मराठवाड्याने जातीभेदाच्या भिंती नाकारल्या...

24 Nov 2024 12:38:19

मराठवाडा
 
मराठवाडा जातीयवादी नाही, मराठा-ओबीसी-अन्य जाती अशी फूट पाडून राजकीय पोळ्या भाजणार्‍या नेत्यांना व पक्षांना मराठवाडा थारा देत नाही, याचे प्रत्यंतर दाखवून देणारी 2024 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला ‘जरांगे फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ करत संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केले आणि जातीभेदांच्या भिंती उभारण्याचा जाणत्या नेत्यांचा प्रयत्न पूर्णतः हाणून पाडला. ‘जिहादी’ मानसिकतेला खतपाणी घालून आणि हिंदू समाजात फूट पाडून यश मिळविण्याचा लोकसभेत बर्‍याच प्रमाणात यश मिळविलेला ‘फॉर्म्युला’ यावेळी मात्र निष्प्रभ ठरला.
 
मराठवाडा जातीयवादी नाही, मराठा-ओबीसी-अन्य जाती अशी फूट पाडून राजकीय पोळ्या भाजणार्‍या नेत्यांना व पक्षांना मराठवाडा थारा देत नाही, याचे प्रत्यंतर दाखवून देणारी 2024 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला ‘जरांगे फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ करत संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केले आणि जातीभेदांच्या भिंती उभारण्याचा जाणत्या नेत्यांचा प्रयत्न पूर्णतः हाणून पाडला. ‘जिहादी’ मानसिकतेला खतपाणी घालून आणि हिंदू समाजात फूट पाडून यश मिळविण्याचा लोकसभेत बर्‍याच प्रमाणात यश मिळविलेला ‘फॉर्म्युला’ यावेळी मात्र निष्प्रभ ठरला.
 
आजवर विविध पक्षांमधून प्रवास करणारे, विविध पक्षांची व आघाड्यांची स्थापना करणारे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची मराठवाडा ही नेहमीच ‘प्रयोगभूमी’ राहिलेली आहे. विद्यापीठ नामांतरापासून मराठा महामोर्चांपर्यंत विविध प्रयोग त्यांच्याच प्रेरणेतून मराठवाड्यात राबविले गेल्याची चर्चा असते. यावेळीही मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध स्तरांवर आंदोलने झालेली असताना आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा फटका भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला बसल्याचे स्पष्ट झालेले असताना 2024 सालची विधानसभा निवडणूक मात्र आपलेवेगळेपण सिद्ध करणारी ठरली आहे. मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांतील एकूण 46 विधानसभा मतदारसंघांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 40 जागा महायुतीने जिंकल्या. छत्रपती संभाजीनगर (नऊ), जालना (पाच), बीड (सहा), परभणी (चार), हिंगोली (तीन), नांदेड (नऊ), धाराशिव (चार) आणि लातूर (सहा) या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांवर महायुतीचा झेंडा डौलाने फडकत आहे.
 
भाजप 19, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आठ असे महायुतीचे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसला संपूर्ण मराठवाड्यात यावेळी निराशा हाती लागली. उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीला निसटते यश मिळवता आले. मविआच्या अनेक दिग्गजांना यावेळी पराभव पत्करावा लागला. अनेकांना आपल्या परंपरागत मतदारसंघात मागील 20-25 वर्षांपासून असलेली सत्ता सोडावी लागली, तर काही ठिकाणी नवख्या उमेदवारांनी जुन्याजाणत्यांना पाणी पाजले.
 
विधानसभेची 2024 सालची ही निवडणूक अनेक दृष्टींनी महत्त्वाची होती. मराठवाड्याच्या दृष्टीने मराठा आरक्षण आंदोलन, मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन, उबाठाने प्रतिष्ठेच्या केलेल्या काही जागा अशा विविध गोष्टींसाठी लक्ष्यवेधी ठरली होती. प्रत्यक्षात ‘एक हैं तो सेफ हैं’चा मोदींचा नारा, ‘बटेंगे तो कटेंगे’ हे योगींचे आवाहन, स्थानिक पातळीवर आलेले अनेक विविध विषय प्रभावी ठरले. जातीपेक्षा धर्माचे रक्षण महत्त्वाचे मानून, सामान्य माणसाने महायुतीला कौल दिला. त्याला ‘लाडक्या बहिणीं’ची जोड मिळाली. स्थानिक उमेदवारांची प्रतिमाही महत्त्वाची ठरली. जेथे प्रतिमा चांगली नव्हती, तेथे महायुतीलाही पराभव पत्करावा लागला.
 
परळीत धनंजय मुंडे, छत्रपती संभाजीनगर (पूर्व) मध्ये अतुल सावे, लातूर (शहर) मध्ये अमित देशमुख, भोकरमध्ये अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे राणा जगजितसिंह पाटील, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार या लढती लक्ष्यवेधी होत्या. विशेषतः जरांगे आंदोलनात अंतरवाली सराटी येथे झालेल्या संघर्षानंतर जालनाजिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्नही झाला. पण, हाती आलेल्या सर्व निकालांचा कल लक्षात घेता, मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण झालेले नाही, असे लक्षात येत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण करण्याचा आणि मराठवाडा अस्थिर करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा शरद पवार प्रभृतींचा प्रयत्न अखेर जागरूक मतदारांनी हाणून पाडला.
 
मराठवाड्यातील संपूर्ण निवडणूक याच मुद्द्याभोवती फिरविण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील अन्य विभागांवर या मुद्द्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीतही हाच मुद्दा पेटवून अधिकाधिक खासदार निवडून आणण्यात काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांना यश आले असले, तरी विधानसभेत मात्र मतदारांनी डोळसपणे मतदान करत त्यांचे फुटीचे मनसुबे धुळीस मिळविले आहेत. मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण काही मतदारसंघांत प्रभावी ठरले होते. त्यामुळे निर्माण झालेली जागृतीही हिंदू मतांच्या एकत्रीकरणात प्रभावी ठरली. परिणामी, महायुतीला लक्षणीय यश मिळाले. श्रीजया चव्हाणांच्या पराभवासाठी राहुल गांधी, धनंजय मुंडे व अतुल सावे यांच्या पराभवासाठी इम्तियाज जलील यांच्या साथीने जरांगे यांच्या माध्यमातून शरद पवार, संजय शिरसाट व प्रदीप जैस्वाल यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे यांनी विशेषत्वाने प्रयत्न केले. पण हे सारे प्रयत्न फोल ठरले.
 
छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनहीठिकाणी मुस्लीम मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी असलेले दलित मतदानही ‘एमआयएम’च्या उमेदवारांकडे वळविण्यासाठी ‘एमआयएम’ आणि उबाठा यांच्यात साटेलोटे करण्याचा प्रकारही समोर आला. पण, समाजाने फुटीचे राजकारण नाकारले. अंतिमतः महाराष्ट्रातील विकासाच्या दिंडीत बहुसंख्येने सहभागी होण्याचा कौल संपूर्ण मराठवाड्याने दिला आहे.
पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप 19
शिवसेना (शिंदे) 13
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 08
शिवसेना (उबाठा) 03
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 01
काँग्रेस 01
रासप 01
 
दत्ता जोशी 
Powered By Sangraha 9.0