महायुती सुसाट; उबाठाला भोपळा

24 Nov 2024 12:14:48

उद्धव ठाकरे
 
भाजप-महायुतीने उत्तर महाराष्ट्राचा आपला बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शाबूत ठेवला आहे. केवळ शाबूतच नव्हे, तर यंदा हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून विधानसभेचे एकूण 47 मतदारसंघ या भागात मोडतात. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीतही या विभागात भाजप-महायुतीचाच वरचष्मा पहायला मिळाला होता. 
 
भाजप-महायुतीने उत्तर महाराष्ट्राचा आपला बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शाबूत ठेवला आहे. केवळ शाबूतच नव्हे, तर यंदा हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून विधानसभेचे एकूण 47 मतदारसंघ या भागात मोडतात. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीतही या विभागात भाजप-महायुतीचाच वरचष्मा पहायला मिळाला होता. त्यावेळी भाजपला 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 13, काँग्रेस सात, शिवसेना सहा आणि इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या. मध्यंतरी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने लढवली. महायुती म्हणून जनतेत गेल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला मतांचे भरभरून दान दिले आहे. भरघोसमतांमुळे भाजप-महायुतीला उत्तर महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यति’ असे यश मिळाले आहे. 47 पैकी महायुतीला तब्बल 43 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला अवघ्या तीन, तर इतरांना एक जागा मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांत तर महाविकास आघाडी हद्दपार झाली असून, मालेगाव मध्यमध्ये ‘एमआयएम’ वगळता, सर्वत्र फक्त महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला. 15 पैकी पाच जागा भाजप, शिवसेना दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागांवर यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चारपैकी दोन ठिकाणी भाजप, एका जागी शिवसेनेला आणि एका जागी काँग्रेसला यश मिळाले आहे. धुळे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून, पाचपैकी तब्बल चार जागी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी भाजपला पाच, शिवसेना पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 जागांपैकी भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला चार, शिवसेना दोन, काँग्रेसला एक आणि शरद पवार गटाला एक जागी विजय मिळाला. म्हणजेच, उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघांपैकी भाजपला 20, शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागी विजय प्राप्त झाला असून काँग्रेसला दोन, तर शरद पवार गटाला एक, तर ‘एमआयएम’ला एका जागेवर विजय मिळवता आला. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले, तर महायुतीने तब्बल 43 जागांवर विजय मिळवला.
 
निवडणुकीदरम्यान, ‘वक्फ बोर्ड’, ‘व्होट जिहाद’, ‘औरंगाबादचा पुरस्कार, अहिल्यादेवी नावाचा तिरस्कार’ असे अनेक मुद्दे चर्चेत राहिले. ‘बटेंगे तो कटेंगे’ याचा अर्थ हिंदू समाजाने नीट समजून घेऊन फाळणी, काश्मिरी हिंदू या सर्वांशी जोडून घेतला व हिंदूहितासाठी मतदान केले. ‘जरांगे फॅक्टर’ नाशिकमध्ये चालणार, अशा वावड्या उठवल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. जरांगेंच्या सातत्याने टार्गेटवर असणार्‍या छगन भुजबळ यांनीदेखील नाशिकमधील येवला मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. जरांगेंनी भुजबळ यांना पाडणार, असे सांगूनही भुजबळ निवडून आले. मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिला नसला, तरी अपक्ष असलेल्या आसिफ राशिद शेख यांनी ‘एमआयएम’च्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना तुल्यबळ लढत दिली. अवघ्या 75 मतांनी एमआयएमचा विजय झाला असला तरीही, याठिकाणी आसिफ शेख यांना अजित पवार गटाचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. याठिकाणी जवळपास75 टक्क्यांहून अधिक मुस्लीम लोकसंख्या असल्याने अपेक्षेप्रमाणे ‘एमआयएम’ जिंकली, पण अगदी भव्य विजय न मिळवता, पदरात निसटता विजय मिळाला. नाशिकमधून मंत्री असलेले शिवसेनेचे दादा भुसे यांनी मालेगाव बाह्यमधून, तर येवल्यातून छगन भुजबळ यांनी विजय प्राप्त केला.
जळगावमधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या. “माझ्या मुलीला निवडून द्या,” असे भावनिक आवाहन करूनही त्यांच्या पदरी पराभव पडला. मंत्री गिरीश महाजन यांनी अपेक्षेप्रमाणे जामनेरमधून विजय प्राप्त केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील अमळनेरमधून विजयी झाले. जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी झाले. नंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावित, तर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडातून जयकुमार रावल विजयी झाले. धुळे शहरमधून भाजपच्या अनुप अग्रवाल यांनी ‘एमआयएम’च्या फारूक शहा यांचा दणदणीत पराभव करत शहरावरील हिरवे सावट दूर केले. मागील वेळी झालेली चूक यंदा धुळे शहरवासीयांनी सुधारली आणि भगवा झेंडा डौलाने फडकावला.
 
अहिल्यानगर जिल्ह्यातील शरद पवारांच्या नातवाला विजय मिळवता मिळवता नाकीनऊ आले. भाजपच्या राम शिंदे यांनी कर्जत- जामखेडमध्ये रोहित पवार यांना जोरदार लढत दिली. मात्र, शिंदेंना अवघ्या 1 हजार, 243 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याचप्रमाणे, भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डीमधून विजय मिळवला. नेवासातशिवसेनेच्या विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उबाठाच्या शंकरराव गडाख यांचा पराभव केला. गडाख हे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल संगमनेरमध्ये पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेच्या नवख्या अमोल खताळ यांनी धूळ चारली. खताळ यांनी आठवेळा अजेय असलेल्या थोरात यांचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव करत सर्वांनाच चकित केले. या विजयात राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या मदतीचाही मोठा हातभार आहे.
 
एकूणच, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मतदारांनी कौल देत महाविकास आघाडीला साफ नाकारले. त्याचप्रमाणे, उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत उबाठा गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. उत्तर महाराष्ट्र 2024च्या या विधानसभा निवडणुकीत महायुतीमय झाला, एवढे मात्र नक्की!
 
भाजप 20
शिवसेना (शिंदे) 11
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 12
काँग्रेस 02
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 01
अन्य 01
 
 
Powered By Sangraha 9.0