बेताल वक्तव्यांचा हिशोब चूकता! राऊतांमुळे व्यापारीवर्गाने टाकला मविआवर बहिष्कार!

23 Nov 2024 18:38:21

ubt
 
 मुंबई : (Sanjay Raut) कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय मंत्री आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्यासाठी भाषेची मर्यादा सोडून बोलताना ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यापाऱ्यांना चोर म्हणत ते खोटं बोलून ग्राहकांना फसवतात आणि लोकांना जाळ्यात अडकवतात, अशी अशोभनीय आणि बेताल वक्तव्ये केली गेली, ज्यामुळे संपूर्ण देशातील व्यावसायिकांमध्ये संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या विरोधात संताप निर्माण झाला.
 
अशा बेताल वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी मोर्चे काढले तसेच या विधानांचा तीव्र निषेध करत त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले. आणि मविआच्या इतर सर्व घटक पक्षांना या विधानांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले परंतु ना मविआच्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली, ना संजय राऊतांनी माफी मागितली, त्यामुळे राज्यातील तमाम व्यावसायिकांनी मतदानातून त्यांचा सगळा संताप व्यक्त केला आणि आजचा निकाल पाहता महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी मविआला आपली ताकद दाखवून दिली आहे हे स्पष्ट होत आहे.
 
ठक्कर पुढे म्हणाले की, संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर सर्व मोठमोठ्या व्यापारी संघटनांनी त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या लहान-मोठ्या सर्व संघटनांना माफी न मागितल्याबद्दल आणि मविआच्या इतर सर्व घटक पक्षांना या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन केले होते.व्यापाऱ्यांनी मविआच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला सहन करावा लागणार आहे. आमच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील ९०% व्यापाऱ्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपला संताप व्यक्त करण्यासाठी मतदान केले आहे. यापुढील काळातही कोणत्याही राजकीय पक्षाने व्यावसायिकांना हलक्यात घेतले तर त्यालाही असाच प्रतिसाद दिला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0