्पष्ट आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत, राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ती वेगाने बदलली. जनादेशाची अवहेलना करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला, तो राज्यातील जनतेला फारसा रुचलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी ही बाब अधोरेखित केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लीम मतांचे जे ध्रुवीकरण झाले, त्याचा थेट फटका भाजपला बसला. मात्र, हे आपले वैयक्तिक यश असल्याच्या भ्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे राहिले आणि विधानसभेत त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली, असे म्हणता येते. महायुतीने पश्चिम महाराष्ट्रातील 44 जागांवर विजय निश्चित करत, हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले तर काय होते, हे दाखवून दिले. मविआला केवळ दहा जागा तर अन्य चार जागांवर विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला या विभागाला मजबूत जनाधार मिळाला. मात्र, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर, त्यांनी मिळालेले घवघवीत यश काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा कमी करणारे ठरले. ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेले यश आणि मुस्लीम मतांच्या तुष्टीकरणाला केलेला विरोध मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिला.
महायुती सरकारने राबविलेल्या विकास योजना, लाडकी बहीण तसेच शेतकरी बांधवांना दिलेल्या सवलती, ‘वंदे भारत’सारख्या अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पांना मिळालेली मंजुरी ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणे राहिली. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा भाजपने दिलेला इशारा निर्णायक ठरला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही ठिकाणी उमेदवारांची निवड चुकली होती. तसेच मुस्लीम मते एकगठ्ठा विरोधात जातील, ही शक्यता गृहित धरण्यात आली नव्हती. मविआने ‘भाजप संविधान बदलणार’, हा जो ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवला, त्यामुळे दलित मते विरोधात गेली आणि रांगा लावून मुस्लिमांनी केलेले मतदान निकाल बदलणारे ठरले. या चुकांमधून बोध घेत, विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रभावीपणे जागावाटप केले. ‘कमळ’, ‘धनुष्यबाण’ आणि ‘घड्याळ’ यांची कोणतीही गल्लत होणार नाही, याची काळजी घेतली. उमेदवार देतानाही ही काळजी घेतली गेली. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा जो इशारा दिला, त्याला लक्षात ठेवत विरोधकांचे ‘फेक नॅरेटिव्ह’ यशस्वी होणार नाही, याची काळजी घेतली गेली. आक्रमक प्रचार करतानाच, महायुतीच्या विकासकामांना जनतेसमोर मांडण्यात तिन्ही पक्ष यशस्वी ठरले.
काँग्रेसची घराणेशाही या निवडणुकीने पूर्णपणे मोडीत काढली. पक्षाचे अनेक दिग्गज उमेदवार मतदारांनी घरी बसवले. यात पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करावा लागेल. ‘पक्ष चोरला, चिन्ह चोरले, बाप चोरला’ हा विरोधकांचा दावा आणि आरोप मतदारांनी स्पष्ट शब्दांत नाकारला. म्हणूनच, महायुतीला घवघवीत यश मिळाले. पुणे जिल्ह्यातही अजित पवारांनी दोन जागांचा अपवाद वगळता अन्यत्र लक्षणीय यश मिळवले. बारामतीत शरद पवारांच्या उमेदवाराला लाखांच्या मताधिक्याने पराभूत करत, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मारलेली मुसंडी लक्षणीय ठरली. अजित पवार तसेच दिलीप वळसे-पाटील यांना मिळालेले यश हे राष्ट्रवादी कोणाची हे स्पष्ट करणारे ठरले. त्याचवेळी, सातारा, कराड येथेही महायुती प्रभावी ठरली. पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली या भागात अक्षरशः ‘भगवे वादळ’ आलेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
ज्या सातार्यातून शरद पवार यांनी मुद्दामहून पावसात भिजत, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जनतेची सहानुभूती मिळवली होती, त्याच सातारा जिल्ह्यात शरद पवार गटाचा झालेला पराभव हा अतिशय यथायोग्य असाच ठरला. सहानुभूतीच्या लाटेवरती फार काळ तरता येत नाही, हे या निकालाने अधोरेखित केले. पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री. मात्र, त्यांनीही महायुती विरोधात जो धादांत खोटा प्रचार केला, तो त्यांना घरी बसवणारा ठरला. एकूणच सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राचे असलेले वर्चस्व आणि या पट्ट्यातच भाजपने तसेच महायुतीने मारलेली मुसंडी, या सहकार क्षेत्राला संजीवनी देणारे ठरेल. पुण्यातील सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही या भागाकरिता भरीव कार्य करायला मतदारांनी संधी दिली आहे, असे म्हणता येते. महायुतीच्या भगव्या त्सुनामी लाटेत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार तसेच उबाठा आणि काँग्रेस यांची वाताहात झालेलीच दिसून येते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी अनाकलनीय पद्धतीने मविआची उचललेली तळी, या भागातील शेतकर्यांना रुचली नाही, हाही मोठा मुद्दा आहे. या पट्ट्यात दूध उत्पादक शेतकरी, तसेच ऊस उत्पादक बहुसंख्येने आहेत. उसाला मिळणारा दर हा इतके वर्षे निवडणुकीत कळीचा मुद्दा होता. मात्र, तो आता बाजूला पडलेला दिसतो.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला विधानसभा निवडणूक निकालात अक्षरशः उद्ध्वस्त झालेला दिसून आला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात अजिबात दिसून आला नाही. एकूणच, महायुतीची विकासकामे, ‘लाडकी बहीण’, ‘बटेंगे तो कटेंगे’चा परिणाम, शेतकर्यांसाठीच्या योजना यांचा एकत्रित परिणाम म्हणून महायुती मविआच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी ठरली, असे निश्चितपणे म्हणता येते.
भाजप 19
शिवसेना (शिंदे) 07
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 13
जनसुराज्य शक्ती 02
पुरस्कृत 03
उबाठा 01
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 01
अपक्ष 02