उबाठा’चा सुपडा साफ!

24 Nov 2024 11:18:21
 
Uddhav Thackeray Lose
 
सिंधुदुर्ग: ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभा किंवा लोकसभा, तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच. नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले.
 
सिंधुदुर्ग: ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभा किंवा लोकसभा, तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच. नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीतही उमटले. कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि नारायण राणेंनी घेतलेल्या विशेष मेहनतीला फळ मिळाले. कोकणी मतांच्या जीवावर राजकीय पोळी भाजू पाहणार्‍या उबाठा गटाला मतदारांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही दणका दिला. एकेकाळी कोकणावर एकहाती वर्चस्व राखणार्‍या उबाठाचा सुपडा साफ झाला. विशेष म्हणजे गुहागर वगळता, महाविकास आघाडीला एकही जागा राखता आलेली नाही.
 
उद्धव ठाकरेंनी विधानसभेतही कोकणात सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा यशस्वी झाला नाही. बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले राणे आणि देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचे मनसुबे हाणून पाडत विकासाच्या मुद्द्यांना अग्रभागी ठेवले. तळकोकणाला उद्योगांचे ‘हब’ बनविण्याची ग्वाही दिली. रिफायनरीचा मुद्दा शिताफीने हाताळला. यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छीमारांना येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे किनारपट्टीलगतच्या गावांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याची ग्वाही दिली. कोकणातील जनतेने या मुद्द्यांना उचलून धरत, ठाकरेंच्या भावनिक प्रचाराला मूठमाती दिली. त्यामुळेच उबाठा गटाचा सुपडा साफ झाला.
 
कणकवली विधानसभा मतदारसंघात यंदा उद्धव ठाकरेंनी संदेश पारकर यांना मैदानात उतरवत भाजपच्या नितेश राणे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांनी पारकर यांचा दुपटीहून अधिक मतांनी पराभव केला. पारकर यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा नितेश यांची आघाडी अधिक आहे. विकासकामांचा झपाटा आणि जनसंपर्काच्या जोरावर राणे यांनी हा मतदारसंघ अशा पद्धतीने बांधला, की त्यांना पराभूत करणे जवळपास अशक्यच! 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी युती धर्म मोडत नितेश राणे यांच्याविरोधात सतीश सावंतांना उमेदवारी दिली. पण, त्यांना सपाटून मार खावा लागला. यावेळेस त्यांच्या विरोधात लढण्यास कोणीच तयार नसल्यामुळे ठाकरेंवर उमेदवार आयात करण्याची वेळ ओढवली. तरीही राणेंची लाट थोपवण्यात त्यांना अपयश आले.
 
कुडाळ मतदारसंघ हा राणेंचाच बालेकिल्ला. पण, 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी तो हिसकावून घेतला. नारायण राणेंचा पराभव करीत वैभव नाईक ‘जायंट किलर’ ठरले. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. 2019 मध्ये युतीच्या समीकरणात ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे नाईक यांना पुन्हा संधी मिळाली. परंतु, शिवसेनेतील फुटीनंतर येथील चित्र बदलले. लोकसभेला नारायण राणेंना मिळालेली आघाडी हे त्याचे ताजे उदाहरण. ही संधी हेरत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निलेश राणे यांना उमेदवारी दिली. निलेश यांनी जोरदार प्रचार करीत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला.
 
सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर उबाठा गटाचे राजन तेली आणि अपक्ष विशाल परब यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. परंतु, नारायण राणे आणि रविंद्र चव्हाणांच्या खेळीने त्यांना तारले. केसरकर लोकसभेला नारायण राणे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. या मदतीची परतफेड राणेंनी विधानसभेत केली.
 
भास्कर जाधव यांचा निसटता विजय
 
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांवर महायुतीने आपला झेंडा फडकावला आहे. गुहागर वगळता एकाही मतदारसंघात मविआला टिकाव धरता आलेला नाही. रत्नागिरीत उदय सामंत यांनी आपला गड राखला. सोबतच शेजारील राजापूर मतदारसंघ महायुतीच्या गोटात नव्याने समाविष्ट करण्यात त्यांना यश मिळाले. या मतदारसंघात तीन टर्म आमदार राहिलेल्या उबाठा गटाच्या राजन साळवी यांचा उदय सामंत यांचे बंधू किरण यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
 
गुहागर मतदारसंघातून उबाठा गटाचे भास्कर जाधव मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा केला जात असताना, शिवसेनेच्या राजेश बेंडल यांनी त्यांचा घाम काढला. 2 हजार, 592 इतक्या निसटत्या मतांनी जाधव विजयी झाले. उबाठा गटाचा उद्ध्वस्त होणारा गड थोडक्यात वाचला. भविष्यकाळात भास्कर जाधव यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दापोलीमधून रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी विजय मिळवला. ते दुसर्‍यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. चिपळूणमध्ये शरद पवार गटाने विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते सफल झाले नाहीत. निकम यांनी 6 हजार, 867 मतांनी प्रशांत यादव यांचा पराभव केला.
भाजप 01
शिवसेना (शिंदे) 05
शिवसेना (उबाठा) 01
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 01
Powered By Sangraha 9.0